Aug 01

श्री गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ।
पतिव्रतेचिया रिति । सांगे देवा बृहस्पति । सहगमनी फलश्रुति । येणेपरी निरोपिली ॥१॥
विधवापणाचा आचारू । सांगता झाला देववरू । पुसताती ऋषेश्वरू । ऐका श्रोते एकचित्ते ॥२॥
जवळी नसता आपुला पति । त्याते मरण झालिया प्राप्ति । काय करावे त्याचे सती । सहगमन केवी करावे ॥३॥
अथवा असेल गरोदरी । असे तीते कन्याकुमरी । काय करावे तिये नारी । म्हणून विनविती गुरूसी ॥४॥
ऐकोनि देवांचे वचन । सांगता जाला विस्तारोन । एकचित्ते करून । ऐका श्रोते सकळ ॥५॥
पति जवळी असे जरी । सहगमनी जावे तिये नारी । असता आपण गरोदरी । करू नये सहगमन ॥६॥
स्तनपानी असता कुमारू । तिणे करिता पाप थोरू । पुरुष मेला असेल दुरू । सहगमन करू नये ॥७॥
तिणे असावे विधवापणे । विधिपूर्वक आचरणे । सहगमासमाने । असे पुण्य परियेसा ॥८॥
विधवापणाचा आचारू । करिता असे पुण्य थोरू । निवर्तता आपुला भ्रतारू । केशवपन करावे ॥९॥
ज्या का विधवा केश राखिती । त्यांची ऐका फलश्रुति । केश पुरुषासी बाधिती । नरकापरी परियेसा ॥१०॥
यास्तव करणे केशवपण । करावे तिणे नित्य स्नान । एक वेळा भोजन । करावे तिणे परियेसा ॥११॥
एक धान्याचे अन्न । करावे तिणे भोजन । तीन दिवस उपोषण । करावे तिणे भक्तीने ॥१२॥
पाच दिवस पक्षमासास । करावा तिणे उपवास । अथवा चांद्रायणग्रास । भोजन करणे परियेसा ॥१३॥
चंद्रोदय बीजेसी । एक ग्रास तया दिवसी । चढते घ्यावे पंधरा दिवसी । पौर्णिमेसी भोजन ॥१४॥
कृष्णपक्षी येणेपरी । ग्रास घ्यावे उतरत नारी । अमावास्या येता जरी । एक ग्रास जेवावा ॥१५॥
शक्ति नाही जियेसी । एकान्न जेवावे परियेसी । अथवा फल-आहारेसी । अथवा शाका-आहार देखा ॥१६॥
अथवा घ्यावे क्षीर मात्र । कधी न घ्यावे अपवित्र । जेणे राहे प्राण मात्र । श्वासोच्छ्वास चाले ऐसे ॥१७॥
शयन करिता मंचकावरी । पुरुष घाली रौरव घोरी । भोगी नरक निरंतरी । पतीसहित परियेसा ॥१८॥
करू नये मंगलस्नान । अथवा देहमर्दन । गंध परिमल तांबूल जाण । पुष्पादि तिणे वर्जावे ॥१९॥
पुत्रावीण असे नारी । करणे तर्पण पुत्रापरी । तीळ दर्भ कुशधारी । गोत्रनाम उच्चारावे ॥२०॥
विष्णुपूजा करावी नित्य । आपुला पुरुष हा निश्चित । पुरुष आठवोनि चित्त । विष्णुस्थानी मानिजे ॥२१॥
पुरुष असता जेणेपरी । पतिनिरोपे आचार करी । तेणेचि रीती विष्णु अवधारी । त्याचे निरोपे आचरावे ॥२२॥
तीर्थयात्रा उपासव्रत । विष्णुनिरोपे करावे निश्चित । अथवा गुरु द्विज विख्यात । त्यांचे निरोपे आचरावे ॥२३॥
आपण असता सुवासिनी । ज्या वस्तूची प्रीति अंतःकरणी । तैशी वस्तु द्यावी धणी । विद्वज्जनविप्रांसी ॥२४॥
वैशाख माघ कार्तिकमास । अनेक स्नानी आचारविशेष । माघस्नान तीर्थास । विष्णुस्मरणे करावे ॥२५॥
वैशाखी जळकुंभदान । कार्तिकी दीपआराधन । ब्राह्मणा द्यावे घृतदान । यथाशक्त्या दक्षिणेसी ॥२६॥
माघमासी तिळघृतेसी । द्यावे दान विप्रांसी । अरण्यात वैशाखमासी । पोई घालिजे निर्मळोदके ॥२७॥
शिवालयी ईश्वरावरी । गळती ठेविजे निर्मळ वारी । गंध परिमळ पूजा करी । तेणे पुण्य अगाध ॥२८॥
विप्राचिया घरोघरी । उदक घालिजे शक्त्यानुसारी । अन्न द्यावे निर्धारी । अतिथिकाळी परियेसा ॥२९॥
तीर्थयात्रे जात्या लोका । त्याते द्याव्या छत्रपादुका । येता आपल्या गृहांतिका । पादप्रक्षालन करावे ॥३०॥
वारा घालावा विझणेसी । वस्त्र द्यावे परिधानासी । गंध तांबूल परिमळासी । कर्पूरवेलादि परियेसा ॥३१॥
जलपात्र द्यावे शक्तीसी । गुडपान आम्रपानेसी । द्राक्षे कर्दळीफळेसी । ब्राह्मणा द्यावे मनोहर ॥३२॥
जे जे दान द्यावे द्विजा । पतीच्या नावे अर्पिजे वोजा । संकल्पून पुरुषकाजा । धर्म करणे येणेपरी ॥३३॥
कार्तिकमासी जवान्न । अथवा जेविजे एकान्न । वृताक माष मसूर लवण । तैलादि मधु वर्जावे ॥३४॥
वर्जावे कास्यपात्र । आणिक वर्जावे द्विदलमात्र । मनी असावे पवित्र । एकाग्रेसी परियेसा ॥३५॥
पलाशपात्री भोजन करावे । शुचि उद्यापन करावे । जे जे व्रत धराते । त्याते उजवावे तत्त्वता ॥३६॥
घृतभरित कास्यपात्र । विप्रा द्यावे पवित्र । भूमिशयन केले व्रत । मंचक द्यावा विप्रासी ॥३७॥
जे जे वस्तु त्यजिली आपण । ते ते द्यावी ब्राह्मणालागून । रसद्रव्ये एक मास जाण । त्याग करावी परियेसा ॥३८॥
त्यजूनिया दधि क्षीर । उद्यापन आचार मनोहर । असलिया शक्त्यनुसार । धेनु द्यावी सालंकृत ॥३९॥
विशेषे असे आणिक व्रत । दीपदान असे ख्यात । वर्णिता महिमा अनंत । देवांसी म्हणे बृहस्पति ॥४०॥
दीपदान भाग सोळा । वरकड नसती धर्म सकळा । या कारणे अनंतफळा । दीपदान करावे ॥४१॥
माघस्नान माघमासी । करणे सूर्योदयासी । येणेपरी एक मासी । आचरावे भक्तीने ॥४२॥
लाडू तिळ खर्जुरेसी । करूनि पक्वान्ने ब्राह्मणांसी । द्यावी तिणे भक्तीसी । दक्षिणेसहित जाणा ॥४३॥
शर्करा मिरे एळेसी । तळून अपूप घृतेसी । दान द्यावे यतीसी । भोजन द्यावे अतीता ॥४४॥
हेमंतऋतु होता जाण । व्हावया शीतनिवारण । काष्ठे द्यावी विप्राकारणे । वस्त्रे द्यावी द्विजांसी ॥४५॥
पर्यंक द्यावा सुषुप्तीसी । एखाद्या भल्या ब्राह्मणासी । चित्र रक्त वस्त्रेसी । कंबळ द्यावे विप्रवर्गा ॥४६॥
व्हावया शीतनिवारण । औषध द्यावे उष्ण उष्ण । तांबूलदान परिपूर्ण । द्यावे एळाकर्पूरेसी ॥४७॥
गृहदान द्यावे विप्रासी । सांवत्सरिक ग्रामेसी । जाता तीर्थयात्रेसी । पादरक्षा देईजे ॥४८॥
गंध परिमळ पुष्पेसी । पूजा करावी केशवासी । रुद्राभिषेक विधींसी । अभिषेकावा गौरीहर ॥४९॥
धूप दीप नैवेद्यसी । पूजा करावी षोडशी । प्रीति बहु शंकरासी । दीपमाळा उजळिता ॥५०॥
आणिक सुगंध गंधेसी । तांबूलदान विधींसी । कर्पूरलवंगादि विविधेसी । भक्तिभावे अर्पिजे ॥५१॥
आपला पुरुष ध्यावोनि मनी । नारायण तो म्हणोनि । पूजा करावी एके मनी । भक्तिभावे परियेसा ॥५२॥
नेमे असावे तिये नारी । न बैसावे बैलावरी । लेवू नये चोळी करी । श्वेतवस्त्र नेसावे ॥५३॥
रक्त कृष्ण चित्र वस्त्र । लेता जाण दोष बहुत । आणिक असे व्रत । पुत्राचे बोल वर्तावे ॥५४॥
’आत्मा वै पुत्र नाम’ । म्हणून बोलती वेदागम । पतीपासून पुत्रजन्म । पुत्रआज्ञेत असावे ॥५५॥
ऐसा आचार विधवेसी । असे शास्त्रपुराणेसी । जरी आचरती भक्तीसी । सहगमनाचे फळ असे ॥५६॥
पापी जरी पति असला । असेल पूर्वी निवर्तला । नरकामध्ये वास्ल केला । पापरूपे भुंजत ॥५७॥
विधवापणे येणेपरी । आचरण करी जे नारी । मरण होता अवसरी । घेवोनि पति स्वर्गी जाय ॥५८॥
जितुक्या परी बृहस्पति । सांगे समस्त देवांप्रती । लोपामुद्रेची केली स्तुति । पतिव्रताशिरोमणि ॥५९॥
जितुक्या पतिव्रता नारी । समस्त भागीरथी सरी । त्यांचे पुरुष शंकरापरी । पूजा करावी दोघांची ॥६०॥
ऐसे बृहस्पतीचे वचन । सांगितले मनी विस्तारोन । ऐक बाळे तव मन । ज्यावरी प्रीति तेचि करी ॥६१॥
दुःख सकळ त्यजोनि । मम बोल ठेवी मनी । सांगितले तुजलागोनि । परलोकसाधन ॥६२॥
धैर्य जरी असेल तुजसी । सहगमन करी पतीसरसी । विधवापणे आचार करिसी । तेही पुण्य तितुकेची ॥६३॥
जे आवड तुझे मनी । सांग माये विस्तारोनि । हस्त मस्तकी ठेवूनि । पुसतसे प्रेमभावे ॥६४॥
ऐकोनि तया अवसरी । केले नमन तिये नारी । विनवीतसे करुणोत्तरी । भक्तिभावे करूनिया ॥६५॥
जय जयाजी योगीश्वरा । तूचि पिता सहोदरा । माझा प्राण मनोहरा । जनक जननी तूचि होसी ॥६६॥
आल्ये आपण परदेशात । जवळी नाही बंधुभ्रात । भेटलेती तुम्ही परमार्थ । अंतकाळी सोयरा ॥६७॥
सांगितले तुम्ही आचार दोनी । कष्ट बहु विधवापणी । अशक्य आम्हा न-टाके स्वामी । असाधारण असे दातारा ॥६८॥
तारुण्यपण मजसी । लावण्य असे देहासी । निंदापवाद शरीरासी । घडेल केवी वर्तमान ॥६९॥
संतोष होतो माझे मनी । पुण्य अपार सहगमनी । पतीसवे संतोषोनि । जाईन स्वामी निर्धारे ॥७०॥
म्हणूनि मागुती नमस्कारी । माथा ठेवी चरणांवरी । स्वामी माते तारी तारी । भवसागरी बुडतसे ॥७१॥
करुणाकृपेचा सागर । उठवीतसे योगेश्वर । देता झाला अभयकर । म्हणे पतीसवे जावे ॥७२॥
तोचि ठाव पुरुषासी । जाय माते सांगतेसी । सांगेन तुज विशेषी । ऐक माते एकचित्ते ॥७३॥
आलात तुम्ही दर्शनी । श्रीगुरुभेटीलागोनि । आरोग्य होईल म्हणोनि । भक्तिभावेकरूनिया ॥७४॥
होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी जिंकिले नाही कोणी । जैशी ईश्वरनिर्वाणी । तैसेपरी होतसे ॥७५॥
ब्रह्मलिखित न चुके जाण । जे जे भोगणे असेल आपण । घडे तैसे श्रुतिवचन । दुःख कोणी करू नये ॥७६॥
हरिश्चंद्र राजा देख । डोंबाघरी वाहे उदका । बळी अजिंक्य ऐका । तोही गेला पाताळा ॥७७॥
सहस्त्रकोटि वर्षे ज्यासी । आयुष्य असे रावणासी । काळ तयाप्रति ग्रासी । दुर्योदह्ना काय झाले ॥७८॥
भीष्मदेव इच्छारमनी । तेही पडले रणांगणी । परीक्षिती सर्पाभेणी । लपता काय झाले तया ॥७९॥
अनंत अवतार येणेपरी । होऊनि गेले संसारी । देव दानव येणेपरी । सकळ काळाआधीन ॥८०॥
या कारणे काळासी । कोणी जिंकिले नाही क्षितीसी । सकळ देवदानवांसी । काळ जिंकी निर्धारे ॥८१॥
काळा जिंकिता नाही कोणी । एका श्रीगुरुवाचोनि । भाव असे ज्याचे मनी । त्यासी प्रत्यक्ष असे जाणा ॥८२॥
आता तुम्ही ऐसे करणे । जावे त्वरित सहगमने । अंतकाळ होता क्षणे । श्रीगुरुदर्शना जाय म्हणे ॥८३॥
म्हणोनि भस्म तये वेळी । लाविता झाला कपाळी । रुद्राक्ष चारी तत्काळी । देता जहाला तये वेळी ॥८४॥
योगी बोले तियेसी । रुद्राक्ष बांधी कंठासी । दोनी प्रेतकर्णासी । बांधोनि दहन करावे ॥८५॥
आणिक एक सांगेन तुज । गुरुदर्शना जाई सहज । रुद्रसूक्त म्हणती द्विज । गुरुचरण प्रक्षाळिता ॥८६॥
तेचि तीर्थ घेवोनि । आपुला देह प्रोक्षोनि । प्रेतावरी आणोनि । प्रोक्षण करावे भक्तीने ॥८७॥
मग जावे सहगमनेसी । वाणे द्यावी सुवासिनींसी । अनेक द्रव्ये वेचूनि हर्षी । विप्रा तोषवावे बहुत ॥८८॥
ऐशा परी तियेसी । सांगोनि गेला तापसी । पतिव्रता भावेसी । करी आयती त्या वेळी ॥८९॥
भले ब्राह्मण बोलावूनि । षोडश कर्मे आचरोनि । प्रेतासी प्रायश्चित्त देवोनि । औपासन करविताती ॥९०॥
सुस्नात होवोनि आपण । पीतांबर नेसोन । सर्वाभरणे लेवोन । हळदी कुंकू लावितसे ॥९१॥
औपासन प्रेतासी । करविताती विधींसी । प्रेत बांधोनि काष्ठेसी । घेवोनि गेले गंगेत ॥९२॥
अग्नि घेऊनि तळहातेसी । निघाली पतिव्रता कैसी । आनंद बहु मानसी । प्रेतापुढे जातसे ॥९३॥
सोळा वरुषांचे तारुण्यपण । सुंदर रुप लावण्य । ल्याइलीसे आभरणे । लक्ष्मीसरसी दिसतसे ॥९४॥
मिळोनिया नगरनारी । पाहो आल्या सहस्त्र चारी । माथा तुकविती सकळी । पतिव्रता म्हणोनिया ॥९५॥
एक म्हणती काय नवल । पूर्ववयेसी असे बाळ । काय दैव पूर्वफळ । पतीसवे जातसे ॥९६॥
देखिले नाही पतीचे मुख । नाही जहाले की बाळक । कैसा जीव झाला एक । आनंदरूपे जातसे ॥९७॥
म्हणती शिकवा इसी । वाया का हो जीव देसी । परतूनि जाई माहेरासी । आपुल्या मातापित्याजवळी ॥९८॥
एक म्हणती ज्ञानवंता । सत्य नारी पतिव्रता । बुद्धि दे गा जगन्नाथा । सकळ स्त्रिया ऐसीच ॥९९॥
धन्य इची मातापिता । बेचाळीस उद्धरले आता । प्रेतापुढे चालता । एकैक पाउला अश्वमेधफळ ॥१००॥
येणेपरी नदीतीरासी । गेली नारी पतीसरसी । कुंड केले अग्नीसी । काष्ठे शेणी अपरिमित ॥१०१॥
अग्निकुंडसन्निधेसी । ठेविले तया प्रेतासी । बोलावोनि सुवासिनींसी । देई झाली वाण देखा ॥१०२॥
सुपे चोळी कुंकुमेसी । हळदी काजळ परियेसी । तोडर कंठसूत्रेसी । सुवासिनींसी देतसे ॥१०३॥
गंधपुष्पादि परिमळेसी । पूजा केली सुवासिनींसी । द्रव्य दिधले अपारेसी । समस्त ब्राह्मणा तये वेळी ॥१०४॥
नमन करोनि समस्तांसी । निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी । लोभ असो द्यावा म्हणतसे ॥१०५॥
माझा पिता शूलपाणी । उमा गौरी अंतःकरणी । आम्हा बोलाविले सगुणी । प्रेमभावे करूनिया ॥१०६॥
आली श्रावणी दिपवाळी । आम्ही जातो मातेजवळी । पतीसहित मने निर्मळी । जाते लोभ असो द्यावा ॥१०७॥
समागमे लोक आपुले । होते जे का सवे आले । त्यांसी सांगतसे बाळे । परतोनि जावे ग्रामासी ॥१०८॥
पुसता श्वशुरमामेसी । त्याते न सांगावे परियेसी । प्राण देतील आम्हांसी । हत्या तुम्हा घडेल ॥१०९॥
त्यासी तुम्ही सांगावे ऐसे । क्षेम आहे तीर्थवासे । भीमातीरस्थान ऐसे । श्रीगुरूचे सन्निधानी ॥११०॥
आलो श्रीगुरुदर्शनासी । आरोग्य झाले पतीसी । राहिलो आपण संतोषी । म्हणोनि सांगा घरी आमुचे ॥१११॥
ऐसे सांगा श्वशुरमामींसी । आमुचे मातापितयादिकांसी । इष्टजन सोयरियांसी । सांगा येणेपरी तुम्ही ॥११२॥
ऐसे वचन ऐकोन । दुःख पावले सकळ जन । आपण असे हास्यवदन । प्रेताजवळी उभी देखा ॥११३॥
अग्निकुंडी तये क्षणी । घालिताती काष्ठ शेणी । तो आठवण झाली झणी । योगेश्वराचा उपदेश ॥११४॥
मग रुद्राक्ष काढोनिया दोनी । बांधिले प्रेताचिया श्रवणी । कंठसूत्री दोन ठेवोनि । पुसतसे ब्राह्मणांसी ॥११५॥
विनवीतसे द्विजांसी । संकल्प केला म्या मानसी । श्रीगुरुमूर्ति आहे कैसी । आपल्या दृष्टी पाहीन ॥११६॥
दृष्टी देखोनिया स्वामीसी । त्वरित येईन अग्निकुंडापासी । आज्ञा झालिया वेगेसी । त्वरित येईन म्हणतसे ॥११७॥
ऐकोनि तियेचे वचन । बोलताती विद्वज्जन । दहन होता अस्तमान । त्वरित जाउनी तुम्ही यावे ॥११८॥
पुसोनिया विप्रांसी । निघाली नारी संगमासी । जेथे होता ह्रषीकेशी । श्रीनरसिंहसरस्वती ॥११९॥
सर्व येती नरनारी । विप्रमेळा नानापरी । कौतुक पाहती मनोहरी । पतिव्रता स्त्रियेची ॥१२०॥
जाता मार्गी स्तोत्र करी । म्हणे स्वामी नरकेसरी । अभाग्य आपुले पूर्वापरी । म्हणोनि आम्हा अव्हेरिले ॥१२१॥
तूचि दाता सर्वेश्वर । शरणागतांचा आधार । ऐसे तुझे ब्रीद थोर । कामी आपण न लाधेची ॥१२२॥
हेळामात्रे त्रिभुवनासी । रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी । सत्त्वगुणे सृष्टीसी । प्रतिपाळिसी तूचि स्वामी ॥१२३॥
तमोगुणे निश्चयेसी । प्रलय समस्त जीवांसी । त्रिगुण तूचि होसी । त्रिमूर्ति तूचि देवा ॥१२४॥
तुजपाशी सर्व सिद्धि । ओळंघिती तव विधी । देखिली आमुची कुडी बुद्धि । जाणोनि माते अव्हेरिली ॥१२५॥
एखादा नर बाधा करी । जाणोनि सांगती राजद्वारी । क्षण न लागता अवसरी । राजा साह्य करी तयांचे ॥१२६॥
रोग होता मनुष्यासी । जाऊनिया वैद्यापासी । औषध करी तात्काळेसी । आरोग्य तया होतसे ॥१२७॥
तू त्रिमूर्तीचा अवतार । ख्याति झाली अपरंपार । सर्व भक्तजना आधार । म्हणोनि सेविती सकळ जन ॥१२८॥
अपराध आपण काय केले । भेटीसी वीस गावे आले । मातापिता विसरले । तुझ्या ध्याने स्वामिया ॥१२९॥
होसी तूचि मातापिता । म्हणोनि आल्ये धावता । भेटी होता आरोग्यता । पतीस व्हावी म्हणोनिया ॥१३०॥
आपुले समान असती नारी । त्या नांदता पुत्रपौत्री । आपण झाल्ये दगडापरी । पुत्र नाही आपणासी ॥१३१॥
पति आपुला सदा रोगी । कैचा पुत्र आपणालागी । तरी याचि काम्यालागी । निघोनि आल्ये स्वामिया ॥१३२॥
आरोग्य होईल पतीसी । पुत्र होतील आपणासी । आशा धरून मानसी । आल्ये स्वामी कृपासिंधु ॥१३३॥
पुरले माझे मनोरथ । आरोग्य झाला प्राणनाथ । पुत्र झाले बहुत । नवल झाले स्वामिया ॥१३४॥
मनोरथ पावला सिद्धीसी । म्हणोनि आल्ये पुसावयासी । जाते आता परलोकासी । कीर्ति तुझी घेवोनि ॥१३५॥
ऐशा परी ध्यान करीत । आली अमरजासंगमी त्वरित । वृक्ष असे अश्वत्थ । देखती झाली स्वामिया ॥१३६॥
उभी ठाकोनिया दुरी । तया साष्टांग नमन करी । श्रीगुरु म्हणे त्या अवसरी । सुवासिनी होय ध्रुव ॥१३७॥
ऐसे म्हणता मागुती । नमन करी एकभक्ती । पुनरपि स्वामी तेणेच रीती । अष्टपुत्रा होय म्हणतसे ॥१३८॥
ऐसे ऐकोनिया वचन । हास्य करिती सकळ जन । सांगताती विस्तारोन । गुरूलागी सत्वर ॥१३९॥
विप्र म्हणती स्वामीसी । इचा पति पंचत्वासी । पावला परंधामासी । सुवासिनी केवी होय ॥१४०॥
प्रेत नेले स्मशानासी । ही आली सहगमनासी । निरोप घ्यावया तुम्हापासी । आली असे स्वामिया ॥१४१॥
तुमचा निरोप घेवोनि । अग्निकुंडा जावोनि । समागमे पतिशयनी । दहन करणे तियेसी ॥१४२॥
ऐकोनि त्याचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन । इचे स्थिर अहेवपण । मरण केवी घडे इसी ॥१४३॥
गुरु म्हणती जा वेळी । आणा प्रेत आम्हाजवळी । प्राण गेला कवणे वेळी । पाहू म्हणती अवधारा ॥१४४॥
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । आमुचे बोल जहाले इसी । अहेवपण स्थिर इसी । संदेह न धरावा मनात ॥१४५॥
या बोलाचा निर्धारू । करील आता कर्पूरगौरू । नका प्रेत संस्कारू । आणा प्रेत आम्हांजवळी ॥१४६॥
श्रीगुरूचा निरोप होता । आणो गेले धावत प्रेता । पहाती लोक कौतुका । अभिनव म्हणताती ॥१४७॥
इतुके होता ते अवसरी । आले विप्र तेथवरी । पूजा करिती मनोहरी । श्रीगुरुची भक्तीने ॥१४८॥
रुद्रसूक्त म्हणोनि । अभिषेक करिती श्रीगुरुचरणी । षोडशोपचारी विस्तारोनि । पूजा करिती भक्तीने ॥१४९॥
तीर्थपूजा नानापरी । पूजा करिती उपचारी । इतुकीया अवसरी । घेउनी आले प्रेतासी ॥१५०॥
प्रेत आणोनिया देखा । ठेविले श्रीगुरुसंमुखा । श्रीगुरु म्हणती विप्रलोका । सोडा वस्त्र दोर त्याचे ॥१५१॥
चरणतीर्थ त्यावेळी । देती तया विप्रांजवळी । प्रोक्षा म्हणती तात्काळी । प्रेत सर्वांगी स्नपन करा ॥१५२॥
श्रीगुरुनिरोपे ब्राह्मण । प्रेतासी करिती तीर्थस्नपन । अमृतदृष्टीसी आपण । पाहती प्रेत अवधारा ॥१५३॥
पाहता सुधादृष्टीकरून । प्रेत झाले संजीवन । उठोनि बैसे तत्क्षण । अंग मुरडीत परियेसा ॥१५४॥
नग्न म्हणुनी लाजत । प्रेत झाले सावचित्त । नवे वस्त्र नेसत । येवोनि बैसे एकीकडे ॥१५५॥
बोलावोनि स्त्रियेसी । पुसतसे विस्तारेसी । कोठे आणिले मजसी । यतीश्वर कोण सांगे ॥१५६॥
इतुके लोक असता का । का वो तू न करसी चेता । निद्रा आली मदोन्मत्ता । म्हणोनि सांगे स्त्रियेसी ॥१५७॥
ऐकून पतीचे वचन । सांगती झाली विस्तारून । उभी राहून दोघेजण । नमन करिती श्रीगुरूसी ॥१५८॥
चरणी माथा ठेवून । स्तोत्र करिती दोघेजण । पहाती लोक सर्व जन । महा आनंद प्रवर्तला ॥१५९॥
म्हणती पापरूपी आपण । पाप केले दारुण । पापापासाव अनुसंधान । जन्म जहालो परियेसी ॥१६०॥
दुर्बुद्धीने वर्तलो । पापसागरी बुडालो । तुझे चरण विसरलो । त्रयमूर्ती जगद्‍गुरु ॥१६१॥
सकळ जीवमात्रांसी । रक्षिता शंकर तू होसी । ख्याति तव त्रिभुवनासी । शरणागता रक्षिसी ॥१६२॥
त्राहि त्राहि जगद्‍गुरु । विश्वमूर्ति परात्परु । ब्रह्मा विष्णु शंकरु । सच्चिदानंदस्वरूप तू ॥१६३॥
त्राहि त्राहि विश्वकर्ता । त्राहि त्राहि जगद्‍भर्ता । कृपासागरा जगन्नाथा । भक्तजनविश्रामा ॥१६४॥
जय जयाजी गुरुमूर्ति । जटाजूट पशुपति । अवतरलासी तू क्षिती । मनुष्यदेह धरूनिया ॥१६५॥
त्राहि त्राहि पिनाकपाणि । त्राहि देवा तू शिरोमणि । भक्तजन पाळोनि । रक्षितोसी निरंतर ॥१६६॥
सर्वा भूती तूचि वससी । नमन तुझे चरणांसी । मज ऐसे गमलासी । मातारूप वर्तत तू ॥१६७॥
त्रिभुवनी तव करणी । माथा ठेविला तुझे चरणी । निश्चय केला माझे मनी । पुनर्जन्म नव्हे आता ॥१६८॥
विश्वकारण करिसी । हेळामात्रे सृष्टि रचिसी । मज ऐसे गमलासी । अज्ञानरूपे वर्तत ॥१६९॥
तुझे न ऐके एखादा जरी । कोपसी त्वरित त्यावरी । माझे मनी येणेपरी । निष्कलंक तू दिसतोसी ॥१७०॥
क्रोध नाही तुझे मनी । आनंदमूर्ति तूचि सहस्त्रगुणी । भक्तजना संरक्षणी । कृपासागर स्वामिया ॥१७१॥
जीवमात्रा कृपा करिसी । शरणागताते रक्षिसी । इहपर सौख्याते देसी । चतुर्विध पुरुषार्थ ॥१७२॥
तूचि करुणेचा सागरू । चिन्मात्रा अगोचरू । श्रीनरसिंहसरस्वती गुरु । क्षमा करणे स्वामिया ॥१७३॥
ऐसी नानापरीसी । स्तोत्रे केली श्रीगुरूसी । श्रीगुरुमूर्ति संतोषी । आश्वासिती तये वेळी ॥१७४॥
अष्ट पुत्र पूर्णायुषी । होतील सत्य तुजसी । हो का श्रीमंत अतिहर्षी । गेले तुमचे पूर्वदोष ॥१७५॥
चतुर्विध पुरुषार्थ । लभ्य झाले तुम्हांसी यथार्थ । सांडोनि संदेह त्वरित । सुखे असा म्हणती गुरु ॥१७६॥
इतुके होता ते अवसरी । मिळाल्या होत्या नरनारी । जयजयकार अपरंपारी । प्रवर्तला तये वेळी ॥१७७॥
नमन करिती सकळ जन । स्तोत्र करिताती गायन । करिताती नीरांजन । जयजयकार प्रवर्तला ॥१७८॥
तयामध्ये विप्र एक । होता धूर्त कुबुद्धिक । आपुले मनी आणोनि तर्क । श्रीगुरूसी पुसतसे ॥१७९॥
विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंती स्वामी परियेसी । संशय आमुचे मानसी । होत आहे स्वामिया ॥१८०॥
वेदशास्त्रे पुराणे । बोलताती सनातने । ब्रह्मलिखित सत्य जाणे । म्हणोनि वाक्य निर्धारी पा ॥१८१॥
घडला नाही अपमृत्यु यासी । दिवामरण परियेसी । आला कैसा जीव यासी । ब्रह्मलिखित सत्य मिथ्या ॥१८२॥
न कळे याच्या अभिप्राया । निरोपावे गुरुराया । गुरु म्हणती हासोनिया । तया मूर्ख ब्राह्मणासी ॥१८३॥
गुरु म्हणती तयासी । सांगेन तुज विस्तारेसी । पुढील जन्माच्या आयुष्यासी । उसने घेतले परियेसा ॥१८४॥
आम्ही तया बह्मदेवासी । मागून घेतले करुणेसी । पुढले जन्मी परियेसी । वर्षे तीस संख्या पै ॥१८५॥
भक्तजन रक्षावयासी । मागून घेतले ब्रह्मदेवासी । म्हणून सांगती विस्तारेसी । तया विप्रवर्गाते ॥१८६॥
तटस्थ झाले सकळ जन । साष्टांग करिती नमन । गेले आपुलिया भुवना । ख्याति झाली चहू राष्ट्रा ॥१८७॥
पतिव्रतेने पतीसहित । स्नान केले संगमात । अंतःकरणी संतोष बहुत । पूजा करिती भक्तीसी ॥१८८॥
अपार द्रव्य वेचोनि । विप्र तोषवोनि आराधनी । सूर्य जाता अस्तमानी । येती गुरूच्या मठासी ॥१८९॥
स्त्रीपुरुष नमस्कार । करिताती वारंवार । पूजासामग्री उपचार । आरती करिती श्रीगुरूसी ॥१९०॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले ते ऐका । कथा असे अपूर्व देखा । सांगेन ऐका एकचित्ते ॥१९१॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार । ऐकता पावन मनोहर । सकळाभीष्टे पावती ॥१९२॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । उठविले विप्राचे प्रेत । सौभाग्य देवोनि अद्भुत । परम तयासी तोषविले ॥१९३॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१९३॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Jul 25

श्री गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नम: ।
सिध्द म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे धर्म सकळ ॥१॥
योगेश्वर म्हणती स्त्रियेसी । आचार स्त्रियांचे पुससी । सांगेन तुज विस्तारेंसी । भवसागर तरावया ॥२॥
पति असतां कवण धर्म । अथवा मेलिया काय कर्म । उभयपक्षी विस्तारोन । सांगेन ऐकचित्ते ॥३॥
कथा स्कंदपुराणांत । काशीखंडीं विस्तृत । स्त्रियांचे धर्म बहुत । एकचित्तें ऐकावे ॥४॥
अगस्ति ऋषि महामुनि । जो का काशीभुवनीं । लोपमुद्रा महाज्ञानी । त्याची भार्या परियेसा ॥५॥
पतिव्रताशिरोमणि। दुजी नव्हती आणिक कोणी । असतां तेथें वर्तमानी । झाले अपूर्व परियेसा ॥६॥
त्या अगस्तिच्या शिष्यांत । विंध्य नामें असे विख्यात । पर्वतरूपें असे वर्तत । होता भूमीवर देखा ॥७॥
विध्याचळ म्हणिजे गिरी । अपूर्व वनें त्यावरी । शोभायमान महाशिखरी । बहु रम्य परियेसा ॥८॥
ब्रह्मर्षि नारदमुनि । हिंडत गेला तये स्थानीं । संतोष पावला पाहोनि । स्तुति केली तये वेळी ॥९॥
नारद म्हणे विंध्यासी । सर्वात श्रेष्ठ तूं होसी । सकळ वृक्ष तुजपासीं । मनोरम्य स्थळ तुझें ॥१०॥
परी एक असे उणें । मेरुसमान नव्हेसी जाणें स्थळ स्वल्प या कारणें । महत्व नाहीं परियेसा ॥११॥
ऐसें म्हणतां नारदमुनि । विंध्याचळ कोपोनि । वाढता झाला ते क्षणी । मेरुपरी होईन म्हणे ॥१२॥
वाढे विंध्याचळ देखा । सूर्यमंडळासंमुखा । क्रमांतरें वाढतां ऐका । गेला स्वर्गभुवनासी ॥१३॥
विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी । अंधकार अहर्निशीं । सूर्यरश्मी न दिसे कैशीं । यज्ञादि कर्मे राहिलीं ॥१४॥
ऋषि समस्त मिळोनि । विनवूं आले इंद्रभुवनी । विध्याद्रीची करणी । सांगते झाले विस्तारें ॥१५॥
इंद्र कोपे तये वेळी । गेला तया ब्रह्मयाजवळी । सांगितला वृत्तान्त सकळी । तया विंध्य पर्वताचा ॥१६॥
ब्रह्मा म्हणे इंद्रासी । आहे कारण आम्हांसी । अगस्ति असे पुरीं काशी । त्यासी दक्षिण दिशे पाठवावें ॥१७॥
दक्षिण दिशा भुमीसी । अंधार पडिला परियेसी । या कारणें अगस्तीसी । दक्षिण दिशे पाठवावें ॥१८॥
अगस्तीचा शिष्य देखा । विंध्याचल आहे जो कां । गुरु येतां संमुखा । नमितां होई दंडवत ॥१९॥
सांगेल अगस्ति शिष्यासी । वाढों नको म्हणेल त्यासी । गमन करितां शिखरेसी । भूमीसमान करील ॥२०॥
या कारणें तुम्ही आतां । काशीपुरा जावें तत्त्वतां । अगस्तीतें नमतां । दक्षिणेसी पाठवावें ॥२१॥
येणेंपरी इंद्रासी । सांगे ब्रह्मदेव हर्षी । निरोप घेऊन वेगेंसी । निघता झाला अमरनाथ ॥२२॥
देवासहित इंद्र देखा । सवें बृहस्पति ऐका । सकळ ऋषि मिळोनि देखा । आले काशी भुवनासी ॥२३॥
अगस्तीच्या आश्रमासी । पातले समस्त इंद्र ऋषि । देवगुरु महाऋषि । बृहस्पति सवें असे ॥२४॥
देखोनिया अगस्ति मुनि । सकळांतें अभिवंदोनि । अर्ध्यपाद्य देउनी । पूजा केली भक्तीनें ॥२५॥
देव आणि बृहस्पति । अगस्तीची करिती स्तुति । आणिक सवेंचि आणिती । लोपामुद्रा पतिव्रता ॥२६॥
देवगुरु बृहस्पति । सांगे पतिव्रताख्याति । पूर्वी पतिव्रता बहुती । लोपमुद्रासरी नव्हती ॥२७॥
अरुंधती सावित्री सती । अनुसया पतिव्रती । शांडिल्याची पत्नी होती । पतिव्रता विख्यात ॥२८॥
लक्ष्मी आणि पार्वती । शांतरूपा स्वयंभुपत्नी । मेनिका अतिविख्याती । हिमवंताची प्राणेश्वरी ॥२९॥
सुनीती ध्रुवाची माता । संज्ञादेवी सुर्यकांता । स्वाहादेवी विख्याता । यज्ञपुरुषप्राणेश्वरी ॥३०॥
यांहूनि आणिक ख्याता । लोपामुद्रा पतिव्रता । ऐका समस्त देवगण म्हणतां । बृहस्पति सांगतसे ॥३१॥
पतिव्रतेचें आचरण । सांगे गुरु विस्तारोन । पुरुष जेवितां प्रसाद जाण । मुख्य भोजन स्त्रियेसी ॥३२॥
आणिक सेवा ऐशी करणें । पुरुष देखोनि उभें राहणें । आज्ञेविण बैसों नेणे । अवज्ञा न करणें पतीची ॥३३॥
दिवस अखंड सेवा करणे अतिथि येतां पूजा करणें । पतिनिरोपावीण न जाणें । दानधर्म न करावा ॥३४॥
पतीची सेवा निरंतरीं । मनीं भाविजे हाचि हरि । शयनकाळी सर्व रात्रीं । सेवा करावी भक्तींसी ॥३५॥
पति निद्रिस्त झाल्यावरी । आपण शयन कीजे नारी । चोळी तानवडे ठेवावीं दुरी । तेणें पुरुषशरीर स्पर्शू नये ॥३६॥
स्पर्शे चोळी पुरुषासी । हानि होत आयुष्यासी । घेऊं नये नांव त्यासी । पति-आयुष्य उणें होय ॥३७॥
जागृत न होतां पति ऐका । पुढें उठीजे सती देखा । करणें सडासंमार्जन निका । करणें निर्मळ मंगलप्रद ॥३८॥
स्नान करूनि त्वरित । पूजूनि घ्यावें पतितीर्थ । चरणी मस्तक ठेवोनि यथार्थ । शिवासमान भावावें ॥३९॥
असतां ग्रामीं गृहीं पुरुष । सर्व शृंगार करणें हर्ष । ग्रामा गेलिया पुरुष । शृंगार आपण करुं नये ॥४०॥
पति निष्ठुर बोले जरी । आपण कोप कदा न करी । क्षमा म्हणोनी चरण धरी । राग न धरी मनांत ॥४१॥
पति येतां बाहेरुनी । सामोरी जाय तेक्षणी । सकळ कामें त्यजूनि । संमुख जाय पतिव्रता ॥४२॥
काय निरोप म्हणोनि । पुसावें ऐसें वंदोनि । जें वसे पतीच्या मनीं । त्याचपरी रहाटे ॥४३॥
पतिव्रतेचें ऐसें लक्षण । सांगेन ऐका देवगण । बहिर्द्वारी जातां जाण । अनेक दोष परियेसा ॥४४॥
बहिर्द्वारीं जाणें जरी । पाहूं नये नरनारीं । सवेंचि परतावें लवकरी । आपुले गुही असावें ॥४५॥
जरी पाहे बहिद्वारीं । उलूकयोनी जन्मे नारी । याच प्रकारे निर्धारी । पातिव्रत्य लोपामुद्रेचें ॥४६॥
लोपामुद्रा पतिव्रता । बाहेर न वचे सर्वथा । प्रात:काळ जो का होता । सडासंमार्जन करीतसे ॥४७॥
देवउपकरणी उजळोनि । गंधाक्षतांदि करूनि । पुष्पवाती पंचवर्णी । रंगमाळा देवांसी ॥४८॥
अनुष्ठानाहूनि पति येतां । सकळ आयती करी तत्त्वतां । धरोनि पतीच्या चित्ता । पतीसवें रहाटे ती ॥४९॥
पुरुषाचें उच्छिष्ट भोजन । मनोभावें करणें आपण । नसतां पुरुष ग्रामीं जाण । घ्यावा अतिथिधेनुप्रसाद ॥५०॥
अतिथीसी घालावे अन्न । अथवा धेनूतें पूजोन । भोजन करावें सगुण । पतिव्रता परियेसा ॥५१॥
गृह निर्मळ निरंतर करी । निरोपावेगळा धर्म न करी । व्रतोपवास येणेपरी । निरोपावेगळे न करी जाणा ॥५२॥
उत्साह होता नगरात । कधी पाहू न म्हणत । तीर्थयात्राविवाहार्थ । कधीही न वचे परियेसा ॥५३॥
पुरुष संतोषी असता जरी । दुश्चित नसावी त्याची नारी । पुरुष दुश्चित असता जरी । आपण संतोषी असो नये ॥५४॥
रजस्वला झालिया देखा । बोलो नये मौन्य निका । नायकावे वेद ऐका । मुख पुरुषा दाखवू नये ॥५५॥
ऐसे चारी दिवसांवरी । आचरावे तिये नारी । सुस्नात होता ते अवसरी । पुरुषमुख अवलोकिजे ॥५६॥
जरी नसे पुरुष भवनी । त्याचे रूप ध्यावे मनी । सूर्यमंडळ पाहोनि । घरात जावे पतिव्रते ॥५७॥
पुरुषआयुष्यवर्धनार्थ । हळदीकुंकुम लाविजे ख्यात । सेंदूर काजळ कंठसूत्र । फणी माथा असावी ॥५८॥
तांबूल घ्यावे सुवासिनी । असावी तिचे माथा वेणी । करी कंकणे तोडर चरणी । पुरुषासमीप येणेपरी ॥५९॥
न करी इष्टत्व शेजारणीशी । रजकस्त्रीकुंटिणीसी । जैनस्त्रीद्रव्यहीनेसी । इष्टत्व करिता हानि होय ॥६०॥
पुरुषनिंदक स्त्रियेसी । न बोलावे तियेसी । बोलता दोष घडे तिसी । पतिव्रतालक्षण ॥६१॥
सासू श्वशुर नणंद वहिनी । दीरभावाते त्यजुनी । राहता वेगळेपणी । श्वानजन्म पावती ॥६२॥
अंग धुवो नये नग्नपणे । उखळमुसळावरी न बैसणे । पाई विवरल्यावीण जाणे । फिरू नये पतिव्रते ॥६३॥
जाते उंबर्‍यावरी देखा । बैसो नये वडिलांसमुखा । पतिव्रतालक्षण ऐका । येणेपरी असावे ॥६४॥
पतीसवे विवाद । करिता पावे महाखेद । पतिअंतःकरणी उद्वेग । आपण कदा करू नये ॥६५॥
जरी असे अभाग्य पुरुष । नपुसक जरी असे देख । असे व्याधिष्ठ अविवेक । तरी देवासमान मानावा ॥६६॥
तैसा पुरुष असेल जरी । तोचि मानावा हरि । त्याचे बोलणे रहाटे तरी । परमेश्वरा प्रिय होय ॥६७॥
पतीचे मनी जी आवडी । तैसीच ल्यावी लेणी लुगडी । पति दुश्चित्त असता घडी । आपण श्रृंगार करू नये ॥६८॥
सोपस्कार पाहिजे जरी । न सांगावे आपण नारी । असता कन्या पुत्र जरी । तयामुखी सांगावे ॥६९॥
जरी नसेल जवळी कोण । वस्तूची दाखवावी खूण । अमुक पाहिजे म्हणोन । निर्धार करोनि न सांगिजे ॥७०॥
जितुके मिळाले पतीसी । संतुष्ट असावे मानसी । समर्थ पाहोनि कांक्षेसी । पतिनिंदा करू नये ॥७१॥
तीर्थयात्रे जाती लोक । म्हणूनि न गावे कौतुक । पुरुषाचे पादोदक । तेचि तीर्थ मानावे ॥७२॥
भागीरथीसमान देख । पतिचरणतीर्थ अधिक । पतिसेवा करणे मुख । त्रयमूर्ति संतुष्टती ॥७३॥
व्रत करणे असेल मनी । ते पुरुषा करावे पुसोनि । आत्मबुद्धी करिता कोणी । पति-आयुष्य उणे होय ॥७४॥
आणिक जाय नरकाप्रती । पति घेवोनि सांगाती । ऐसे बोलती वेदश्रुति । बृहस्पति सांगतसे ॥७५॥
पतीस क्रोधे उत्तर देती । श्वानयोनी जन्म पावती । जंबुक होवोनि भुंकती । ग्रामासन्निध येऊन ॥७६॥
नित्य नेम करणे नारी । पुरुष-उच्छिष्ट भोजन करी । पाद प्रक्षालोनि तीर्थधारी । घेवोनि तीर्थ जेवावे ॥७७॥
पति प्रत्यक्ष शंकर । काम्य होती मनोहर । पावे ती वैकुंठपुर । पतिसहित स्वर्गभुवना ॥७८॥
जावो नये वनभोजनासी । अथवा शेजारीगृहासी । इष्टसोयरे म्हणोनि हर्षी । प्रतिदिनी न जावे ॥७९॥
आपुला पुरुष दुर्बल किती । समर्थाची न करावी स्तुति । पति असता अनाचाररीती । आपण निंदा करू नये ॥८०॥
कैसा तरी आपुला पति । आपण करावी त्याची स्तुति । तोचि म्हणावा लक्ष्मीपति । एकभावे करोनिया ॥८१॥
सासूश्वशुर पुरुषांपुढे । नेटे बोलो नये गाढे । हासो नये त्यांपुढे । पति-आयुष्य उणे होय ॥८२॥
सासूश्वशुर त्यजून आपण । वेगळे असू म्हणे कवण । ऋक्षयोनी जन्मोन । अरण्यात हिंडेल ॥८३॥
पुरुष कोपे मारी जरी । मनी म्हणे हा मरो नारी । जन्म पावेल योनी व्याघ्री । महाघोर अरण्यात ॥८४॥
पर पुरुषाते नयनी पाहे । उपजता वरडोळी होय । पुरुषा वंचूनि विशेष खाय । ग्रामसूकर होय ती ॥८५॥
तोही जन्मी सोडोनि । उपजे वाघुळाचे योनी । आपुली विष्ठा आपण भक्षुनी । वृक्षावरी लोंबतसे ॥८६॥
पतिसंमुख निष्ठुर वचनी । उत्तर देती कोपोनि । उपजे मुकी होऊनि । सप्तजन्म दरिद्री ॥८७॥
पुरुष दुजी पत्‍नी करी । तिसी आपण वैर धरी । सप्त जन्मांवरी । दुर्भाग्यता होय अवधारा ॥८८॥
पुरुषावरी दुसरिया । दृष्टि ज्या करिती आवडिया । पतिता घरी जन्म पावोनिया । दुःखे सदा दारिद्र्य भोगिती ॥८९॥
पुरुष येता बाहेरुनी । संमुख जावे भामिनी । उदके पाद प्रक्षालुनी । विंझणा वारिजे श्रमहार ॥९०॥
पादसंवाहन भक्तीसी । मृदु वाक्य बोलिजे पतीसी । पुरुष होता संतोषी । त्रिमूर्ति संतोषती ॥९१॥
काय देती माता पिता । नेदी इष्टवर्ग बंधु भ्राता । इहपराची जोडी देता । पुरुष नारीचा देव जाण ॥९२॥
गुरु देव तीर्थे समस्ती । सर्व जाणावा आपुला पति । ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती । पतिव्रता त्याचि जाणा ॥९३॥
जीव असता शरीरासी । पवित्र होय समस्तांसी । जीव जाता क्षणे कैसी । कदा प्रेता नातळती ॥९४॥
तैसा पति प्राण आपला । पति नसता अशुचि तिला । या कारणे पतिच सकळा । प्राण आपुला जाणावा ॥९५॥
पति नसता स्त्रियेसी । सर्व अमंगळ परियेसी । विधवा म्हणजे प्रेतासरसी । अपत्य नसता अधिक जाण ॥९६॥
ग्रामास जाता परियेसी । विधवा भेटता संमुखेसी । मरण सांगे सत्य त्यासी । पुत्रासी अशुभ नव्हे जाणा ॥९७॥
माता विधवा असे जरी । पुत्रासी मंगळ शकुन करी । पुत्राविण विधवा नारी । नमन तिसी करू नये ॥९८॥
तिच्या आशीर्वादे आपण । मंगळ न होय सत्य जाण । तिचा हो का शाप मरण । तिसी कोणी बोलू नये ॥९९॥
या कारणे पतिव्रता । बरवे पुरुषासवे जाता । सर्व वैभव देहासहिता । केवी जाई परियेसा ॥१००॥
चंद्रासवे चांदणी जैसी । मेघासवे वीज कैसी । मावळता सवेचि जातसे । पतीसवे तैसे जावे ॥१०१॥
सहगमन करणे मुख्य जाण । थोर धर्मश्रुतीचे वचन । पूर्वज बेचाळीस उद्धरण । पतिव्रताधर्माने ॥१०२॥
पुरुष प्रेत झालियावरी । सहगमना जाता ते नारी । एकेक पाउली निर्धारी । अश्वमेघसहत्रपुण्य ॥१०३॥
पापी पुरुष असेल जाण । त्यासी आले जरी मरण । यमदूत नेती बांधून । नरकाप्रती परियेसा ॥१०४॥
पतिव्रता त्याची नारी । जरी सहगमन करी । जैसी सर्पासी नेती घारी । तैसी पतीते स्वर्गा नेई ॥१०५॥
सहगमन केलियावरी । पाहूनि यमदूत पळती दूरी । पतीसी सोडोनि सत्वरी । जाती यमदूत आपले पुरासी ॥१०६॥
पतिव्रताशिरोमणी । बैसविती विमानी । पावविती स्वर्गभुवनी । देवांगना ओवाळिती ॥१०७॥
यमदूत त्वरे पळती । काळाची न चाले ख्याती । पतिव्रता देखताचि चित्ती । भय वाटे म्हणताती ॥१०८॥
सूर्य भितो देखून तियेसी । तपतो तेजे मंदेसी । अग्नि भिउनी शांतीसी । उष्ण तिसी होऊ न शके ॥१०९॥
नक्षत्रे भिती पाहता तियेसी । आपुले स्थान घेईल ऐसी । जाय स्वर्गभुवनासी । पतीसहित परियेसा ॥११०॥
येणेपरी स्वर्गभुवनी । जाय नारी संतोषोनि । आपुले पतीस घेऊनि । राहे स्वर्गी निरंतर ॥११॥
तीन कोटि रोम तिसी । स्वदेह देता अग्नीसी । त्याची फळे असती कैशी । एकचित्ते ऐकावे ॥१२॥
एकेक रोम रोमासी । स्वर्गी राहे शतकोटि वर्षी । पुरुषासवे स्वानंदेसी । पतिव्रता राहे तेथे ॥१३॥
ऐसे पुण्य सहगमनासी । कन्या व्हावी ऐशी वंशी । बेचाळीस कुळे कैसी । घेऊन जाय स्वर्गाते ॥१४॥
धन्य तिची मातापिता । एकवीस कुळे उद्धरिता । धन्य पुरुषवंश ख्याता । बेचाळीस उद्धरिले ॥१५॥
ऐसे पुण्य सहगमनासी । पतिव्रतेच्या संगतीसी । आणिक सांगेन विस्तारेसी । देवगुरु म्हणतसे ॥१६॥
असेल नारी दुराचारी । अथवा व्याभिचारकर्म करी । त्याचे फळ अतिघोरी । एकचित्ते परियेसा ॥१७॥
उभय कुळे बेचाळिस । जरी असतील स्वर्गास । त्यासी घेउनि नरकास । प्रेमे जाय परियेसा ॥१८॥
अंगावरी रोम किती । तितुकी कोटि वर्षे ख्याती । नरकामध्ये पंचे निरुती । तिचे फळ ऐसे असे ॥१९॥
भूमिदेवी ऐसे म्हणे । पतिव्रतेच्या पवित्र चरणे । आपणावरी चालता क्षणे । पुनीत मी म्हणतसे ॥१२०॥
सूर्य चंद्र ऐसे म्हणती । आपली किरणे ज्योती । जरी पतिव्रतेवरी पडती । तरी आपण पावन होऊ ॥२१॥
वायु आणि वरुण । पतिव्रतेचिया स्पर्शाकारणे । पावन होऊ म्हणोन । स्पर्शे पुनीत होती ते ॥२२॥
घरोघरी स्त्रिया असती । काय करावी लावण्यसंपत्ति । जिचेनि वंश उद्धरती । तैसी स्त्री असावी की ॥२३॥
ज्याचे घरी पतिव्रता । दैवे आगळा तो तत्त्वता । करावे सुकृत जन्मशता । तरीच लाभे तैशी सती ॥२४॥
चतुर्विध पुरुषार्थ देखा । स्त्रियेच्या संगती लाघे लोका । पतिव्रता सती अधिका । पुण्यानुसार लाभे जना ॥२५॥
ज्याचे घरी नाही सती । पुण्ये त्यासी काही न घडती । यज्ञादि कर्मे ख्याति । सती असता होती जाण ॥२६॥
सती नसे ज्याचे घरी । त्यासी अरण्य नाही दूरी । वृथा जन्मोनि संसारी । कर्मबाह्य तोचि जाणा ॥२७॥
ऐसी सती मिळे ज्यासी । समस्त पुण्य होय त्यासी । पुत्रसंतान परलोकासी । साधन होय सतीचेनि ॥२८॥
स्त्रियेवीण असेल नर । तयासी न साधे कर्माचार । कर्महीन देव पितर । कर्मार्ह नव्हे कदा ॥२९॥
पुण्य जोदे गंगास्नानी । त्याहूनि पतिव्रतादर्शनी । महापापी होय पावन । सप्त जन्म पुनीत ॥१३०॥
पतिव्रतेचा आचार । सांगे पतिव्रतेसी योगेश्वर । म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे बृहस्पति देवगुरु ॥३१॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र पुण्यराशी । ऐकता पावती सद्गतीसी । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥३२॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । पतिव्रतानिरूपण विख्यात । ऐकता होय पुनीत । जे जे चिंतिले पाविजे ॥३३॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे पतिव्रताख्यानं नाम एकत्रिंशोऽध्यायः

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१३३
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Jul 22

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा… !!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

आज गुरुपौर्णिमा, आमचे आद्य दैवत, विश्वावधूत, कृपाळू, त्रिगुणात्मक- त्रैमूर्ती श्री दत्तगुरू ह्यांच्या चरणी आमची एक अबोध भेट अर्पण… सर्व दत्तभक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा… !!


Gurupurnima 2013
श्री गुरुदेव दत्त… !!

Jul 19

देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

|| विठ्ठल विठ्ठलविठ्ठल विठ्ठल ||

vitthal

 

डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात |
मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर ||
पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार |
एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम ||
जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा |
वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा ||
मंदिरी उभा विठू, करकटावरी |
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा||
(काव्य :: © myarpan.in)

 

देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना आणि अर्पण परिवाराला हार्दिक शुभेच्छा....!!
श्री गुरुदेव दत्त..!!

Jul 18

श्री गुरूचरित्र :: अध्याय तिसावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेकरूनिया ॥१॥
जय जया सिद्धमुनि । तूचि तारक भवार्णी । अज्ञानतिमिर नासोनि । ज्योतिःस्वरूप तूचि होसी ॥२॥
अविद्यामायासागरी । बुडालो होतो महापुरी । तुझी कृपा जाहली तरी । तारिले माते स्वामिया ॥३॥
तुवा दाविला निज-पंथ । जेणे जोडे परमार्थ । विश्वपालक गुरुनाथ । तूचि होसी स्वामिया ॥४॥
गुरुचरित्र सुधारस । तुवा पाजिला आम्हांस । तृप्त न होय गा मानस । तृषा आणिक होतसे ॥५॥
तुवा केलिया उपकारासी । उत्तीर्ण नव्हे मी वंशोवंशी । निजस्वरूप आम्हांसी । दाविले तुम्ही सिद्धमुनि ॥६॥
मागे कथा निरोपिलीसी । अभिनव जाहले सृष्टीसी । पतिताकरवी ख्यातीसी । वेद चारी म्हणविले ॥७॥
त्रिविक्रम महामुनेश्वरासी । बोधिले ज्ञान प्रकाशी । पुढे कथा वर्तली कैशी । विस्तारावे दातारा ॥८॥
ऐकोनि शिष्याचे वचन । संतोषला सिद्ध आपण । प्रेमभावे आलिंगोन । आश्वासीतसे तये वेळी ॥९॥
धन्य धन्य शिष्यमौळी । तुज लाधले अभीष्ट सकळी । गुरूची कृपा तात्काळी । जाहली आता परियेसा ॥१०॥
धन्य धन्य तुझी वाणी । वेध लागला श्रीगुरुचरणी । तूचि तरलासी भवार्णी । सकळाभीष्टे साधतील ॥११॥
तुवा पुसिला वृत्तांत । संतोष झाला आजि बहुत । श्रीगुरुमहिमा असे ख्यात । अगम्य असे सांगता ॥१२॥
एकेक महिमा सांगता । विस्तार होईल बहु कथा । संकेतमार्गे तुज आता । निरोपीतसे परियेसी ॥१३॥
पुढे असता वर्तमानी । तया गाणगग्रामभुवनी । महिमा होतसे नित्यनूतनी । प्रख्यातरूप होऊनिया ॥१४॥
त्रयमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर । महिमा त्याची अपरंपारु । सांगता अगम्य परियेसा ॥१५॥
महिमा तया त्रयमूर्तीची । सांगता शक्ति आम्हा कैची काया धरूनि मानवाची । चरित्र केले भूमीवरी ॥१६॥
तया स्थानी असता गुरु । ख्याति झाली अपरांपरु । प्रकाशत्व चारी राष्ट्र । समस्त येती दर्शना ॥१७॥
येती भक्त यात्रेसी । एकोभावे भक्तीसी । श्रीगुरुदर्शनमात्रेसी । सकळाभीष्ट पावती ॥१८॥
दैन्य पुरुष होती श्रियायुक्त । वांझेसी पुत्र होय त्वरित । कुष्ठे असेल जो पीडित । सुवर्ण होय देह त्याचा ॥१९॥
अक्षहीना अक्ष येती । बधिर कर्णी ऐकती । अपस्मारादि रोग जाती । श्रीगुरुचरणदर्शनमात्रे ॥२०॥
परीस लागता लोहासी । सुवर्ण होय नवल कायसी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । सकळाभीष्ट पाविजे ॥२१॥
ऐसे असता वर्तमानी । उत्तर दिशे माहुरस्थानी । होता विप्र महाघनी । नाम तया ’गोपीनाथ’ ॥२२॥
तया पुत्र होऊनि मरती । करी दुःख अनेक रीती । दत्तात्रेया आराधिती । स्त्रीपुरुष दोघेजण ॥२३॥
पुढे जाहला आणिक सुत । तया नाम ठेविती ’दत्त’ । असती आपण धनवंत । अति प्रीती वाढविले ॥२४॥
एकचि पुत्र तया घरी । अति प्रीति तयावरी । झाला पाच संवत्सरी । व्रतबंध केला तयासी ॥२५॥
वर्षे बारा होता तयासी । विवाह करिती प्रीतीसी । अतिसुंदर नोवरीसी । विचारूनि प्रीतिकरे ॥२६॥
मदनाचे रतीसरसी । रूप दिसे नोवरीसी । अति प्रीति सासूश्वशुरासी । महाप्रेमे प्रतिपाळिती ॥२७॥
दंपती एकचि वयेसी । अति प्रिय महा हर्षी । वर्धता झाली षोडशी । वर्षे तया पुत्रासी ॥२८॥
दोघे सुंदर सुलक्षण । एकापरीस एक प्राण । न विसंबिती क्षण क्षण । अतिप्रिय परियेसा ॥२९॥
ऐसी प्रेमे असता देखा । व्याधि आली त्या पुरुषा । अनेक औषधे देता ऐका । आरोग्य नोहे तयासी ॥३०॥
नवचे अन्न तयासी । सदा राहे उपवासी । त्याची भार्या प्रीतीसी । आपण न घे सदा अन्न ॥३१॥
पुरुषावरी आपुला प्राण । करी नित्य उपोषण । पतीस देता औषधे जाण । प्राशन करी परियेसा ॥३२॥
येणेपरी तीन वर्षी । झाली व्याधि-क्षयासी । पतिव्रता स्त्री कैसी । पुरुषासवे कष्टतसे ॥३३॥
पुरुषदेह क्षीण झाला । आपण तयासरसी अबला । तीर्थ घेऊनि चरणकमळा । काळ क्रमी तयाजवळी ॥३४॥
दुर्गंधि झाले देह त्याचे । जवळी न येती वैद्य साचे । पतिव्रता सुमन तिचे । न विसंबेचि क्षणभरी ॥३५॥
जितुके अन्न पतीसी । तितुकेचि ग्रास आपणासी । जैसे औषध देती त्यासी । आपण घेतसे परियेसा ॥३६॥
मातापिता दायाद गोती । समस्त तिसी वारिती । पतिव्रता ज्ञानवंती । न ऐके बोल कवणाचे ॥३७॥
दिव्यवस्त्रादि आभरणे । त्यजिली समस्त भूषणे । पुरुषावरी आपुला प्राण । काय सुख म्हणतसे ॥३८॥
उभयतांची मातापिता । महाधनिक श्रीमंता । पुत्रकन्येसी पाहता । दुःख करिती परियेसा ॥३९॥
अनेक जपानुष्ठान । मंत्रविद्या महाहवन । अपरिमित ब्राह्मणभोजन । करविताति अवधारा ॥४०॥
अनेक परीचे वैद्य येती । दिव्य रस-औषधे देती । शमन नव्हे कवणे रीती । महाव्याधीने व्यापिले ॥४१॥
पुसती जाणत्या ज्योतिष्यासि । पूजा करिती कुळदेवतांसी । काही केलिया पुत्रासी । आरोग्य नोहे सर्वथा ॥४२॥
वैद्य म्हणती तये वेळी । नव्हे बरवे त्यासी अढळी । राखील जरी चंद्रमौळी । मनुष्ययत्‍न नव्हे आता ॥४३॥
ऐसे ऐकोनि मातापिता । दुःखे दाटली करिती चिंता । जय जया जगन्नाथा । दत्तात्रेया गुरुमूर्ति ॥४४॥
आराधोनिया तुम्हांसी । पुत्र लाधलो संतोषी । पापरूप आपणासी । निधान केवी राहो पाहे ॥४५॥
एकचि पुत्र आमचे वंशी । त्याते जरी न राखिसी । प्राण देऊ तयासरसी । दत्तात्रेया स्वामिया ॥४६॥
ऐसे नानापरी देखा । दुःख करिती जननीजनका । वारीतसे पुत्र ऐका । मातापिता आलिंगोनि ॥४७॥
म्हणे आपुले भोग सरले । जितुके ऋण तुम्हा दिधले । अधिक कैचे घेऊ भले । ऋणानुबंध न चुकेचि ॥४८॥
ऐसे ऐकोनि मातापिता । दोघे जाहली मूर्च्छागता । पुत्रावरी लोळता । महादुःखे दाटोनिया ॥४९॥
म्हणती ताता पुत्रराया । आमुचीआशा झाली वाया । पोषिसी आम्हा म्हणोनिया । निश्चय केला होता आपण ॥५०॥
उबगोनिया आम्हांसी । सोडूनि केवी जाऊ पाहसी । वृद्धाप्यपणी आपणांसी । धर्म घडे केवी तुज ॥५१॥
ऐकोनि मातापितावचन । विनवीतसे आक्रंदोन । करणी ईश्वराधीन । मनुष्ययत्‍न काय चाले ॥५२॥
मातापित्यांचे ऋण । पुत्रे करावे उत्तीर्ण । तरीच पुत्रत्व पावणे । नाही तरी दगडापरी ॥५३॥
मातेने केले मज पोषण । एके घडीचे स्तनपान । उत्तीर्ण नव्हे भवार्ण । जन्मांतरी येऊनिया ॥५४॥
आपण जन्मलो तुमचे उदरी । कष्ट दाविले अतिभारी । सौख्य न देखा कवणेपरी । ऐसा आपण पापी देखा ॥५५॥
आता तुम्ही दुःख न करणे । परमार्थी दृष्टी देणे । जैसे काही असेल होणे । ब्रह्मादिका न सुटेचि ॥५६॥
येणेपरी जननीजनका । संभाषीतसे पुत्र निका । तेणेपरी स्त्रियेसी देखा । सांगतसे परियेसा ॥५७॥
म्हणे ऐक प्राणेश्वरी । झाले आमुचे दिवस सरी । मजनिमित्ते कष्टलीस भारी । वृथा गेले कष्ट तुझे ॥५८॥
पूर्वजन्मीचे वैरपण । तुजसी होता माझा शीण । म्हणोनि तूते दिधले जाण । जन्मांतरीचे कष्ट देखा ॥५९॥
तू जरी रहासी आमुचे घरी । तुज पोशितील परिकरी । तुज वाटेल कष्ट भारी । जाई आपुले माहेरा ॥६०॥
ऐसे तुझे सुंदरीपण । न लाधे आपण दैवहीन । न राहे तुझे अहेवपण । माझे अंग स्पर्शता ॥६१॥
ऐकोनि पतीचे वचन । मूर्च्छा आली तत्क्षण । माथा लावूनिया चरणा । दुःख करी तये वेळी ॥६२॥
म्हणे स्वामी प्राणेश्वरा । तुम्ही मज न अव्हेरा । तुहांसरी दातारा । आणिक नाही गति आपणा ॥६३॥
जेथे असे तुमचा देह । सवेचि असे आपण पाहे । मनी न करा संदेह । समागमी तुमची आपण ॥६४॥
ऐसे दोघांचिया वचनी । ऐकोनिया जनकजननी । देह टाकोनिया धरणी । दुःख करिती तयेवेळी ॥६५॥
उठवूनिया श्वशुरासी । संबोखीतसे सासूसी । न करा चिंता, हो भरवसी । पति आपुला वाचेल ॥६६॥
विनवीतसे तये वेळी । आम्हा राखेल चंद्रमौळी । पाठवा एखाद्या स्थळी । पति आपुला वाचेल ॥६७॥
सांगती लोक महिमा ख्याति । नरसिंहसरस्वती श्रीगुरुमूर्ति । गाणगापुरी वास करिती । तया स्वामी पहावे ॥६८॥
त्याचे दर्शनमात्रेसी । आरोग्य होईल पतीसी । आम्हा पाठवा त्वरितेसी । म्हणोनि चरणा लागली ॥६९॥
मानवली गोष्ट समस्तांसी । मातापिताश्वशुरांसी । निरोप घेऊनि सकळिकांसी । निघती झाली तये वेळी ॥७०॥
तया रोगिया करोनि डोली । घेवोनि निघाली ते बाळी । विनवीतसे तये वेळी । आपले सासूश्वशुरांसी ॥७१॥
स्थिर करूनि अंतःकरण । सुखे रहावे दोघेजण । पति असे माझा प्राण । राखील माझे कुळदैवत ॥७२॥
म्हणोनि सासूश्वशुरांसी । नमन करी प्रीतीसी । आशीर्वाद देती हर्षी । अहेवपण स्थिर होय ॥७३॥
तुझे दैवे तरी आता । आमुचा पुत्र वाचो वो माता । म्हणोनि निघाले बोळवीत । आशीर्वाद देताति ॥७४॥
येणेपरी पतीसहित । निघती झाली पतिव्रता । क्वचित्काळ मार्ग क्रमिता । आली गाणगापुरासी ॥७५॥
मार्ग क्रमिता रोगियासी । अधिक जाहला त्रिदोषी । उतरता ग्रामप्रदेशी । अतिसंकट जाहले पै ॥७६॥
विचारिता श्रीगुरूसी गेले होते संगमासी । जावे म्हणोनि दर्शनासी । निघती झाली तये वेळी ॥७७॥
पतिव्रता तये वेळ । आली आपुले पतीजवळ । पहाता जाहला अंतकाळ । प्राण गेला तत्क्षणी ॥७८॥
आकांत करी ते नारी । लोळतसे धरणीवरी । भोसकूनि घ्यावया घेता सुरी । वारिती तियेसी ग्राम लोक ॥७९॥
आफळी शिरे भूमीसी । हाणी उरी पाषाणेसी । केश मोकळे आक्रोशी । प्रलापीतसे परियेसा ॥८०॥
हा हा देवा काय केले । का मज गाईसी गांजिले । आशा करूनि आल्ये । राखिसी प्राण म्हणोनि ॥८१॥
पूजेसी जाता देउळात । पडे देऊळ करी घात । ऐशी कानी न ऐको मात । दृष्टांत झाला आपणासी ॥८२॥
उष्णकाळी तापोनि नरु । ठाकोनि जाय एखादा तरु । वृक्षचि पडे आघात थोरु । तयापरी झाले मज ॥८३॥
तृषेकरूनि पीडित । जाय मनुष्य गंगेत । संधी सुसरी करी घात । तयापरी मज झाले ॥८४॥
व्याघ्रभये पळे धेनु । जाय आधार म्हणोनु । तेथेचि वधिती यवनु । तयापरी झाले मज ॥८५॥
ऐसी पापी दैवहीन । आपुले पतीचा घेतला प्राण । मातापितरांसी त्यजून । घेवोनि आल्ये विदेशी ॥८६॥
येणेपरी दुःख करीत । पाहू आले जन समस्त । संभाषिताति दुःखशमता । अनेकपरीकरूनिया ॥८७॥
वारिताति नारी सुवासिनी । का वो दुःख करिसी कामिनी । विचार करी अंतःकरणी । होणार न चुके सकळिकांसी ॥८८॥
ऐसे म्हणता नगरनारी । तिसी दुःख झाले भारी । आठवीतसे परोपरी । आपुले जन्मकर्म सकळ ॥८९॥
ऐका तुम्ही मायबहिणी । आता कैची वाचू प्राणी । पतीसी आल्ये घेऊनि । याची आशा करोनिया ॥९०॥
आता कवणा शरण जावे । राखेल कोण मज जीवे । प्राणेश्वरा त्यजूनि जीवे । केवी वाचू म्हणतसे ॥९१॥
बाळपणी गौरीसी । पूजा केली शंकरासी । विवाह होता परियेसी । पूजा केली मंगळागौरी ॥९२॥
अहेवपणाचे आशेनी । पूजा केली म्या भवानी । सांगती माते सुवासिनी । अनेकपरी व्रतादिके ॥९३॥
जे जे सांगती माते व्रत । केली पूजा अखंडित । समस्त जाहले आता व्यर्थ । रुसली गौरी आपणावरी ॥९४॥
आता माझिये हळदीसी । चोर पडले गळेसरीसी । सर्वस्व दिधले वन्हीसी । कंकण-कंचुकी परियेसा ॥९५॥
कोठे गेले माझे पुण्य । वृथा पूजिला गौरीरमण । कैसे केले मज निर्वाण । ऐका मायबहिणी हो ॥९६॥
केवी राहू आता आपण । पति होता माझा प्राण । लोकांसरिसा नोहे जाण । प्राणेश्वर परियेसा ॥९७॥
ऐसे नानापरी देखा । करी पतिव्रता दुःखा । पतीच्या पाहूनिया मुखा । आणिक दुःख अधिक करी ॥९८॥
आलिंगोनि प्रेतासि । रोदन करी बहुवसी । आठवी आपुले पूर्व दिवसी । पूर्वस्नेह तये वेळी ॥९९॥
म्हणे पुरुषा प्राणेश्वरा । कैसे माझे त्यजिले करा । उबग आला तुम्हा थोरा । म्हणोनि माते उपेक्षिले ॥१००॥
कैसी आपण दैवहीन । तटाकी खापर लागता भिन्न । होतासि तू निधान । आयुष्य तुझे उणे जहाले ॥१०१॥
तुमचे मातापितयांसी । सांडूनि आणिले परदेशी । जेणेपरी श्रावणासी । वधिले राये दशरथे ॥१०२॥
तैसी तुमची जनकजननी । तुम्हा आणिले त्यजूनि । तुमची वार्ता ऐकोनि । प्राण त्यजितील दोघेजण ॥१०३॥
तीन हत्या भरवसी । घडल्या मज पापिणीसी । वैरिणी होय मी तुम्हांसी । पतिघातकी आपण सत्य ॥१०४॥
ऐशी पापिणी चांडाळी । निंदा करिती लोक सकळी । प्राणे घेतला मीचि बळी । प्राणेश्वरा दातारा ॥१०५॥
स्त्री नव्हे मी तुमची वैरी । जैसी तिखट शस्त्र सुरी । वेधिली तुमचे शरीरी । घेतला प्राण आपणचि ॥१०६॥
मातापिता बंधु सकळी । जरी असती तुम्हाजवळी । मुख पाहती अंतकाळी । त्यांसि विघ्न आपण केले ॥१०७॥
माझ्या वृद्ध सासूसासर्‍यात । होती तुमची आस । पुरला नाही त्यांचा सोस । त्याते सांडोनि केवी जाता ॥१०८॥
एकचि उदरी तुम्ही त्यासी । उबगलेति पोसावयासी । आम्हा कोठे ठेवूनि जासी । प्राणेश्वरा दातारा ॥१०९॥
आता आपण कोठे जावे । कवण माते पोसील जीवे । न सांगता आम्हांसी बरवे । निघोनि गेलासी प्राणेश्वरा ॥११०॥
तू माझा प्राणेश्वरु । तुझे ममत्व केवी विसरू । लोकासमान नव्हसी नरु । प्रतिपाळिले प्रीतिभावे ॥११॥
कधी नेणे पृथक्‌शयन । वामहस्त-उसेवीण । फुटतसे अंतःकरण । केवी वाचो प्राणेश्वरा ॥१२॥
किती आठवू तुझे गुण । पति नव्हसी माझा प्राण । सोडोनि जातोसि निर्वाण । कवणेपरी वाचू मी ॥१३॥
आता कवण थार्‍य जाणे । कवण घेतील मज पोसणे । ’बालविधवा’ म्हणोनि जन । निंदापवाद ठेविती ॥१४॥
एकही बुद्धि मज न सांगता । त्यजिला आत्मा प्राणनाथा । कोठे जावे आपण आता । केशवपन करूनि ॥१५॥
तुझे प्रेम होते भरल्ये । मातापितयाते विसरल्ये । त्यांचे घरा नाही गेल्ये । बोलावनी नित्य येती ॥१६॥
केवी जाऊ त्यांच्या घरा । उपेक्षितील प्राणेश्वरा । दैन्यवृत्ती दातारा । चित्तवृत्ति केवी धरू ॥१७॥
जववरी होतासी तू छत्र । सर्वा ठायी मी पवित्र । मानिती सकळ इष्टमित्र । आता निंदा करतील ॥१८॥
सासूश्वशुरापाशी जाणे । मज देखता त्याही मरणे । गृह जहाले अरण्य । तुम्हाविणे प्राणेश्वरा ॥१९॥
घेवोनि आल्ये आरोग्यासी । येथे ठेवूनि तुम्हांसी । केवी जाऊ घरासी । राक्षसी मी पापीण ॥१२०॥
ऐसे नानापरी ते नारी । दुःख करी अपरांपरी । इतुके होता अवसरी । आला तेथे सिद्ध एक ॥२१॥
भस्मांकित जटाधारी । रुद्राक्षमाळाभूषण-अळंकारी । त्रिशूळ धरिला असे करी । येऊनि जवळी उभा ठेला ॥२२॥
संभाषीतसे तया वेळी । का वो प्रलापिसी स्थूळी । जैसे लिहिले कपाळी । तयापरी होतसे ॥२३॥
पूर्वजन्मीचे तपफळ । भोगणे आपण हे अढळ । वाया रडसी निर्फळ । शोक आता करू नको ॥२४॥
दिवस आठ जरी तू रडसी । न ये प्राण प्रेतासी । जैसे लिहिले ललाटेसी । तयापरी घडेल जाण ॥२५॥
मूढपणे दुःख करिसी । समस्ता मरण तू जाणसी । कवण वाचला असे धरित्रीसी । सांग आम्हा म्हणतसे ॥२६॥
आपुला म्हणसी प्राणेश्वरु । कोठे उपजला तो नरु । तुझा जन्म झाला येरु । कवण तुझी मातापिता ॥२७॥
पूर येता गंगेत । नानापरीची काष्ठे वाहत । येऊनि एके ठायी मिळत । फाकती आणिक चहूकडे ॥२८॥
पाहे पा एका वृक्षावरी । येती पक्षी अपरांपरी । क्रमोनि प्रहर चारी । जाती मागुती चहूकडे ॥२९॥
तैसा हा संसार जाण नारी । कवण वाचला असे स्थिरी । मायामोहे कलत्रपुत्री । पति म्हणसी आपुला ॥१३०॥
गंगेमध्ये जैसा फेन । तेणेपरी देह जाण । स्थिर नोहे याचि कारण । शोक वृथा करू नको ॥३१॥
पंचभूतात्मक देह । तत्संबंधी गुण पाहे । आपुले कर्म कैसे आहे । तैसा गुण उद्भवे ॥३२॥
गुणानुबंधे कर्मे घडती । कर्मासारिखी दुःख-प्राप्ति । मायामोहाचिया रीती । मायामयसंबंधे ॥३३॥
मायासंबंधे मायागुण । उपजे सत्त्व-रज-तमोगुण । येणेचि तीन्हि देह जाण । त्रिगुणात्मक देह हा ॥३४॥
हा संसार वर्तमान । समस्त कर्माचे अधीन । सुखदुःख आपुले गुण । भोगिजे आपुले आर्जव ॥३५॥
कल्पकोटी दिवसवरी । देवास आयुष्य आहे जरी । त्यासी काळ न चुके सरी । मनुष्याचा कवण पाड ॥३६॥
काळ समस्तांसी कारण । कर्माधीन देह-गुण । स्थिर कल्पिता साधारण । पंचभूत देहासी ॥३७॥
काळ-कर्म-गुणाधीन । पंचभूतात्मक देह जाण । उपजता संतोष नको मना । मेलिया दुःख न करावे ॥३८॥
जधी गर्भ होता नरु । जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्यात थोरु । त्याचे जैसे गुणकर्म-विवरु । तैसे मरण जन्म परियेसा ॥३९॥
कोणा मृत्यु पूर्ववयसी । कवणा मृत्यु वृद्धाप्येसी । जैसे आर्जव असे ज्यासी । तयापरी घडे जाणा ॥१४०॥
पूर्वजन्मार्जवासरसी । भोगणे होय सुखदुःखअंशी । कलत्र-पुत्र-पति हर्षी । पापपुण्यांशे जाणा ॥४१॥
आयुष्य सुखदुःख जाणा । समस्त पापवश्य-पुण्य । ललाटी लिहिले असे ब्रह्माने । अढळ जाण विद्वज्जना ॥४२॥
एखादे समयी कर्मासी । लंघिजेल पुण्यवशी । देवदानवमनुष्यांसी । काळ न चुके भरवसे ॥४३॥
संसार म्हणजे स्वप्नापरी । इंद्रजाल-गारुडीसरी । मिथ्या जाण तयापरी । दुःख आपण करू नये ॥४४॥
शतसहस्त्रकोटि जन्मी । तू कवणाची कोण होतीस गृहिणी । वाया दुःख करिसी झणी । मूर्खपणेकरूनिया ॥४५॥
पंचभूतात्मक शरीर । त्वचा मांस शिरा रुधिर । मेद मज्जा अस्थि नर । विष्ठा-मूत्र-श्र्लेष्मसंबंधी ॥४६॥
ऐशा शरीरअघोरात । पाहता काय असे स्वार्थ । मल मूत्र भरले रक्त । तयाकारणे शोक का करिसी ॥४७॥
विचार पाहे पुढे आपुला । कोणेपरी मार्ग असे भला । संसारसागर पाहिजे तरला । तैसा मार्ग पाहे बाळे ॥४८॥
येणेपरी तियेसी । बोधिता झाला तापसी । ज्ञान झाले तियेसी । सांडी शोक तयावेळी ॥४९॥
कर जोडोनि तये वेळी । माथा ठेविनि चरणकमळी । विनवीतसे करुनाबहाळी । उद्धरी स्वामी म्हणोनिया ॥१५०॥
कवण मार्ग आपणासी । जैसा स्वामी निरोप देसी । जनक जननी तू आम्हासी । तारी तारी म्हणतसे ॥५१॥
कवणेपरी तरेन आपण । हा संसार भवार्ण । तुझा निरोप करीन । म्हणोनि चरणा लागली ॥५२॥
ऐकोनि तियेचे वचन । सांगे योगी प्रसन्नवदन । बोलतसे विस्तारून । आचरण स्त्रियांचे ॥५३॥
म्हणोनि सरस्वती गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकता समस्त पाप दूर । सकळाभीष्टे साधती ॥१५४॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१५४
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online