Aug 21
जपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र
गायत्री मंत्र
सर्व वेदांची जननी, देवी गायत्रीचा संचार संपूर्ण विश्वातील कणाकणात आहे. गायत्री मंत्र हा अतिप्राचीन मंत्र आहे, सर्व वेदांचे सार ह्या एका मंत्रामध्ये समाविष्ट व्हावे अशी ह्याची शब्दरचना आहे. पूर्वीच्या काळी हा मंत्र स्नान- संध्यादि, उपनयन विधींसाठी महत्वाचा होता.
देवी गायत्रीचे स्वरूप ::
देवी गायत्री म्हणजेच साक्षात ज्ञान, आत्मबोध, पवित्रता आणि सद्चार. देवी गायत्रीचे स्थानासन कमळ पुष्प असून तिचे स्वरूप पंचमुखी आहे. देवी गायत्रीची हि पाच मुखे पंचप्राणांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच प्राणा, आपना, व्याना, उद्याना, समाना हे पंचप्राण म्हणजेच पाच तत्वे आहेत. म्हणजेच पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश. तिच्या दहा हातांमध्ये तिने शंख, गदा, चक्र, चाबूक, कमंडलू (कटोरा), कमलपुष्प, परशु धारण केले आहे आणि देवी गायत्री एका हाताने आशिष प्रदान करते आहे व दुसर्या हाताने साधकास अभय देती आहे.
गायत्री मंत्राचे अर्थ त्याचे उत्तम विवरण श्री दत्तगुरूंचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सक्षात स्वतः समजून देतात. (प्रस्तुत गायत्री मंत्र विवरण हे श्रीपद श्रीवल्लभ चरितामृत मधील आहे.)
श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा ::
गायत्री शक्ति विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसेच आत्म्याशी संबंधीत क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होवू शकते. आपल्या शरीरात असंख्य नाडयाचे जाळे पसलेले आहे. यातील कांही नाडया जुळल्या असता त्यांना ''ग्रंथी'' म्हणतात. जपयोगात श्रध्दा / निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होवून त्यातील सूप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो.
- "ॐ" या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो.
- "भू:" या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळयावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो.
- "भूव:" च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो.
- "स्व:" या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळयावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो.
- "तत्" च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली 'तापिनी' ग्रंथीतील सूप्त असलेली 'साफल्य' शक्ति जागृत होते.
- "स" च्या उच्चाराने डाव्या डोळयातील सफलता नांवाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली 'पराक्रम' शक्ति प्रभावित होते.
- "वि" चे उच्चारण केले असता डाव्या डोळयामधील 'विश्व' ग्रंथीमध्ये स्थित असलेली 'पालन' शक्ति जागृत होते.
- "तु" या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या 'तुष्टी' नांवाच्या ग्रंथीतील 'मंगळकर' शक्ति प्रभावित होते.
- "र्व" या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या 'वरदा' ग्रंथीतील 'योग' नावाची शक्ति सिध्द होते.
- 'रे" चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या 'रेवती' ग्रंथीतील 'प्रेम' शक्तिची जागृती होते.
- "णि" च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या 'सूक्ष्म' ग्रंथीतील सुप्त शक्ति 'धन' संध्य जागृत होते.
- "यं" या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या 'ज्ञान' ग्रंथीतील 'तेज' शक्तीची सिध्दि होते.
- "भर" या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठत असलेल्या 'भग' ग्रंथीतील 'रक्षणा' शक्ति जागृत होते.
- "गो" चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या 'गोमती' नावाच्या ग्रंथीतील 'बुध्दि' शक्तीची सिध्दि होते.
- "दे" च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या 'देविका' ग्रंथीतील 'दमन' शक्ति प्रभावित होते.
- "व" चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या 'वराही' ग्रंथीतील 'निष्ठा' शक्तीची सिध्दि करतो.
- "स्य" याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस (ज्या ठिकाणी बरगडया जुळतात) सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील 'धारणा' शक्ति प्रभावित होते.
- "धी" च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या 'ध्यान' ग्रंथीतील 'प्राणशक्ति ' सिध्द होते.
- "म" या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहा मध्ये असलेल्या 'मर्यादा' ग्रंथीतील 'संयम' शक्तिची जागृती होते.
- "हि" च्या उच्चाराने नाभीमधील 'स्फुट' ग्रंथीतील 'तपो' शक्ति सिध्द होते.
- "धी" या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेल्या 'मेघा' ग्रंथीतील 'दूरदर्शिता' शक्तीची सिध्दि होते.
- "यो" च्या उच्चारणाने डाव्या भूजेत स्थित असलेल्या 'योगमाया' ग्रंथीतील 'अंतर्निहित' शक्ति जागृत होते.
- "यो" च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या 'योगिनी' ग्रंथीतील 'उत्पादन' शक्ति जागृत होते.
- "न:" या अक्षराच्या उच्चारणांने उजव्या कोपरामध्ये असलेल्या 'धारीणी' ग्रंथीतील 'सरसता' शक्तीची सिध्दि होते.
- "प्र" या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपरात असलेल्या 'प्रभव' ग्रंथीतील 'आदर्श' नावाच्या शक्तीची जागृती होते.
- "चो" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या 'उष्मा' ग्रंथीतील 'साहस' शक्तीची सिध्दि होते.
- "द" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या 'दृश्य' नांवाच्या ग्रंथीतील 'विवेक' शक्तीची जागृती होते.
- "यात्" या अक्षर द्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील 'निरंजन' ग्रंथीतील 'सेवा' शक्ति सिध्द होते.
गायत्री मंत्राचे विवरण ::
गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. यातील ॐ कार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वरावरील निष्ठा ॐ कारच्या उच्चारणाने येते. हा कोंब तीन शाखांमध्ये भू: भुव: स्व: याच्या रूपाने वाढतो. ''भू:'' आत्मज्ञान मिळऊन देण्यास समर्थ आहे. ''भुव:'' जीव शरीर धारण करतो तेंव्हा करायचा कर्मयोग सुचवितो. ''स्व:'' समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. भू: या शाखेतून ''तत् सवितु: वरेण्यम्'' या उपशाखा उद्भवल्या. शरीरधारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास ''तत्'' उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन (मिळविणे) करण्यासाठी ''सवितु:'' याचे सहकार्य होते. ''वरेण्यम्'' मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो.
''भुव:'' या शाखेतून ''भर्गो, देवस्य धीमही'' या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. ''भर्गो'' निर्मलत्व वाढवितो. ''देवस्य'' देवतानाच केवळ साध्य असलेली दिव्यदृष्टी मिळवून देतो. ''धीमही'' ने सद्गुणांची वृद्धी होते. ''स्व:'' यातून ''धियो'' मुळे विवेक, ''योन:'' मुळे संयम, ''प्रचोदयात्'' मुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो.
फलश्रुती ::
- बौद्धिक प्रघाल्भता आणि अध्यात्मिक विचारधारा संपादन करण्यासाठी ह्या मंत्राचा उपयोग होतो.
- मानसिक, आत्मिक स्थरावर पातके शमवण्यासाठी तसेच प्रायश्चित्त म्हणून ह्या मंत्राचा साधक उपयोग करतात.
- ह्या मंत्राचे योग्य उच्चारण तथा पूर्ण विश्वासाने साधना केल्यास उत्तम आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, जीवनशक्ती प्राप्त होऊ शकते.
उपोरोक्त लेख केवळ गायत्री मंत्राविषयी माहिती देण्यासाठी प्रस्तुत आहे. वाचकांनी साधना करण्यापूर्वी गायत्री मंत्राविषयी आपल्या गुरूंकडून सविस्तर माहिती घ्यावी आणि गुरुआज्ञेविना गायत्री मंत्राचा जप करू नये.
श्री गुरुदेव दत्त ...!!!
Related Articles :