Jun 16

दत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | यदूचे वैराग्य व अवधूत दर्शन

:: यदूचे वैराग्य  ::

राजा यदु निराशेला कवटाळून रानावनात गेला. यदु हा लहानपणापासूनच श्री गुरुदेव दत्तांचा चांगला भक्त होता. दत्तांची भक्ती तो मनोभावे करी. राजा यदु विवेक - वैराग्यसंपन्न होऊन आत्मज्ञान आणि आत्मसुख शोधायला संसार सोडून, राजवैभव सोडून, इथपर्येंत मार्गक्रमणा करीत आला ह्यात श्री दत्तगुरूंची योजना होती, जी त्यांनी त्यांच्या भक्तासाठी नियोजित केली होती.

:: अवधूत दर्शन ::

रानावनातून संचार करीत असताना एका तेजस्वी व्यक्तीकडे यदूची नजर खिळली. जिच्या कडे राहायला घर नाही, खायला अन्न नाही सुखसुविधा नाही तरीही ती व्यक्ती आत्मसुखानी परिपूर्ण वाटणारी. हे बघून यदूला कुतूहल वाटले आणि न राहवून त्यांनी त्या योगी पुरुषाला विचारले, ' आपण कोण आहात महाशय, हा प्रश्न ह्या करिता विचारला कारण, आपण सर्व चिंतामुक्त, आत्मसुख प्राप्त केलेले कोणी थोर योगी दिसताय. इतका विलास आणि तृप्ती आपल्या मुखावर दिसतीये त्याचे कारण मला सांगा. ह्या संसारामध्ये आम्हाला सगळं काही आहे, पत्नी, मुलांचा सुख, छत्र, कीर्ती, वैभव आहे पण तरीही आम्ही व्याकूळ का आहोत आणि आपणाकडे सुखसुविधा नसताना आपण इतके संतुष्टीत जीवन कसे व्यतीत करता महाशय ? '

24 Gurus

राजा यदूला पडलेल्या प्रश्नांचे घोर संकलन करून अवधूताच्या शांत, निरामय आणि तेजस्वी मुखकमलावर सुंदर स्मितलकीर उमटली. श्री गुरुदेव दत्तरूपी अवधूताला यदूच्या चिकित्सक परंतु मार्मिक प्रश्नांचे कौतुक वाटले. अवधुतने आपला परिचय यदूला करून दिला आणि अवधूत-अवतारवाणी यदूच्या एक एक प्रश्नांची घडी उलगडू लागली.

अवधूतवाणी अमृतवर्षाव करू लागली, "राजा यदू , तुला पडलेल्या ह्या प्रश्नाचे समाधान माझ्या मुखे एकाग्र चित्ते ऐक. सर्व मनुष्यातून तू मला निरिच्छ, समाधानी, आत्मतृप्त, सुखरूप गवसले आहेस. परंतु हे गुण मला आत्मसाद करण्यास मला निसर्गातील २४ गुरूंची कृपा झाली आहे. आणि ते गुरु मला माझ्या आत्मज्ञान आणि निरीक्षण ह्यां तत्वांच्या मदतीने मिळाले आहेत. ह्या २४ गुरूंकडून मला ज्ञानाचा अथांग सागर अनुभवायला मिळाला. आज जे ब्रम्हज्ञान मी तुला देणार आहे ते श्रवण मनन आणि आत्मसाद करणाराच पुरुषार्थ साधू शकतो. मानवी शरीर हे भोग- वासना - मोह ह्याचे भांडार असून आत्मा सर्वार्थ आहे. आणि मानवानी शरीर सुख सोडून आत्मसुख शोधले तर नक्कीच तो माझ्या प्रमाणे समाधानी, आत्मतृप्त, सुखरूप भासेल.”

मूळ भागवत पुराणामध्ये ( एकादश स्कंद ) ह्यात अवधूतांनी बनवलेल्या २४ गुरूंची यादी नमूद केलेली आहे.

पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः | कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||

मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः | कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत || 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Date: 16 Jun 2012

Start Jap Online