Jun 16
दत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध
महान परंतु अतिशय शीघ्रकोपी ऋषी शुक्राचार्य ह्यांनी देव आणि असुर ह्यांमधून असुरांचे गुरुत्व पत्करले आणि देव-दानव युद्धामध्ये असुरांना सर्वोतोपरी जाणीवपूर्वक सहाय्य केले. शुक्राचार्य ह्यांना संजीवनी-मंत्र-सिद्धी अवगत होती. संजीवनी मंत्रोचाराने त्यांनी युद्धामध्ये मृत पावलेल्या अनेक असुरांना पुनोर्जीवन बहाल केले. अश्या कुटनीतीमूळे देवांना असुरांवर विजय तर दूरच पण नियंत्रण मिळवणे अवघड झाले. ह्याच करिता देवगुरु बृहस्पती ह्यांनी आपला पुत्र कच ह्याला शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करायला सांगितले. त्या आज्ञेप्रमाणे कचने शुक्राचार्यांची भरपूर मनोभावे सेवा करून मन जिंकले. मात्र असुरांना कच आणि देवांचे हे कपट लक्षात आल्याने कचला ठार मारले. शुक्राचार्यांचे कन्यारत्न म्हणजेच गुरुकन्या देवयानी हिचा कच वर जीव जडला होता. त्यामुळे तिनी आपल्या वडिलांकडे हट्ट करून कचला संजीवनी मंत्रोच्चाराने पुनोर्जीवन दिले. परंतु असुरांनी त्याला पुन्हा ठार केले. शेवटी मात्र असुरांनी तिला पुन्हा जिवंत करता येऊ नये याकरिता कच ला जाळून त्याच्या राखेत मध टाकून तयार केलेले पेय असुरऋषी शुक्राचार्यांना पाजले. परंतु देवयानीच्या आग्रहाखातर स्वतःचा जीव धोक्यात घालून नव्हे तर जीव देऊन शुक्राचार्यांनी कचला जिवंत केले आणि स्वतः मृत्युच्या कवेत गेले. ते पाहून देवयानीने संजीवनीचा मंत्र घोष करून आपल्या पित्याला पुनश्च जिवंत केले. परंतु तोच मंत्र कचने ३ वेळा ऐकून संजीवनी मंत्र आत्मसाद केला.
आपल्याला सोपवलेला कार्यभार संपवून कच ने शुक्राचार्यांना परत जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा गुरुकन्या देवयानीने विवाहाचा प्रस्ताव कच समोर मांडला. परंतु कचने तिला सांगितले कि, "माझे पुनर्जीवन शुक्राचार्यांच्या उदरातून झाल्यामुळे तू माझी बहीण लागतेस आणि तू माझ्या प्राणांचे रक्षण केले आहेस तेव्हा तू माझ्या माते समान आहेस. धर्माच्या विरुद्ध जाऊन हा विवाह संपन्न होणे नाही.” हे कचाचे बोल ऐकून देवयानीने त्याला घोर शाप दिला कि, "तू शिकलेली मंत्रसिद्धी विसरून जाशील.” देवयानीच्या अश्या वागण्याला संतापून कचाने देखील तिला शाप दिला कि, "तूझा विवाह ब्राम्हणेतर कुळात होईल.”आणि त्याप्रमाणे पुढे देवयानीचा विवाह ययाती नावाच्या राजशी झाला.
श्री गुरुदेव दत्त...!!!