Jun 16
४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता
उदक म्हणजेच पाणी.मनुष्याने पाण्याप्रमाणे निर्मल राहून इतरांच्या मनातले मलीन विचार साफ केले पाहिजे.पाण्याचे अनेक गुणधर्म विषद करता येतात. पाण्याला ज्या आकारामध्ये आपण टाकतो तो त्या आकाराचे रूप स्वतः धारण करतो परंतु स्वतःचे सत्त्व सोडत नाही. त्याचप्रमाणे मानवाने सर्व परिस्थितीशी जुळवून घेऊन स्वतःचे सत्त्व टिकवले पाहिजे. ज्या प्रमाणे पाण्यात सर्व घटक विरघळवण्याची क्षमता आहे तसेच पाणी त्यात सामावणारे गढूलत्व तळाशी ठेवते आणि स्वछ निर्मल पाणी वरती राहते . ह्या गुणधर्मांचा अवलंब मानवाने करून इतरांच्या मलीन कर्मांना तळाशी स्थान देऊन निर्मल मनाने त्यांच्या पातकाचे क्षालन करावे. उदक हे सर्वांसाठीच ज्या प्रमाणे अमृत बनून वाहत असते. त्याप्रमाणे मानवाचा सहवास अमृतासम भासावा ह्याकरिता पाण्याचे हे गुणधर्म आचरणात आणावेत. पाणी जर एकाठिकाणी साचून राहिले तर त्याचे दबके तयार होते. आणि दबके हे साचून राहिल्यानी कालांतरानी दुर्गंधी निर्माण करते. त्यामुळे ज्ञानार्जन करताना मानवानी कुठेही थांबून साचलेल्या दुर्गंधीयुक्त दबक्या समान न होता एका निर्मल स्वछ झर्याचे गुणधर्म आचरून सतत विहार करावा. पवित्र राहून आपल्या मधुरतेने दुसर्यांना सतत सुखवीत राहणे हाच खरा पुरुषार्थ.
श्री गुरुदेव दत्त...!!!