Jul 12

गुरुपौर्णिमा..!!

आद्यगुरु व्यास

 

Maharshri Ved Vyas

 

 ब्रह्मानंद सुखाचा तूं कंद बापा । भावातीता हरसी दासत्रयतापा ॥

अगाध महिमा तुझा कोण करी मापा । मंगळधामा रामा सद्‌गुरु निष्पापा ॥

जय देव जय देव जय आलक्ष्य लक्ष्या । जय गुरुराज दयाघन शिश्वांतर साक्षा ॥

होउनि सकृप मूढां तूं हातीं धरिसी । अधनग भस्म करोनि त्यांतें उद्धरिसी ॥

स्पर्शुनिं मस्तकीपाणी त्यां ब्रह्म करिसी । आत्मस्वरुपा दाविसीं होउनियां आग्सी ॥

अग्नी काष्ठां देता अपुलें रुप जसें । आपण करितां प्रेमें शिष्यांलागि तसे ॥

शिष्यांचें तव स्मरणें भवभय नासतसे । सदैव ब्रह्मस्वरुपीं होउनि राहतसे ॥

ऎसा तूं गुरुराया विश्वाचा दाता । सकृत होउनि कळवी मजला वेदांता ॥

महाराजा अजुनी तारि अंत किती पाहतां । दास म्हणे मी बुडतों काढि धरुनि हाता ॥

 

आज गुरुपौर्णिमा ह्यालाच व्यासपौर्णिमा असाही म्हणतात. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले त्यामुळे आजच्या दिवशी त्यांच्या पूजनाला महत्व आहे. आज गुरुंच पूजन करतात. देवा प्रमाणे वंदनीय आणि मार्गदर्शक असे गुरु लाभणं, म्हणजे आपलं परमभाग्य. संस्कृत भाषेमध्ये 'गुरु' ह्या शब्दाचा अर्थ असा होतो 'गु' म्हणजे 'अंधार' आणि 'अज्ञान दूर करणारा' आणि 'रु' म्हणजे 'निराकार' अश्या त्या सगुण निराकार आणि माझा अंधकारमय मार्ग ज्ञानाने प्रकाशमय करून आयुष्यभर शिष्याला प्रोत्साहन देणाऱ्या 'गुरु' ला विनम्रतेनी वंदन..!!

 

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुसाक्षात परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥

 

देवाचं साक्षात रूप, जे आयुष्याभर योग्य मार्गाची निवड करायला तत्पर असते,ज्ञानदान करून अज्ञानाचा एक एक पदर हळुवार बाजूला करणार तो गुरु, साक्षात सदगुरू बनून मार्गक्रमणा करायला शिष्याला उदुक्त करतो. गुरू एक परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे.

 

गुरूची कृपा असेल तेथे विजय निश्चित आहे.

 

ज्याप्रमाणे शिष्याचे प्रमाण असते त्याप्रमाणे गुरुचे हि प्रमाण श्री समर्थ रामदास स्वामींनी अतिशय योग्य रीतीने समजून सांगितले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गुरु निर्मल, आचारशील आणि अनुतापी म्हणजे झालेल्या चुकांनी पश्याताप पावणारा, विरक्त, सदाचारी, निष्टावंत, शुचिष्मंत आणि नेमस्त असावा. तसेच तो दक्ष, साक्षेपी, निर्गुण ब्राम्हाची ओढ असणारा, धीरगंभीर, उदार, ज्ञानासक्त, परोपकारी, निर्मत्सरी आणि नीतिवंत असलाच पाहिजे. या शिवाय काय वाचा आणि मानाने शुद्ध, प्रज्ञावंत, युक्तिवंत, प्रेमळ, व्रतनिष्ठ, धारिष्टवान, सात्विक, एक सुजन वाचक नी एकाग्र श्रोता हवा.

 

आपल्याला अनेक अज्ञानाच्या लाटांना निर्भयपणे पार करण्याचं बळ गुरूच देऊ शकतो. प्रेरणा बनून सदैव पाठीशी खंबीर उभा राहतो. अनेक गोष्टी नव्यानी आत्मसात करायची संधी आपल्याला मिळते ती गुरुसानिध्यामुळे. गुरु सदैव दुर्गुणापासून सदगुण, विनाशापासून कल्याणाकडे, शंकेपासून संतृष्टीकडे़, अहंभावापासून विनम्रतेकडे तर पशुत्वापासून मानवतेकडे जाण्याचा मार्ग दाखवत असतात. गुरु वाचून माणसाच्या जीवनाला दिशा लाभत नाही. स्वतः श्री दत्त गुरूरायांनी निसर्गाशी एकरूप होऊन आपले गुरु बनवले आणि ते त्यांनी २४ गुरूंकडून अनेक साधे पण महत्वाचा गुणसंचय आत्मसात करून इतरांचे अज्ञान दूर करण्यास सामान्यांपर्येंत पोहोचवले. गुरुचरणात स्वर्ग जाणावा, श्वासामध्ये गुरुंचा ध्यास जाणावा, माथ्यावरी गुरुंचा आशीर्वाद रहावा याकरता आजच्या ह्या मंगलदिनी, आपल्या सदैव पाठीशी असणाऱ्या आणि गुरु म्हणून प्रेरणा देणाऱ्या त्या सर्व गुरूंना आणि अप्ल्या दैवताला श्री दत्तगुरूंना नम्र अभिवादन...

 

गुरू::

  • आदि गुरु श्री दत्त
  • श्री श्रीपाद वल्लभ
  • श्री नृसिंहसरस्वती
  • श्री माणिक प्रभू
  • श्री स्वामी समर्थ
  • गुरू वशिष्ठ
  • महर्षि संदीपनि
  • धौम्य ऋषि
  • श्री जनार्दन स्वामी
  • श्री रामकृष्ण परमहंस
  • श्री समर्थ रामदास स्वामी
  • श्री आदि शंकराचार्य

 

Guru Parampara

श्री गुरुदेव दत्त ...!!!

 

This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page

 

 

Date: 12 Jul 2014

Start Jap Online