Oct 30

सप्तशती गुरूचरित्र :: दत्तजन्म

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


ॐ नमोजी गुरु स्वामी दत्तात्रया । कृपाळू सखया दीनबंधू ॥१॥
तुझे कीर्तिगुण वर्णाया लागुन । इच्छितसे मन माझें बहु ॥२॥
तरि देई मति वदावया वाणी । आनंदाची खाणी प्रगटाया ॥३॥
आयका हो तुम्ही श्रोते संतजन । जन्म सुलक्षण श्रीदत्ताचा ॥४॥
सावित्री आणिक लक्ष्मी पार्वती । एके ठायीं स्थीति जाली होती ॥५॥
अकस्मात आली नारदाची फेरी । विणा स्कंधावरी घेउनियां ॥६॥
देवोनियां त्यातें बैसाया आसन । पुसती वर्तमान त्रैलोकीचें ॥७॥
असे नारदमुनीं त्रैलोक्य भुवनीं । आम्हा ऐशा कोणी असती काय ॥८॥
पतिव्रता आणि सर्वसत्ता आंगीं । ऐशा कोणी जगीं असती काय ॥९॥
ऐशा गर्विष्ठ पाहे तिघीजणी । बोले नारदमुनी तयालांगीं ॥१०॥
तुमची याहुनी श्रेष्ठ कोटीगुण । देखलीसे जाण पतिव्रता ॥११॥
भूलोकाचे ठायी अत्रिमुनी-जाया । सती अनुसूया नाम तिचें ॥१२॥
तुम्हां ऐशा दासी तिजला शोभती । काय सांगूं ख्याति तिची तुम्हां ॥१३॥
ऐसे आयकोनी मुनीचें वचन । मनामाजीं खिन्न जाल्या तिघी ॥१४॥
आपुलिया घरा उठोनियां गेल्या । पतीसी बोलत्या जाऊनियां ॥१५॥
आइका हो तुम्ही आमुचें वचन । कासावीस होती प्राण बहू ॥१६॥
अनुसूयेची कीर्ति नारदमुनीनीं । वर्णिली येवोनी आम्हांपाशीं ॥१७॥
तरी तुम्ही जावें मृत्युलोकाठायी । अनुसूयेचे गृहीं लागवेगीं ॥१८॥
हरोनियां तिच्या सत्वालागीं जाण । यावें परतून निजघरा ॥१९॥
स्त्रियांचे वचन आयकोनी कानीं । तिघे तत्क्षणीं उठीयेले ॥२०॥
ब्रह्मा विष्णु आणि तिजा चंद्रमौळी । निघाले ते काळीं मृत्युलोका ॥२१॥
स्नानसंध्येलागी अत्रिमुनि गेला । माध्यान्हीं पातला दिनमणी ॥२२॥
तयाकाळीं तिवे होवोनि अतीत । गेले आकस्मात् भिक्षेलागीं ॥२३॥
अनुसुयेलागीं मारुनियां हांक । बोलती कौतुक करोनियां ॥२४॥
भिक्षा घाली माते आम्हांसी सत्वर । नग्न दिगंबर होवोनियां ॥२५॥
नाहीं तरी आम्ही जातो परतोनि । सत्त्वासि घेऊनि तुझ्या आतां ॥२६॥
आयकोनि ऐसें अतिथी वचन । पतिव्रतारत्‍न चिंतावलें ॥२७॥
करोनियां मनीं पतीचें चिंतन । तीर्थातें घेऊन शिंपीयलें ॥२८॥
तंव ते तिघेजण झाले चिमणे बाळ । रांगती लडिबाळ होवोनियां ॥२९॥
अनुसुया नग्न होवोनियां आपण । करि दुग्धपान तयांलागीं ॥३०॥
तिघेजण एक्या पालखीं घालून । ओवीया गाऊन हालवीत ॥३१॥
इतुकियामाजीं अत्रिमुनी आले । बाळांतें पाहिलें निजडोळां ॥३२॥
विस्मित होवोनि आपुलीया मनीं । म्हणे श्रेष्ठ कोणी असती हे ॥३३॥
असो या लागून झाले बहुदिन । स्वर्गींचें भुवन शून्य ठेलें ॥३४॥
लक्षुमी पार्वती सावित्री या तिन्ही । चिंताग्रस्त मनीं जाल्या बहू ॥३५॥
एके ठायीं सर्व होवोनियां गोळा । चिंता वेळोवेळां करिताती ॥३६॥
इतुक्यांत आली नारदाची फेरी । मंजुळ उच्चारी नाममंत्र ॥३७॥
देवोनि आसन बैसविले मुनी । करिती विनवणी तयांलागीं ॥३८॥
आमुचे भ्रतार गेले कोणीकडे । आम्हांसी सांकडें घालोनियां ॥३९॥
तयावीण आम्हां न गमेचि क्षण । जाले बहुदिन तयालागीं ॥४०॥
तयांवीण सर्व शोभीत मंदीर । दिसति भयंकर आम्हांलागीं ॥४१॥
तुम्हांप्रति कोठें भेटतील तरी । सांगावें सत्वरीं आम्हांलागीं ॥४२॥
तंव बोले मुनि तया स्त्रियांप्रति । देखियेले पती तुमचे म्यां ॥४३॥
अनुसूयेचे घरीं तिघेजण बाळ । होवोनि लडिवाळ खेळताती ॥४४॥
आयकोनि ऐंसें मुनीचें वचन । विस्मित होऊन बोलती त्या ॥४५॥
आमुचिया बोला गेले सतीघरीं । आम्हांलागीं घोरीं । घालूनियां ॥४६॥
चला जाऊं अतां तयेचिया घरा । मागूनि भ्रतारा घेऊं आजी ॥४७॥
अभिमान दूर सांडुनियां जाण । पातल्या शरण अनुसूयेसीं ॥४८॥
म्हणती वो माते देई चुडेदान । करी बोळवण आम्हांलागीं ॥४९॥
भ्रतारांवाचून आमुचे पंचप्राण । कंठापाशीं जाण आले माते ॥५०॥
सर्वभावें आतां शरणागत आम्ही । द्यावे आमुचे स्वामी आम्हांलागीं ॥५१॥
पतिव्रता म्हणे ’न्यावे आपुले पती । धरुनियां हातीं आपुलाले’ ॥५२॥
तवं त्या बोलती तिवीजणी तीतें । ओळख आम्हांते न पडेचि ॥५३॥
समान दिसती ब्रह्माविष्णुरुद्र । तिन्ही मुखचंद्र सारिखेची ॥५४॥
माय होवोनियां दीन । मावशी । द्यावे हो आम्हांसी ओळखून ॥५५॥
ऐशा त्या वेल्हाळा पाहूनियां दीन केलेसें विंदान अनुसूयेनें ॥५६॥
पतीच्या तीर्थासीं शिंपूनी मागुती । तिघीचेही पती दाखविले ॥५७॥
ब्रह्माविष्णुरुद्र होवोनि प्रसन्न । म्हणे ’वरदान मागें कांहीं ’ ॥५८॥
म्हणे अनुसूया द्यावे ऐसे वर । तिवेही कुमर तुम्हां ऐसे ॥५९॥
तथास्तु म्हणोनि देऊनीयां वर ब्रह्महरीहर जाते झाले ॥६०॥
तयांच्या प्रसादें जाले तिघे पुत्र । उत्तम पवित्र पुण्यशील ॥६१॥
विरंचीचा चंद्र शिवाचा दुर्वास । विष्णूचा तो अंश दत्तात्रय ॥६२॥
तयाकाळीं हर्ष जाला जयजयकार । येती सुरवर तया ठायां ॥६३॥
आनंदोनि देव वर्षती सुमनें । करिती निंबलोण सर्व जग ॥६४॥
निरंजन म्हणे धन्य आजि दिन । पाहिलें निधान दत्तात्रय ॥६५॥

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 29

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


आतां एथें न रहावें । कलियुगीं गुप्त व्हावें । असें म्हणतां गुरुराव । अवघे दुःखित होती तें ॥१॥
गुरु तयां आश्वासून । म्हणे भजती आतां हीन । पुढें येतील दुर्दिन । हें जाणून गुप्त राहूं ॥२॥
जे सद्‌बुद्धि असती लोक । दिसो तयांसी सम्यक । गाणगापुरीं राहूं भाक । घ्याहो लोक त्रिवाचेसी ॥३॥
भवाध्वा हो तुम्हां सुगम । भजतां पादुका जे काम । ते पुरोनि अंतीं धाम । मिळेल नाम माझे गातां ॥४॥
भवांबुधितरणार्थ । भजा मज मिळेल स्वार्थ । चरित गाता मनोरथ । पुरती, व्यर्थ चिंता नसो ॥५॥
हो सद्धित पादुकार्चनीं । विघ्नहर चिंतामणी । अर्चा प्रातःकृष्णास्नानीं । जाउनि रोज येयीन मी ॥६॥
भक्तिमान्‌ भावी जसा जसा । त्यापाशीं मी तसा तसा । गुरुचा हो बोल ऐसा । नामधारका म्हणे सिद्ध ॥७॥
रहस्यार्थ गुरुचरिताचा सिद्धनामधारकाचा । संवाद जो लोकीं साचा । सार तयाचा हा चिद्रस ॥८॥
हें सत्कृपा करुनी दत्त । वदवी प्रेरुंनियां चित्त । तया पदीं हा समस्त । समर्पित असो ग्रंथ ॥९॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे वरप्रदानं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः
॥इति श्रीसप्तशतीगुरुचरित्रं समाप्तं॥

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 26

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


ज्या देति श्रीपाद वर । तो रजक जन्मांतर । करी हो म्लेंच्छ राजा शूर । धर्मावर मन ज्याचें ॥१॥
त्याचे पुरोहित म्हणती । हिंदु पाषाण पूजिती । भू गो जला देव म्हणती । ती दुर्मति न वंदावे ॥२॥
राजा रुसोनि बोलत । सत्य असे त्याचें मत । जे द्वेषिती तयांप्रत । मी प्राणान्त दंड करीन ॥३॥
द्या द्वेषोक्ति सोडुन । असे तयां कथी ज्ञान । मांडीवर फोड होवून । तो पीडून राहें दैवें ॥४॥
त्या उत्तम लेप करिती । परी त्याची नोहे शांति । राज पुसे द्विजाप्रति । तो एकांतीं सांगूं म्हणे ॥५॥
राजा मंत्र्यादिका त्यजून । एकलाची करी गमन । पापनाशतीर्थी येऊन । पुसे वंदून तया विप्रा ॥६॥
आश्वासन देवी द्विज । म्हणे सत्पुरुषासी मज । भवरोग हो निर्बीज । भय तुज कायसें ह्याचें ॥७॥
एक सर्वकर्महीन । उज्जनींत होता जाण । द्विज वेश्येसीं रमून । तद्‌गृहीं ये ऋषभयोगी ॥८॥
तत्पूर्व पुण्य उदेलें । म्हणोनि मुनि भेटले । दोघांनीं त्यां पूजिलें । सेवियलें अहोरात्र ॥९॥
त्या सेविल्या पुण्यानें । राजकुळीं जन्म घेणें । घडलें तयापरी भोगणें । आलें उणें जें स्वकर्म ॥१०॥
जो सद्भक्त हो सकाम । त्या ये श्रीमत्कुळीं जन्म । मुक्ती घेयी जो निष्काम । सत्समागम व्यर्थ नोहे ॥११॥
द्विजा जन्म दशार्णदेशीं । वज्रबाहुराजवंशीं । ज्येष्ठराणीच्या ये कुशीं । तें सवतीसी न रुचलें ॥१२॥
यत्‍नें तिणें गर्भिणीतें । सर्पगरळ दिलें होतें । भेदलें परी न प्राणातें । हरि, तीतें देव राखी ॥१३॥
तिचें मांस रक्त बिघडे । तिला बहु कष्ट घडे । पुत्रा प्रसवली पुढें । ब्रण पीडे उभयता ॥१४॥
झाले सर्वोपाय अपाय । तयां आरोग्य न होय । एके दिनीं तयां राय । विजनारण्यदेशीं टाकी ॥१५॥
ती पूर्व कर्म स्मरुन । बाळा कडेवर घेऊन । वनीं करी आक्रंदन । तो गोधन पुढे देखे ॥१६॥
राजभामिनी गोपतीतें । पुसोनी ये नगरातें । वणिक्यपती राखी तीतें । व्रणकष्टें पुत्र मेला ॥१७॥
तों दैवे ऋषभयोगी । ती रडतां आला वेगीं । तिला म्हणे राहें उगी । शोक त्यागीं विवेकानें ॥१८॥
सांगोन सदुपदेश । स्मरे पूर्वोपकारास । जीववी तो त्या सुतास । त्या दोघांस दे आरोग्य ॥१९॥
असा भाग्यें सत्पुरुष । भेटे, तरी जायी दोष । राजा पुसे सत्पुरुष । असे दोषहर कोठें ॥२०॥
भूसुर म्हणे भूपाप्रती । भीमातीरीं असे यती । नामे नृसिंहसरस्वती । तयाप्रति जा भेटाया ॥२१॥
राजा तथास्तु म्हणून । तया विप्रा सत्कारुन । चतुरंग दळ घेऊन । भाव धरुन पातला ॥२२॥
तो पाइक दूरी करुन । पायीं चालत येऊन । संगमी देवा पाहून । करी नमन एकभावें ॥२३॥
म्हणति श्रीगुरु रजका । कोठे वससी येसी न कां । भेटावया रे भाविका । ते ऐकुनी तो हो ज्ञानी ॥२४॥
निजगुज प्राग्जन्मीचें । आठवी रुप श्रीपादाचे । त्यावळखूनी मृदु वाचें । करी त्याचे तो स्तवन ॥२५॥
कां बाह्य विषयाब्धींत । लोटिसी तूं कृपावंत । आतां धरीं माझा हात । वरी त्वरीत काढी मज ॥२६॥
तूं हात माझा धरितां । मी येई हो वरता । मांडीवरी फोड होतां । त्या निमित्तानें ही भेट ॥२७॥
माझा मंगळ हो भाव । गुरु म्हणे फोडा दाखिव । येरु मांडी पाहे तंव । स्फोटकाभाव झालाचि ॥२८॥
म्हणे शाबास हे भेट । माझा गमविला स्फोट । म्हणे नेणें मी हे कूट । द्यावी भेट हा तव हेतू ॥२९॥
मी शास्त्रबाह्य जरी । गोहत्यादिक न करीं । म्हणे माझी पहा पुरी । नमस्कारी वारंवार ॥३०॥
तो अमित सेना दावी । तयां पालखींत बैसवी । स्वयें पायीं चाले पदवीं । गुरु बैसवी यानी तया ॥३१॥
पुढें दर्शन घे म्हणून । पापनाशतीर्थी येवून । राहे गुरु त्या प्रार्थून । नागनाथ घरीं नेयी ॥३२॥
गुरु मुख्य शिष्यांसहित । जेवूनियां तीर्थी येत । तो राजा त्या नगरांत । ने वाचत गाजत गात ॥३३॥
विविक्त दृष्टी भगवान । जाती पुरीं भक्ताधीन । दावी सर्वा भेटवोन । प्रीती करुन निजैश्वर्या ॥३४॥
ती गम्मत न बोलवें । महोत्सव केला रावें । आतां पाददास्य द्यावें । म्हणूनी भावें प्रार्थी भूप ॥३५॥
तनया राज्य देऊन । तूं श्रीशैलावर येऊन । घेयी माझें दर्शन । राव ज्ञान असो म्हणे ॥३६॥
पदीं नम्र झाला राव । आश्वासन गुरुराव । गाणगापुरीं पुनः ठाव । घेयी देव भक्ताधीन ॥३७॥
तें अघहारि दर्शन । होतां जनही हर्षून । सर्व करिती नीरांजन । गुरु स्तवनपूर्वक तें ॥३८॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे यवनोद्धरणं नाम पंचाशत्तमोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 25

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


हें उत्तम असें क्षेत्र । भीमामरजायोग थोर । रणीं सुरां मारी जालंधर । अमृतें हर त्या उठवी ॥१॥
हृत्तमः प्रकाशक । शिव दे अमृत विशोक । उलंडलें तेची ऐक । ती हे नदी अमरजा ॥२॥
ही भयोपताप वारी । भीमेशीं संगम करी । प्रयागापरी पाप वारी । भूमीवरी हे तारक ॥३॥
सर्व मान्य मनोहृत्तीर्थ । जेथ कल्पद्रू अश्वत्थ । पुढें संतोषाख्यतीर्थ । विश्वनाथ येथ आला ॥४॥
ही उमेश प्रसादाने । एका जीवन्मुक्तानें । काशी केली ती स्नानानें । कैवल्यानें निःसंशयें ॥५॥
तयावरी पापविनाश । तीर्थ दाविती यतीश । तो भेटे त्या समयास । पूर्वाश्रमस्वसा र‍त्‍ना ॥६॥
ती त्या महातीर्थी न्हाली । कुष्ठ जाउनी शुद्ध झाली । गुर्वाज्ञेनें तेथें राहिली । मुक्त झाली त्याच जन्मी ॥७॥
वारी संकट कोटीतीर्थ । पुढें दाविती रुदतीर्थ । गयेसम फल तेथ । चक्रतीर्थ केशवापुढें ॥८॥
हें समूळ वारी दुरित । अस्थी करी चक्रांकित । द्वारकेहुनी हें प्रशस्त । हो पतित स्नानें ज्ञानी ॥९॥
ज्या वेढोन असे माया । येथ स्नान करितां तया । ये मुक्तता सुनिश्चया । गुरुराया सांगे लोकां ॥१०॥
तो पूजावा कल्लेश्वर । प्राग्भागीं गोकर्णक्षेत्र । चक्रतीर्थ हें पवित्र । असे क्षेत्रमाहात्म्य हें ॥११॥
अज्ञानानें कली येतां । सर्वतीर्थां ये गुप्तता । गुरुनाथें तीं दावितां । लोकचित्ता हो आनंद ॥१२॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे गाणगापुरवर्णनं नाम एकोनपंचाशतमोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 24

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


जो हो वेदां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर । तया ग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥
गुरुदेव संगमीं जाती । त्या पाहून करी प्रणती । पुनः ये तो येणें रीती । करी भक्ती शेतीकरितां ॥२॥
लोकी चमत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया । कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥
तो तें प्रमाण मानून । स्वामिमागा ठरवून । कापी, तत्स्त्री येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥
ते कथिती अधिकार्‍यासी । शूद्र न जुमानीं त्यासी । दावी मध्यान्हीं गुरुसीं । म्हणे शेतासी कापिलें ॥५॥
तूं अतःपर काय खासी । असें गुंरु पुसे त्यासी । म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥६॥
त्याचे पुरवाया हेत । वृष्टी मूलर्क्षी पाडित । शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥
तो करुनि क्षेत्रपपूजा । सस्त्रीक करी गुरु पूजा । स्वामीभाग देउनि द्विजां । धान्यपुंजा वाटी हर्षे ॥८॥
संतोषोनी गुरुमूर्ति । त्यांच्या वंशा गती देती । अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिक ॥९॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online