Oct 10
श्री गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा (संपूर्ण)
श्रीगणेशाय नमः । संकल्प करोनिया मनीं । जावें स्वर्गद्वाराभुवनीं । गंगाकेशव पूजोनि । हरिश्चंद्र मंडपा जावें ॥१॥
स्वर्गद्वार असे जाण । मणिकर्णिकातीर्थ विस्तीर्ण । तुवां तेथें जावोन । संकल्पावें विधीनें ॥२॥
हविष्यान्न पूर्व दिवशीं । करोनि असावें शुचीसी । प्रातःकाळीं गंगेसी । स्नान आपण करावें ॥३॥
धुंडिराजातें प्रार्थोनि । मागावें करुणावचनीं । पुनर्दर्शन दे म्हणोनि । विनवावें परियेसा ॥४॥
मग गंगेतें नमोनि । जावें विश्वनाथभुवनीं । मग तयाते पूजोनि । भवानीशंकर पूजावा ॥५॥
मग जावें मुक्तिमंडपासीं । नमोनि निघावें संतोषीं । धुंडिराजाचे पूजेसी । पुनरपि जावें परियेसा ॥६॥
मागुती यावें महाद्वारा । विश्वेश्वर-पूजा करा । मोदादि पंच विघ्नेश्वरा । नमन करावें दंडपाणीसी ॥७॥
पूजा आनंदभैरवासी । मागुतीं यावें मणिकर्णिकेसी । पूजोनिया ईश्वरासी । सिद्धिविनायक पूजावा ॥८॥
गंगाकेशव पूजोनि । ललितादेवीसी नमोनि । राजसिद्धेश्वर आणा ध्यानीं । दुर्लभेश्वर पूजावा ॥९॥
सोमनाथ पूजा करीं । पुढें शूलटंकेश्वरी । मग पूजा वाराहेश्वरी । द्शाश्वमेध पूजा मग ॥१०॥
बंदी देवीतें पूजोनि । सर्वेश्वरातें नमोनि । केदारेश्वर धरा ध्यानीं । हनुमंतेश्वर पूजावा ॥११॥
मग पूजावा संगमेश्वरी । लोलार्कातें अवधारीं । अर्कविनायका पूजा करीं । दुर्गाकुंडीं स्नान मग ॥१२॥
आर्यादुर्गां देवी पूजोनि । दुर्गा गणेश ध्याऊनि । पुनर्दर्शन दे म्हणोनि । प्रार्थावें तयासी ॥१३॥
विश्वकूपेंत ईश्वरासी । कर्दमतीर्थी स्नान हर्षी । कर्दमेश्वरपूजेसी । तुवां जावें बाळका ॥१४॥
जावें कर्दमकूपासी । पूजा मग सोमनाथासी । मग विरुपालिंगासी । पूजा करीं ब्रह्मचारी ॥१५॥
पुढें जावें नीलकंठासी । पूजा करीं गा भावेंसी । कर जोडोनि भक्तींसी । कर्दमेश्वर पूजावा ॥१६॥
पुनर्दर्शन आम्हांसी । दे म्हणावें भक्तींसी । मग निघावें वेगेंसी । नागनाथाचे पूजेतें ॥१७॥
पुढें पूजीं चामुंडेसी । मोक्षेश्वरा परियेसीं । वरुणेश्वर भक्तींसी । पूजा करीं गा बाळका ॥१८॥
वीरभद्रपूजेसी । जावोनि द्वितीय दुर्गेसी । अर्चावें विकटाक्षा देवीसी । पूजा करीं मनोभावें ॥१९॥
पूजीं भैरव उन्मत्त । विमळार्जुन प्रख्यात । काळकूटदेवाप्रत । पूजा करीं गा बाळका ॥२०॥
पूजा करीं महादेवासी । नंदिकेश्वर भैरवासी । भृंगेश्वर विशेषीं । पूजा करीं मनोहर ॥२१॥
गणप्रियासी पूजोनि । विरुपाक्षातें नमोनि । यक्षेश्वर अर्चोनि । विमलेश्वर पूजीं मग ॥२२॥
भीमचंडीं शक्तीसी । पूजीं चंडीविनायकासी । रविरक्ताक्ष गंधर्वासी । पूजा करीं मनोभावें ॥२३॥
ज्ञानेश्वर असे थोर । पूजा पुढें अमृतेश्वर । गंधर्वसागर मनोहर । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४॥
नरकार्णव तरावयासी । पूजीं भीमचंडीसी । विनवावें तुम्हीं त्यासी । पुनर्दर्शन दे म्हणावें ॥२५॥
एकपादविनायकासी । पुढें पूजीं भैरवासी । संगमेश्वरा भरंवसीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥२६॥
भूतनाथ सोमनाथ । कालनाथ असे विख्यात । पूजा करीं गा त्वरित । कपर्दिकेश्वरलिंगाची ॥२७॥
नागेश्वर कामेश्वर । पुढें पूजीं गणेश्वर । पूजा करीं विश्वेश्वर । चतुर्मुख विनायका ॥२८॥
पूजीं देहलीविनायकासी । पूजीं गणेश षोडशीं । उदंडगणेश षोडशीं । पूजा करीं मनोहर ॥२९॥
उत्कलेश्वर महाथोर । असे लिंग मनोहर । पुढें एकादश रुद्र । तयांचें पूजन करावें ॥३०॥
जावें तपोभूमीसी । पूजा करीं गा भक्तींसी । रामेश्वर महाहर्षीं । पूजीं मग सोमनाथ ॥३१॥
भरतेश्वर असे थोर । लक्ष्मणेश्वर मनोहर । पूजीं मग शत्रुघ्नेश्वर । भूमिदेवी अर्चीं मग ॥३२॥
नकुळेश्वर पूजोन । करीं रामेश्वरध्यान । पुनर्दर्शन दे म्हणोन । विनवावें परियेसा ॥३३॥
असंख्यात तीर्थ वरुण । तेथें करा तुम्हीं नमन । असंख्यात लिंगें जाण । पूजा करावी भक्तींसी ॥३४॥
पुढें असे लिंग थोर । नामें देव सिद्धेश्वर । पूजा करीं गा मनोहर । पशुपाणि विनायक ॥३५॥
याची पूजा करोनि । पृथ्वीश्वरातें नमोनि । शरयूकूपीं स्नान करोनि । कपिलधारा स्नान करीं ॥३६॥
वृषभध्वजा पूजोनि । ज्वालानृसिंहाचे वंदी चरणीं । वरुणासंगमीं स्नान करोनि । श्राद्धादि कर्मे करावीं ॥३७॥
संगमेश्वर पूजावा । सर्वविनायक बरवा । पुढें पूजीं तूं केशवा । भावें करुनि ब्रह्मचारी ॥३८॥
पूजा प्रर्हादेश्वरासी । स्नान कपिलातीर्थासी । त्रिलोचनेश्वरासी । पूजा करीं गा भक्तीनें ॥३९॥
पुढें असे महादेव । पंचगंगातीर ठाव । पूजा करीं गा भक्तिभावें । तया बिंदुमाधवासी ॥४०॥
पूजीं मंगळागौरीसी । गभस्तेश्वरा परियेसीं । वसिष्ठ वामदेवासी । पर्वतेश्वर पूजावा ॥४१॥
महेश्वराचे पूजेसी । पुढें सिद्धिविनायकासी । पूजा सप्तवर्णेश्वरासी । सर्वगणेश पूजावा ॥४२॥
मग जावें मणिकर्णिके । स्नान करावें विवेकें । विश्वेश्वरातें स्मरोनि निकें । महादेव पूजावा ॥४३॥
मग जावें मुक्तिमंडपासी । नमन करावे विष्णूसी । पूजीं दंडपाणीसी । धुंडिराज अर्चावा ॥४४॥
आनंदभैरव पूजोनि । आदित्येशा नमोनि । पूजा करीं गा भक्तींसी । मोदादि पंचविनायका ॥४५॥
पूजा करीं गा विश्वेश्वरासी । मोक्षलक्ष्मीविलासासी । नमोनि देवा संमुखेसी । मंत्र म्हणावा येणेंपरी ॥४६॥
श्लोक ॥ जय विश्वेश विश्वात्मन् काशीनाथ जगत्पते । त्वत्प्रसादान्महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ॥४७॥
अनेकजन्मपापानि कृतानि मम शंकर । गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंगप्रदक्षिणा ॥४८॥
ऐसा मंत्र जपोन । पुढें करावें शिवध्यान । मुक्तिमंडपा येवोन । आठां ठायीं वंदावें ॥४९॥
प्रथम मुक्तिमंडपासी । नमन करावें परियेसीं । वंदोनि स्वर्गमंडपासी । जावें ऐश्वर्यमंडपा ॥५०॥
ज्ञानमंडपा नमोनि । मोक्षलक्ष्मीविलासस्थानीं । मुक्तिमंडपा वंदोनि । आनंदमंडपा जावें तुवा ॥५१॥
पुढें वैराग्यमंडपासी । तुवां जावें भक्तींसी । येणेंपरी यात्रेसी । करीं गा बाळा ब्रह्मचारी ॥५२॥
आणिक एक प्रकार । सांगेन ऐक विचार । नित्ययात्रा मनोहर । ऐक बाळका गुरुदासा ॥५३॥
सचैल शुचि होवोनि । चक्रपुष्करणीं स्नान करोनि । देवपितर तर्पोनि । ब्राह्मणपूजा करावी ॥५४॥
मग निघावें तेथोनि । पदादित्येश्वर पूजोनि । दंपत्येश्वर नमोनि । श्रीविष्णूतें पूजावें ॥५५॥
मग नमावा दंडपाणि । महेश्वरातें पूजोनि । मग निघावें तेथोनि । धुंडिराज अर्चिजे ॥५६॥
ज्ञानवापीं करी स्नान । नंदिकेश्वर अर्चोन । तारकेश्वर पूजोन । पुढें जावें मग तुवां ॥५७॥
महाकाळेश्वर देखा । पूजा करीं भावें एका । दंडपाणि विनायका । पूजा करीं मनोहर ॥५८॥
मग यात्रा विश्वेश्वर । करीं गा बाळका मनोहर । लिंग असे ओंकारेश्वर । प्रतिपदेसी पूजावा ॥५९॥
मत्स्योदरी तीर्थासी । स्नान करावें प्रतिपदेसी । त्रिलोचन महादेवासी । दोन्ही लिंगे असतीं जाण ॥६०॥
तेथें बीजतिजेसी । जावें तुवां यात्रेसी । यात्रा जाण चतुर्थीसी । कांचीवास लिंग जाणा ॥६१॥
रत्नेश्वर पंचमीसी । चंद्रेश्वरपूजेसी । षष्ठीसी जावें परियेसीं । ऐक शिष्या एकचित्तें ॥६२॥
सप्तमीसी केदारेश्वर । अष्टमीसी लिंग धूमेश्वर । विश्वेश्वर लिंग थोर । नवमी यात्रा महापुण्य ॥६३॥
कामेश्वर दशमीसी । एकादशीसी विश्वेश्वरासी । द्वादशीसी मणिकर्णिकेसी । मणिकेश्वर पूजावा ॥६४॥
त्रयोदशी प्रदोषेसी । पूजा अविमुक्तेश्वरासी । चतुर्दशीसी विशेषीं । विश्वेश्वर पूजावा ॥६५॥
जे कोणी काशीवासी । असती नर परियेसीं । त्यांणीं करावी यात्रा ऐसी । नाहीं तरी विघ्न घडे ॥६६॥
शुक्लपक्षीं येणेंपरी । यात्रा करीं मनोहरी । कृष्णपक्ष आलियावरी । यात्रा करा सांगेन ॥६७॥
चतुर्दशी धरोनि । यात्रा करा प्रतिदिनीं । सांगेन ऐका विधानीं । एकचित्तें परियेसा ॥६८॥
वरुणानदीं करा स्नान । करा शैल्येश्वरदर्शन । संगमेश्वर पूजोन । संगमीं स्नान तये दिनीं ॥६९॥
स्वर्गतीर्थस्नानेंसी । स्वर्गेश्वर पूजा हर्षी । मंदाकिनी येरे दिवसीं । मध्यमेश्वर पूजावा ॥७०॥
मणिकर्णिका स्नानेंसी । पूजा ईशानेश्वरासी । हिरण्यगर्भ परियेसीं । दोनी लिंगें पूजिजे ॥७१॥
स्नान धर्मकूपेसी । करीं पूजा गोपद्मेश्वरासी । पूजा करा तया दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥७२॥
कपिलधारा तीर्थासी । स्नान करा भक्तींसी । वृषभध्वज लिंगासी । सप्तमीचे दिवसीं पूजीं पै ॥७३॥
उपाशांतिकूपेसी । स्नान करा भक्तींसी । उपशांतेश्वरासी । पूजा करीं तया दिनीं ॥७४॥
पंचचूडडोहांत । स्नान करा शिव ध्यात । ज्येष्ठेश्वरा त्वरित । पूजावें तया दिनीं ॥७५॥
चतुःसमुद्रकूपासी । स्नान करीं भावेंसी । समुद्रेश्वर हर्षी । पूजा करीं तया दिनीं ॥७६॥
देवापुढें कूप असे । स्नान करावें संतोषें । शुक्रेश्वर पूजा हर्षें । पूजा करीं तया दिनीं ॥७७॥
दंडखात तीर्थेंसी । स्नान करोनि देवासी । व्याघ्रेश्वरपूजेसी । तुंवा जावें तया दिनीं ॥७८॥
शौनकेश्वरतीर्थेसी । स्नान तुम्ही करा हर्षीं । तीर्थनामें लिंगासी । पूजा करा मनोहर ॥७९॥
जंबुतीर्थ मनोहर । स्नान करा शुभाचार । पूजावा भावें जंबुकेश्वर । चतुर्दश लिंगें येणेंपरी ॥८०॥
शुक्लपक्षकृष्णेसी । अष्टमी तिथि विशेषीं । पूजावें तुम्हीं लिंगासी । सांगेन ऐका महापुण्य ॥८१॥
मोक्षेश्वर पर्वतेश्वर । तिसरा पशुपतेश्वर । गंगेश्वर नर्मदेश्वर । पूजा करीं मनोभावें ॥८२॥
आणिक भक्तेश्वर गभस्तीश्वर । मध्यमेश्वर असे थोर । तारकेश्वरनामें निर्धार । नव लिंगें पूजावीं ॥८३॥
आणिक लिंगें एकादश । नित्ययात्रा विशेष । लिंग असे अग्निध्रुवेश । यात्रा तुम्हीं करावी ॥८४॥
दुसरा असे उर्वशीश्वर । नकुलेश्वर मनोहर । चौथा असे आषाढेश्वर । भारभूतेश्वर पंचम ॥८५॥
लांगूलेश्वरीं करा पूजा । करा त्रिपुरांतका ओजा । मनःप्रकामेश्वरकाजा । तुम्हीं जावें परियेसा ॥८६॥
प्रीतेश्वर असे देखा । मंदालिकेश्वर ऐका । तिलपर्णेश्वर निका । पूजा करीं भावेंसी ॥८७॥
आतां शक्तियात्रेसी । सांगेन ऐका विधीसी । शुक्लपक्षतृतीयेसी । आठ यात्रा कराव्या ॥८८॥
गोप्रेक्षतीर्थ देखा । स्नान करोनि ऐका । पूजा मुख्य भाळनेत्रिका । भक्तिभावेंकरोनिया ॥८९॥
ज्येष्ठवापीं स्नानेंसी । ज्येष्ठागौरी पूजा हर्षीं । स्नान पान करा वापीसी । शृंगार सौभाग्य गौरीपूजा ॥९०॥
विशाळगंगास्नानासी । पूजा विशाळगौरीसी । ललितातीर्थस्नानेसी । ललिता देवी पूजावी ॥९१॥
स्नान भवानीतीर्थेसी । पूजा करा भवानीसी । बिंदुतीर्थ स्नानासी । मंगळागौरी पूजावी ॥९२॥
पूजा इतुके शक्तींसी । मग पूजिजे लक्ष्मीसी । येणें विधी भक्तींसी । यात्रा करीं मनोहर ॥९३॥
यात्रातीर्थ चतुर्थीसी । पूजा सर्व गणेशासी । मोदक द्यावे गौरीपुत्रासी । विघ्न न करीं तीर्थवासियांतें ॥९४॥
मंगळ अथवा रविवारेंसी । यात्रा करीं भैरवासी । षष्ठी तिथि परियेसीं । जावें तुम्हीं मनोहर ॥९५॥
रविवारीं सप्तमीसी । यात्रा रविदेवासी । नवमी अष्टमी चंडीसी । यात्रा तुम्हीं करावी ॥९६॥
अंतर्गृहयात्रेसी । करावी तुम्हीं प्रतिदिवसीं । विस्तारकाशीखंडासी । ऐक शिष्या ब्रह्मचारी ॥९७॥
ऐशी काशीविश्वेश्वर । यात्रा करावी तुम्हीं परिकर । आपुल्या नामीं सोमेश्वर । लिंगप्रतिष्ठा करावी ॥९८॥
इतुकें ब्रह्मचारियासी । यात्रा सांगितली परियेसीं । आचरण करीं येणें विधींसी । तुझी वासना पुरेल ॥९९॥
तुझे चित्तीं असे गुरु । प्रसन्न होईल शंकरु । मनीं धरीं गा निर्धारु । गुरुस्मरण करीं निरंतर ॥१००॥
इतकें सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं । ब्रह्मचारी म्हणे हर्षीं । हाचि माझा गुरु सत्य ॥१०१॥
अथवा होईल ईश्वर । मज कृपाळू झाला सत्वर । कार्यं लाधेल निर्धार । म्हणोनि मनीं धरियेलें ॥१०२॥
न आराधितां आपोआप । भेटला मातें मायबाप । गुरुभक्तीनें अमूप । सकाळाभीष्टें पाविजे ॥१०३॥
समस्त देवा ऐशी गति । दिल्यावांचोन न देती । ईश्वर भोळा चक्रवर्ती । गुरुप्रसादें भेटला ॥१०४॥
यज्ञ दान तप सायास । कांहीं न करितां सायास । भेटला मज विशेष । गुरुकृपेंकरोनिया ॥१०५॥
ऐसें गुरुस्मरण करीत । ब्रह्मचारी जाय त्वरित । विधिपूर्वक आचरत । यात्रा केली भक्तीनें ॥१०६॥
यात्रा करितां भक्तींसी । प्रसन्न झाला व्योमकेशी । निजस्वरुपें संमुखेसी । उभा राहिला शंकर ॥१०७॥
प्रसन्न होवोनि शंकर । म्हणे दिधला माग वर । संतोषोनि त्वष्ट्रकुमार । निवेदिता झाला वृत्तान्त ॥१०८॥
जें जें मागितलें गुरुवर्यें । आणिक त्याचे कन्याकुमारें । सांगता झाला विस्तारें । शंकराजवळी देखा ॥१०९॥
संतोषोनि ईश्वर । देता झाला अखिल वर । म्हणे बाळा माझा कुमार । सकळ विद्याकुशल होसी ॥११०॥
तुवां केली गुरुभक्ति । तेणें झाली आपणा तृप्ति । अखिल विद्या तुज होती । विश्वकर्मा तूंचि होसी ॥१११॥
चतुर्विध पुरुषार्थ । लाधला तुज परमार्थ । सृष्टि रचावया समर्थ । होसी जाण त्वष्ट्रपुत्रा ॥११२॥
ऐसा वर लाधोन । त्वष्टा ब्रह्मानंदन । केलें लिंग स्थापन । आपुले नामीं परियेसा ॥११३॥
मग निघाला तेथोनि । केली आयती तत्क्षणीं । प्रसन्न होतां शूलपाणि । काय नोहे तयासी ॥११४॥
जें जें मागितलें श्रीगुरुवरें । सकळ वस्तु केल्या चतुरें । घेऊनिया सत्वरें । आला श्रीगुरुसंमुख ॥११५॥
सकळ वस्तु देऊनि । लागतसे श्रीगुरुचरणीं । अनुक्रमें गुरुरमणि । पुत्र-कन्येंसी वंदिलें ॥११६॥
उल्हास झाला श्रीगुरुसी । आलिंगितसे महाहर्षीं । शिष्य ताता ज्ञानराशि । तुष्टलों तुझे भक्तीनें ॥११७॥
सकल विद्याकुशल होसी । अष्टैश्वर्ये नांदसी । त्रैमूर्ति तुझिया वंशीं । होतील ऐक शिष्योत्तमा ॥११८॥
घर केलें तुवां आम्हांसी । आणिक वस्तु विचित्रेंसी । चिरंजीव तूंचि होसी । आचंद्रार्क तुझें नाम ॥११९॥
स्वर्गमृत्युपाताळासी । पसरवीं तुझे चातुर्यासी । रचिसी तूंचि सृष्टीसी । विद्या चौसष्टी तूंचि ज्ञाता ॥१२०॥
तुज वश्य अष्ट सिद्धि । होतील जाण नव निधि । चिंता कष्ट न होती कधीं । म्हणोनि वर देतसे ॥१२१॥
ऐसा वर लाधोनि । गेला शिष्य महाज्ञानी । येणेंपरी विस्तारोनि । सांगे ईश्वर पार्वतीसी ॥१२२॥
ईश्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी । एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्टें पावती ॥१२३॥
भव म्हणिजे सागर । उतरावया पैल पार । समर्थ असे एक गुरुवर । त्रैमूर्तीचा अवतार ॥१२४॥
या कारणें त्रैमूर्ति । गुरुचरणीं भजती । वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें सिद्धि नाहीं ॥१२५॥
श्लोक ॥ यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्था : प्रकाशन्ते महात्मनः ॥१२६॥
ऐसें ईश्वर पार्वतीसी । सांगता झाला विस्तारेंसी । म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसी । निरोपिलें द्विजातें ॥१२७॥
इतुकें होतां रजनीसी । उदय झाला दिनकरासी । चिंता अंधकारासी । गुरुकृपा ज्योती जाणा ॥१२८॥
संतोषोनि द्विजवर । करिता झाला नमस्कार । ऐसी बुद्धि देणार । तूंचि स्वामी कृपानिधि ॥१२९॥
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी । स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥१३०॥
काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारोन । तया वेळीं होतों आपण । तुम्हांसहित तेथेंचि ॥१३१॥
पाहिलें आपण दृष्टान्तीं । स्वामी काशीपुरीं असती । जागृतीं कीं सुषुप्तीं । नकळे मातें स्वामिया ॥१३२॥
म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं । विनवीतसे करुणा बहाळी । भक्तिभावेंकरोनिया ॥१३३॥
जय जया परमपुरुषा । परात्परा परमहंसा । भक्तजनमानसहंसा । श्रीनृसिंहसरस्वती ॥१३४॥
ऐसें तया अवसरीं । पूर्वज तुझा स्तोत्र करी । सांगेन तुज अवधारीं । एकचित्तें करुनिया ॥१३५॥
श्लोक ॥ आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं । पश्चात् क्षोणिजडा विनाश-दितिजां कृत्वाऽवतारं प्रभो । हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं, भूत्वाऽत्मजोऽत्रेर्गृहे । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१३६॥
भूदेवाखिलमानुषं विदुजना बाधायमानं कलिं । वेदादुश्यमनेकवर्णमनुजा, भेदादि-भूतोन्नतम् । छेदः कर्मतमांधकारहरणं श्रीपादसूर्योदयं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१३७॥
धातस्त्वं हरिशंकरप्रतिगुरो, जाताग्रजन्मं विभो । हेतुः सर्वविदोजनाय तरणं, ज्योतिःस्वरुपं जगत् । चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले, पातुः सदा सेव्ययं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥१३८॥
चरितं चित्रमनेककीर्तिमतुलं, परिभूतभूमंडले । मूकं वाक्यदिवांधकस्य नयनं, वंध्यां च पुत्रं ददौ । सौभाग्यं विधवां च दायकश्रियं, दत्त्वा च भक्तं जनं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥१३९॥
दुरितं, घोरदरिद्रदावतिमिरं, हरणं जगज्जोतिष । स्वर्धेंनुं सुरपादपूजितजना, करुणाब्धिभक्तार्तितः । नरसिंहेंद्रसरस्वतीश्वर विभो, शरणागतं रक्षकं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१४०॥
गुरुमूर्तिश्चरणारविंदयुगलं, स्मरणं कृतं नित्यसौ । चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं सरितादि-भागीरथी । तुरगामेधसहस्त्रगोविदुजनाः स्मयक् ददंस्तत्फलं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥१४१॥
नो शक्यं तव नाममंगल-स्तुवं, वेदागमागोचरं । पादद्वं ह्रदयाब्जमंतरजलं निर्धारमीमांसतं । भूयो भूयः स्मरन्नमामि मनसा, श्रीमद्गुरुं पाहि मां । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१४२॥
भक्तानां तरणार्थ सर्वजगतां, दीक्षां ददन्योगिनां । सुक्षेत्रं पुरगाणगस्थित प्रभो, दत्त्वा चतुष्कामदं । स्तुत्वा भक्तसरस्वतीगुरुपदं, जित्वाऽद्यदोषादिकं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१४३॥
एवं श्रीगुरुनाथमष्टकमिदं स्तोत्रं पठेन्नित्यसौ । तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरं आनंदवर्धं वपुः । पुत्रापत्यमनेकसंपदशुभा दीर्घायुरारोग्यतां । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१४४॥
येणेंपरी स्तोत्र करीत । मागुती करी दंडवत । सद्गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठियेले ॥१४५॥
म्हणे त्रैमूर्ति अवतारु । तूंचि देवा जगद्गुरु । आम्हां दिसतोसी नरु । कृपानिधि स्वामिया ॥१४६॥
मज दाविला परमार्थ । लाधलों चारी पुरुषार्थ । तूंचि सत्य विश्वनाथ । काशीपुर तुजपाशीं ॥१४७॥
ऐसेंपरी श्रीगुरुसी । विनवीतसे परियेसीं । संतोषोनि महाहर्षीं । निरोप देती तये वेळीं ॥१४८॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । दाखविली तुज काशी । पुढें तुझ्या वंशीं एकविसांसी । यात्राफळ तयां असे ॥१४९॥
तूंचि आमुचा निजभक्त । दाखविला तुज दृष्टान्त । आम्हांपासीं सेवा करीत । राहें भक्ता म्हणती तया ॥१५०॥
जरी राहसी आम्हांपासी । तरी त्वां न वंदिजे म्लेंच्छासी । आणोनिया स्त्रीपुत्रांसी । भेटी करीं आम्हांतें ॥१५१॥
निरोप देऊनि द्विजासी । गेले गुरु मठासी । आनंद झाला मनासी । श्रीगुरुदर्शनीं भक्तजना ॥१५२॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां । विनवीतसे कर जोडोनि जाणा । भक्तिभावेंकरोनिया ॥१५३॥
मागें कथानक निरोपिलें । सायंदेव शिष्य श्रीगुरुंनीं त्यातें निरोपिलें । कलत्रपुत्र आणीं म्हणत ॥१५४॥
पुढें तया काय झालें । विस्तारोनि सांगा वहिलें । पाहिजे आतां अनुग्रहिलें । म्हणोनि चरणीं लागला ॥१५५॥
संतोषोनि सिद्ध मुनि । सांगतसे विस्तारोनि । सायंदेव महाज्ञानी । गेला श्रीगुरुनिरोपें ॥१५६॥
जाऊनि आपुले स्त्रियेसी । सांगता झाला पुत्रासी । आमुचा गुरु परियेसीं । असे गाणगापुरांत ॥१५७॥
आम्हीं जावें भेटीसी । समस्त कन्यापुत्रांसी । म्हणोनि निघाला वेगेंसी । महानंदेंकरोनिया ॥१५८॥
पावला गाणगापुरासी । भेटी जहाली श्रीगुरुसी । नमन करी भक्तींसी । साष्टांगीं तये वेळीं ॥१५९॥
कर जोडुनी तये वेळीं । स्तोत्र करी वेळोवेळीं । ओंनमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥१६०॥
तूं त्रैमूर्तिचा अवतार । अज्ञानदृष्टीं दिससी नर । वर्णावया न दिसे पार । तुझा महिमा स्वामिया ॥१६१॥
तुझा महिमा वर्णावयासी । शक्ति कैची आम्हांसी । आदिपुरुष भेटलासी । कृपानिधि स्वामिया ॥१६२॥
जैसा चंद्र चकोरासी । उदय होतां संतोष त्यासी । तैसा आनंद आम्हांसी । तुझे चरण लक्षितां ॥१६३॥
पूर्वजन्मीं पापराशि । केल्या होत्या बहुवशी । श्रीगुरुचे दर्शनेसी । पुनीत झालों म्हणतसे ॥१६४॥
जैसा चिंतामणि स्पर्शीं । हेमत्व होय लोहासी । मृत्तिका पडतां जंबूनदीसी । उत्तम सुवर्ण होतसे ॥१६५॥
जातां मानससरोवरासी । हंसत्व येई वायसासी । तैसें तुझे दर्शनेंसी । पुनीत झालों स्वामिया ॥१६६॥
श्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तस्था । पापं तापं च हरति दैन्यं च गुरुदर्शनम् ॥१॥
टीका ॥ गंगा स्नानानें पापें नाशी । ताप निवारी देखा शशी । कल्पवृक्षछायेसी । कल्पिलें फळ पाविजे ॥१६७॥
एकेकाचे एकेक गुणें । असतीं ऐसीं हीं लक्षणें । दर्शन होतां श्रीगुरुचरणें । तिन्ही फळें पाविजे ॥१६८॥
पापें हरती तात्काळीं । तापचिंता जातीं सकळी । दैन्यकानन समूळ जाळी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥१६९॥
चतुर्विध पुरुषार्थ । देता होय गुरुनाथ । ऐसा वोले वेदसिद्धान्त । तोचि आम्हीं देखिला ॥१७०॥
म्हणोनिया आनंदेंसी । गायन करी संतोषीं । अनेक रागें परियेसीं । कर्नाटक भाषें करोनि ॥१७१॥
राग श्रीराग । कंडेनिंदु भक्तजनराभाग्यनिधियभूमंडलदोळगेनारसिंहसरस्वतीया ॥१७२॥
कंडेनिंदुउंडेनिंदुवारिजादोळपादवाराजाकमळांदोळदंतध्यानिसी ॥१७३॥
सुखसुवाजनारुगळा । भोरगेलान्नेकामिफळफळा । नित्यसकळाहूवा । धीनारसिंहसरस्वतीवरानना ॥१७४॥
वाक्यकरुणानेनसुवा । जगदोळगदंडकमंडलुधराशी । सगुणानेनीशीसुजनरिगे । वगादुनीवासश्रीगुरुयतिवरान्न ॥१७५॥
धारगेगाणगापुरडोलकेलाशीहरी । दासिसोनुनादयाकरुणादली । वरावीतुंगमुनाहोरावनुअनुबिना । नारसिंहसरस्वतीगुरुचरणवन्न ॥१७६॥
राजगखंडीकंडीनेननमा । इंदुकडेनेनमा । मंडलादोळगेयती कुलराये । चंद्रमन्ना ॥१७७॥
तत्त्वबोधायाउपनिषदतत्त्वचरित नाव्यक्तवादपरब्रह्ममूर्तियनायना । शेषशयनापरवेशकायना । लेशकृपयनीवनेवभवासौपालकाना ॥१७८॥
गंधपरिमळादिशोभितानंदासरसाछंदालयोगेंद्रेगोपीवृंदवल्लभना ॥१७९॥
करीयनीयानांपापगुरु । नवरसगुसायन्नीं । नरसिंहसरस्वत्यन्ना । नादपुरुषवादना ॥१८०॥
यापरी स्तोत्रें श्रीगुरुसी । स्तुति केली बहुवसीं । संतोषोनि महाहर्षीं । आश्वासिताती तये वेळीं ॥१८१॥
प्रेमभावें समस्तांसी । बैसा म्हणती समीपेसी । जैसा लोभ मायेसी । या बाळकावरी परियेसा ॥१८२॥
आज्ञा घेउनी सहज । गेला तुमचा पूर्वज । सकळ पुत्रांसहित द्विज । आला श्रीगुरुदर्शना ॥१८३॥
भाद्रपद चतुर्दशीसी । शुक्लपक्ष परियेसीं । आला शिष्य भेटीसी । एकाभावेंकरोनिया ॥१८४॥
येती शिष्य लोटांगणीं । एकाभावें तनुमनीं । येऊनि लागती चरणीं । सद्गदित कंठ झाला ॥१८५॥
स्तोत्र करिती तिहीं काळीं । कर जोडोनि तये वेळीं । ओं नमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥१८६॥
त्रैमूर्तींचा अवतारु । झालासी तूं जगद्गुरु । येरां दिसतोसी नरु । न कळे पार तुझा स्वामिया ॥१८७॥
सिद्ध म्हणे नामकरणी । काय सांगू तये दिनीं । कैशी कृपा अंतःकरणीं । तया श्रीगुरु यतीचे ॥१८८॥
आपुले पुत्रकलत्रेंसी । जैसा लोभ परियेसीं । तैसा तुमचे पूर्वजासी । प्रेमभावें पुसताती ॥१८९॥
गृहवार्ता सुरसी । क्षेम पुत्रकलत्रेंसी । द्विज सांगे मनोहर्षी । सविस्तारीं परियेसा ॥१९०॥
पुत्रकलत्रेंसंहित नमोन । सांगे क्षेम समाधान । होते पुत्र चौघेजण । चरणावरी घातले ॥१९१॥
ज्येष्ठसुत नागनाथ । तयावरी कृपा बहुत । कृपानिधि गुरुनाथ । माथां हस्त ठेविती ॥१९२॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । तुझ्या ज्येष्ठसुतासी । आयुष्य पूर्ण असे त्यासी । संतति बहु याची वाढेल ॥१९३॥
हाच भक्त आम्हांसी । असेल श्रियायुक्तेसी । तुवां आतां म्लेंच्छासी । सेवा न करावी म्हणितलें ॥१९४॥
आणिक तूंतें असे नारी । पुत्र होती तीस चारी । नांदतील श्रेयस्करी । तुवां सुखें असावें ॥१९५॥
जया दिवसीं म्लेंच्छासी । तुवां जावोनि वंदिसी । हानि असे जीवासी । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥१९६॥
तुझा असे वडिल सुत । तोचि आमुचा निज भक्त । त्याची कीर्ति वाढेल बहुत । म्हणती श्रीगुरु तये वेळीं ॥१९७॥
मग म्हणती द्विजासी । जावें त्वरित संगमासी । स्नान करोनि त्वरितेंसी । यावें म्हणती तये वेळीं ॥१९८॥
ग्रामलोक तया दिवसीं । पूजा करितां अनंतासी । येऊनिया श्रीगुरुसी । पूजा करितो परियेसा ॥१९९॥
पुत्रमित्रकलत्रेंसी । गेले स्नाना संगमासी । विधिपूर्वक अश्वत्थासी । पूजूनि आले मठातें ॥२००॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी । पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥२०१॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु । आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥२०२॥
तये वेळीं श्रीगुरु । सांगतां झाला विस्तारु । कौंडिण्यमहाऋषीश्वरु । केलें व्रत प्रख्यात ॥२०३॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु । कैसें व्रत आचरावें साचारु । पूर्वीं कोणी केलें असे ॥२०४॥
ऐसें व्रत प्रख्यात । व्रत दैवत अनंत । जेणें होय माझें हित । कथामृत निरोपिजे ॥२०५॥
येणें पुण्य काय घडे । काय लाभतसे रोकडें । ऐसें मनींचें साकडें । फेडावें माझें स्वामिया ॥२०६॥
ऐसें विनवीतसे द्विजवरु । संतोषोनि गुरु दातारु । सांगते झाले व्रताचारु । सिद्ध म्हणे नामधारका ॥२०७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सांगे गुरुचरित्रविस्तारु । ऐकतां भवसागरु । पैल पार पाववी श्रीगुरु ॥२०८॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीयात्रा समस्त करीत । श्रोते ऐकती आनंदित । तेणें सफल जन्म होय ॥२०९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सांगतसे नामधारक विख्यात । जेणें होय मोक्ष प्राप्त । द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥२१०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीक्षेत्रमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥२१०॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
श्री गुरुदेव दत्त...!!!