May 02

श्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिध्दाचिया चरणां । करसंपुट जोडून । विनवीतसे तया वेळी ॥१॥
जय जया सिध्द योगीश्वरा । तूंचि ज्योति अंधकारा । भक्तजनांच्या मनोहरा । भवसागरतारका ॥२॥
अज्ञानतिमिररजनींत । निजलों होतों मदोन्मत्त । गुरुचरित्र मज अमृत । प्राशन करविलें दातारा ॥३॥
त्याणें झालें मज चेत । ज्ञानसूर्यप्रकाश होत । तुझे कृपेने जागृत । जाहलों स्वामी सिध्दमुनि ॥४॥
पुढील कथाविस्तारा । निरोपावा योगीश्वरा । कृपा करी गा दातारा । म्हणोनि लागला चरणांसी ॥५॥
ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला सिध्द आपण । सांगतसे विस्तारुन । श्रीगुरुमहिमा अनुपम्य ॥६॥
शिष्योत्तमा नामंकिता । सांगेन ऐके गुरुची कथा । औदुंबरतळी अतिप्रीता । होते श्रीगुरु परियेसा ॥७॥
ऐकोनी सिध्दाचें वचन । नामधारक करी प्रश्न । अनेक पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीति औदुंवरी ॥८॥
अश्वत्थ्वृक्ष असे थोर । म्हणोनि सांगती वेद शास्त्र । श्रीगुरुप्रीति औदुंबर । कवण कारण निरोपावें ॥९॥
सिध्द म्हणे नामंकिता । सांगेन याचिया वृतांता । जधीं नरसिंह अवतार होता । हिरण्यकश्यप विदारिला ॥१०॥
नखेंकरूनि दैत्यासी । विदारिलें कोपेसीं । आंतडीं काढूनियां हषीं । घालती माळ गळां नरहरीनें ॥११॥
त्या दैत्याचे पोटी विष होतें काळ्कूटी । जैसी वडवाग्नि मोठी तैसें विष परियेसा ॥१२॥
विदारण करितां दैत्यासी । वेधलें विष त्या नखांसी । तापली नखें बहुवसी । ऐक शिष्या एकचित्तें ॥१३॥
तये समयी महालक्ष्मी । घेऊनि आली अतिप्रेमी । औदुंबरफळ नामी । शांतीकारणें नखांसी ॥१४॥
तये वेळी शीतलार्थ । नखें रोविलीं औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ॥१५॥
शांत जाहला नृसिंहदेव । देता झाला लक्ष्मीसि खेंव । संतोषोनि उभय देव । वर देती तये वेळीं ॥१६॥
तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी । " सदा फळित तूं होसी । 'कल्पवृक्ष ' तुझे नाम ॥१७॥
जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं । तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥
जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक । फळ प्राप्त होय निके । पापावेगळा होय नर ॥१९॥
वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥
तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान । अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥
तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥
तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥
जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥
सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी " । म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥
ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु । नरसिंहमूर्ति होतां उग्र । शांत झाली तयापाशी ॥२६॥
याकारणे श्रीगुरुमूर्ति नृसिंहमंत्र उपासना करिती । उग्रत्वाची करावया शांति । औदुंबरी वास असे ॥२७॥
अवतार आपण तयाचे स्थान आपुलें असे साचें । शांतवन करावया उग्रत्वाचे । म्हणोनि वास औदुंबरी ॥२८॥
सहज वृक्ष तो औदुंवर । कल्पवृक्षसमान तरु । विशेषें वास केला श्रीगुरु । कल्पिली फळे तेथे होती ॥२९॥
तया कल्पद्रुमातळी । होते श्रीगुरुस्तोममौळी । ब्रह्मा-विष्णु-नेत्रभाळी । देह मानुषी धरोनियां ॥३०॥
भक्तजनां तारणार्थ । पावन करिती समस्त तीर्थ । अवतार त्रयमूर्ति गुरुनाथ । भूमीवरी वर्तत असे ॥३१॥
वृक्षातळी अहर्निशीं । श्रीगुरु असती गौप्येसी । माध्यान्हकळसमयासी । समारंभ होय तेथें ॥३२॥
अमरेश्वर्संनिधानीं । वसई चौसष्ट योगिनी । पूजा करावया माध्यान्ही । श्रीगुरुजवळी येती नित्य ॥३३॥
नमन करूनि श्रीगुरूसी । नेती आपुले मंदिरासी । पूजा करिती विधीसीं । गंधपरिमळ-कुसुमें ॥३४॥
आरोगोनि तयां घरी । पुनरपि येती औदुंबरी । एके समयी द्विजवरी । विस्मय करिती देखोनियां ॥३५॥
म्हणती अभिन याति कैसा । न क्री भिक्षा ग्रामांत ऐसा । असतो सदा अरण्यवासा । कवणेपरी काळ कंठी ॥३६॥
पाहूं याचें वर्तमान । कैसा क्रमितो दिनमान । एखादा नर ठेवून । पाहो अंत यतीश्वराचा ॥३७॥
ऐसं विचारूनि मानसी । गेले संगमस्थानासी । माध्यान्हसमयी तयांसी । भय उअपजलें अंत:करणीं ॥३८॥
पाहूं म्हणती श्रीगुरूचा अंत । तेचि जाती यमपंथ । ऐसे विप्र मदोन्मत्त । अधोगतीचे तेचि इष्ट ॥३९॥
उपजतां भय ब्राह्मणांसी । गेले आपुलें स्थानासी । गंगनुज थडियेसी । होता वृत्ति राखीत ॥४०॥
त्याणें देखिले श्रीगुरुसी । आल्या योगिनी पूजेसी । गंगेमध्ये येतां कैसी । मार्ग जाहला जळांत ॥४१॥
विस्मय करी तो नरु । म्हणे कैसा यतीश्वरु । द्विभाग झाला गंगापूरु । केवी गेले गंगेंत ॥४२॥
श्रीगुरुतें नेऊनि। पूजा केली त्या योगिनी। भिक्षा तेथें करूनि आले मागुती बाहेर ॥४३॥
पहात होता गंगानुज । म्हणे कैसे जाहले चोज । अवतार होईल ईश्वरकाज । म्हणोनि पूजिती देवकन्या ॥४४॥
येरे दिवसीं मागुती । हाती घेऊन आरति । देवकन्या ओंवाळिती । श्रीगुरूतें नमूनियां ॥४५॥
पुन्हा गंगाप्रवाहांत । श्रीगुरु निघाले योगिनीसहित । हो कां नर होता पहात । तोही गेला सर्वेचि ॥४६॥
नदीतीरी जातां श्रीगुरु । द्विभार जाहलें गंगेत द्वारु । भीतरी दिसे अनुपम्य पुर । रत्नखचित गोपुरेसीं ॥४७॥
अमरावतीसमान नगर जैसी तेजें दिनकर । श्रीगुरु जातांचि समस्त पुर। घेऊनि आलें आरति ॥४८॥
ओवाळून आरति । नेलें आपुले मंदिराप्रति सिंहासन रत्नखचिती । बैसो घालिती तया समयीं ॥४९॥
पूजा करिती विधीसीं । जे कां उपचार षोडशी । अनेकापरी षड्रसेसीं । आरोगिलें तये वेळीं ॥५०॥
श्रीगुरु दिसती तया स्थानीं । त्रैमूर्ति जैसा शुलपाणि । पूजा घेऊनि तत्क्षणीं । मग परतले तयेवेळी ॥५१॥
देखोनियां तया नरासी । म्हणती तूं कां आलासी । विनवी तो नर स्वमियासी । सहज आलों दर्शनाते ॥५२॥
म्हणोनि लागला गुरुचरणीं । तल्लीन होवोनि अंत:करणीं । म्हणे स्वामी गिरिजारमणा । होसी त्रयमूर्ति तुंचि एक ॥५३॥
न कळे तुझें स्वरूपज्ञान । संसारमाया वेष्टून । तूं तारक या भवाणी । उध्दरावे स्वामिया ॥५४॥
तूं तारक विश्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी । अज्ञान म्हणिजे रजनीसी । ज्योति:स्वरूप तूंचि एक ॥५५॥
तुझें दर्शन होय ज्यासी । सर्वाभीष्ट फळ होय त्यासी । इहपर अप्रयासी । जोडे नरा न लागतां क्षण ॥५६॥
ऐशापरी तो देखा । स्तुति करितो नर ऐका । संतोषूनि गुरुनायकें । आश्वासिले तया वेळी ॥५७॥
श्रीगुरु म्हणती तयासी । तुझें दैन्य गेलें परियेसी । जें जें तूं इच्छिसी मानसी । सकळाभीष्ट पावशील ॥५८॥
येथील वर्तमान ऐसी । न सांगावे कवणासी । जया दिवशी प्रगट करिसी । तूतें हानी होईल जाण ॥५९॥
येणेंपरी तयासी । श्रीगुरु सांगती परियेसी ।लाले औदुंबरापाशी । गंगानुज-समागमें ॥६०॥
श्रीगुरूचा निरोप घेऊन । गेला गंगानुज आपण । वृत्तिस्थानीं जातांचि क्षण । निधान त्यासी लाधलें ॥६१॥
ज्ञानवं तो झाला नरु । नित्य सेवा करी तो गुरु । पुत्रपौत्र श्रियाकर । महानंदे वर्ततसे ॥६२॥
भक्तिभावें श्रीगुरुसी । नमन करी प्रतिदिवसीं । सेवा करी कलत्रेंसी । एकोभावेंकरूनियां ॥६३॥
वर्तता ऐसे एके दिवसी । आली पौर्णिमा माघमासीं । नमन करूनि श्रीगुरूसी । विनवीतसे तो भक्त ॥६४॥
म्हणे स्वामी जगद्गुरु । माघस्नानी प्रयाग थोरु । म्हणोनि सांगती द्विजवरु । काशीपूर महाक्षेत्र ॥६५॥
कैसे प्रयाग गयास्थान । कैसें वाराणसी भुवन । नेणों आपण यातिहीन । कृपा करणें स्वामिया ॥६६॥
श्रीगुरु म्हणती तयासी । पंचगंगासंगमेंसी । ' प्रयाग ' जाणावें भरंवसी । ' काशीपुर " तें जुगुळ ॥६७॥
दक्षिण ' गया' कोल्हापुर । त्रिस्थळी ऐसें मनोहर । जरी पहासी प्रत्यक्षाकार । दावीन तुज चाल आतां ॥६८॥
बैसले होते व्याघ्राजिनीं । धरी गा मागे दृढ करूनि । मनोवेगें तत्क्षणी । गेले प्रयागा प्रात:काळी ॥६९॥
तेथे स्नान करूनि । गेले काशीस माध्याह्निं । विश्वनाथा दाखवूनि सर्वेचि गेले गयेसी ॥७०॥
ऐसी त्रिस्थळी आचरोनि । आले परतोनि अस्तमानीं । येणेपरी । तयास्थानीं । देखता झाला तो नर ॥७१॥
विश्वनाटक श्रीगुरुमूर्ति । प्रकट झाली ऐसी किर्ति । श्रीगुरु मनीं विचारिती । आतां येथे गौप्य व्हावे ॥७२॥
ऐसेपरी तयास्थानीं । प्रकट झाले श्रीगुरुमुनि अमरेश्वरातें पुसोनि । निघत झाले तये वेळी ॥७३॥
श्रीगुरु निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी । निनविताति करूणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥७४॥
नित्य तुमचे दर्शनासी । तापत्रय हरती दोषी । अन्नपूर्णा तुम्हांपाशी । केवी राहुं स्वामिया ॥७५॥
येणेंपरी श्रीगुरुसी । योगिनी विनविती भक्तीसीं । भक्तवत्सलें संतोषीं । दिधला वर वेळीं ॥७६॥
श्रीगुरु म्हणती तयांसी। सदा असों औदुंबरेसी । प्रकटार्थ जाणे पूर्वेसी । स्थान आमुचें येथेचि असे ॥७७॥
तुम्ही रहावें येथें औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी । अन्नपूर्णा प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥७८॥
कल्पवृक्ष औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर । अमरापुर पश्चिम तीर । अमर स्थान हेंचि जाणा ॥७९॥
प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत । मनकामना होय त्वरित । तुम्हीं त्यांसी साह्य व्हावे ॥८०॥
तुम्हांसहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी । पूजा करिती जे तत्परी मनकामना पुरती जाणा ॥८१॥
येथे असे अन्नपूर्णा ।नित्य करिती आराधना । तेणें होय कामना । अतुर्विध पुरुषार्थ ॥८२॥
पापविनाशी काम्यतीर्थ । सिध्द्तीर्था स्नान करीत । सात वेळ स्नपन करीत तुम्हांसहित औदुंबरी ॥८३॥
साठी वर्षे वांझेसी । पुत्र होती शतायुषी । ब्रह्महत्या पाप नाशी । स्नानमात्रे त्या तीर्था ॥८४॥
सोमसूर्यग्रहणेसी । अथवा मास संक्रांतीसी । स्नान करिती फळें कैसी । ऐका श्रोते एकचित्तें ॥८
श्रुंग-खूर-सुवर्णेसी । अलंकृत धेनूसी । सहस्त्र कपिला ब्राह्मणांसी । सुरनदीतीरी ऐका । भोजन दिल्हें फळ असे ॥८
औदुंबरवृक्षातळीं । जप करिती जे मननिर्मळी । कोटिगुणें होती फळें । होम केलिया तैसेंचि ॥८
रुद्र जपोनि एकादशी । पूजा करिती मनोमानसी । अतिरुद्र केले फळसदृशी । एकाचित्तें परियेसा ॥
मंदगती प्रदक्षिणा । करितां होय अनंत पुण्य । पदोपदीं वाजपेययज्ञ । फळ तेथें परियेसा ॥९॥
नमन करितां येणेंपरीं। पुण्य असे अपरांपरी । प्रदक्षिणा दोन चारी । करूनी करणें नमस्कार ॥९
कुष्ठ असेल अंगहीन । त्याणें करणें प्रदक्षिणा । लक्ष वेळ करितां जाणा । देवासमान देह होय ॥९
ऐसे स्थान मनोहरु । सहज असे कल्पतरु । म्हणोनि सांगतति गुरु । चौसष्ठ योगिनींसी ॥९२॥
ऐसा निरोप देऊन । श्रीगुरु निघाले तेथून । जेथें होतें गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य ॥९३॥
विश्वरूप जगन्नाथ । अखिल ठायीं असे वसत । औदुंबरी प्रीति बहुत । नित्य तेथें वसतसे ॥९४॥
गौप्य राहोनी औदुंबरी । प्रकटरूपें गाणगापुरी । राहिले गुरु प्रीतिकरीं । प्रख्यात झाले परियेसा ॥९५॥
सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा आहे ऐसी । प्रकट झाले बहुवसी । गाणगापुरी परियेसा ॥९६॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भक्तिपूर्वक ऐकती नर । लाभे चतुर्विध पुरुषार्थ ॥९७॥
गुरुचरित्र कामधेनु । जे ऐकती भक्तजनु । त्यांचे घरी निधानु । सकळाभीष्टें पावती ॥९८॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे औदुबरवृक्षमहिमानं - योगिनीप्रतिदिनदर्शनं तथा वरप्रदानं नाम एकोनविशोऽध्याय:

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥९८॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Apr 25

श्री गुरूचरित्र :: अध्याय अठरावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ।
श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥
गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन । कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥
ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी । कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥
येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी । माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥
शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि । सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥
ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥
तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं । गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥
भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा । पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥
क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि । प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥
वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत । श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥
पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत । पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥
अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर । प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥
कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण । पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥
कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण । तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥
पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर । पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥
शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्वती । ' पंचगंगा' ऐसी ख्याति । महापातक संहारी ॥१६॥
ऐसी प्रख्यात पंचगंगा । आली कृष्णेचिया संगा । प्रयागाहूनि असे चांगा । संगमस्थान मनोहर ॥१७॥
अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम्य । जैसा प्रयागसंगम । तैसे स्थान मनोहर ॥१८॥
वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु । देव असे अमरेश्वर । तया संगमा षटकूळी ॥१९॥
जैसी वाराणसी पुरी । गंगाभागीरथी-तीरी । पंचनदींसंगम थोरी । तत्समान परियेसा ॥२०॥
अमरेश्वरसंनिधानी । आहेति चौसष्ट योगिनी । शक्तितीर्थ निर्गुणी । प्रख्यात असे परियेसा ॥२१॥
अमरेश्वरलिंग बरवे । त्यासी वंदुनि स्वभावे । पुजितां नर अमर होय । विश्वनाथ तोचि जाणा ॥२२॥
प्रयागी करितां माघस्नान । जें पुण्य होय साधन । शतगुण होय तयाहून । एक स्नाने परियेसा ॥२३॥
सहज नदीसंगमांत । प्रयागसमान असे ख्यात । अमरेश्वर परब्रह्म वस्तु । तया स्थानी वास असे ॥२४॥
याकारणें तिये स्थानी । कोटितीर्थे असती निर्गुणी । वाहे गंगो दक्षिणी । वेणीसहित निरंतर ॥२५॥
अमित तीर्थे तया स्थानी । सांगता विस्तार पुराणीं । अष्टतीर्थ ख्याति जीण । तया कृष्णातटाकांत ॥२६॥
उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिममुखा । 'शुक्लतीर्थ' नाम ऐका । ब्रहम्हत्यापाप दूर ॥२७॥
औदुंबर सन्मुखेसी । तीनी तीर्थे परियेसी । एकानंतर एक धनुषी । तीर्थे असती मनोहर ॥२८॥
'पापविनाशी' 'काम्यतीर्थ' । तिसरें सिध्द ' वरदतीर्थ । अमरेश्वरसंनिधार्थ । अनुपम्य असे भूमंडळी ॥२९॥
पुढें संगम-षट्‍कुळांत । प्रयागतीर्थ असे ख्यात । ' शाक्तितीर्थ' अमरतीर्थ' । कोटितीर्थ' परियेसा ॥३०॥
तीर्थे असती अपरांपर । सांगता असे विस्तार । याकारणें श्रीपादगुरु । राहिले तेथें द्वादशाब्दें ॥३१॥
कृष्णा वेणी नदी दोनी । पंचगंगा मिळोनी । सप्तनदीसंगम सगुणी । काय सांगू महिमा त्याची ॥३२॥
ब्रह्महत्यादि महापातकें । जळोनि जातीं स्नानें एकें । ऐसें सिध्द्स्थान निकें । सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥
काय सांगूं त्यांची महिमा । आणिक द्यावया नाहीं उपमा । दर्शनमातें होती काम्या । स्नानफळ काय वर्णू ॥३४॥
साक्षात् कल्पतरु । असे वृक्ष औदुबरु । गौप्य होऊन अगोचरु । राहिले श्रीगुरु तया स्थानी ॥३५॥
भक्तजनतारणार्थ । होणार असे ख्यात । राहिले तेथें श्रीगुरुनाथ । म्हणोनि प्रकट जाहले जाणा ॥३६॥
असता पुढें वर्तमानीं । भिक्षा करावया प्रतिदिनीं । अमरापुर ग्रामी । जाती श्रीगुरु परियेसा ॥३७॥
तया ग्रामी द्विज एक । असे वेदभ्यासक । त्याची भार्या पतिसेवक । पतिव्रतशिरोमणी ॥३८॥
सुक्षीण असे तो ब्राह्मण । शुक्लभिक्षा करी आपण । कर्ममार्गी आचरण । असे सात्विक वृत्तीनें ॥३९॥
तया विप्रमंदिरांत । असे वेल उन्नत । शेंगा निघती नित्य बहुत । त्याणे उदरपूर्ति करी ॥४०॥
एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी । वरो न मिळे परियेसीं । तया शेंगांते रांधोनि हर्षी । दिवस क्रमी येणेंपरी ॥४१॥
ऐसा तो ब्राह्मण दरिद्री । याचकारणें उदर भरी । पंचमहायज्ञ कुसरी । अतिथि पूजी भक्तीनें ॥४२॥
वर्तता श्रीगुरु एके दिवसीं । तया विप्रमंदिरासी । गेले आपण भिक्षेसी । नेलें विप्रे भक्तिनें ॥४३॥
भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । पूजा करी तो षोडशी । घेवडे-शेंगा बहुवसी । केली होती पत्र-शाका ॥४४॥
भिक्षा करून ब्राह्मणासी । आश्वासिती गुरु संतोषी । गेलें तुझे दरिद्र दोषी । म्हणोनी निघती तये वेळी ॥४५॥
तया विप्राचे गृहांत । जो का होता वेल उन्नत । घेवडा नाम विख्यात । आंगण सर्व वेष्टिलें असे ॥४६॥
तया वेलाचें झाडमूळ श्रीगुरुमूर्ति छेदिती तात्काळ । टाकोनि देती परिबळें । गेले आपण संगमासी ॥४७॥
विप्रवनिता तये वेळी । दु:ख करिती पुत्र सकळी । म्हणती पहा हो दैव बळी । कैसें अदृष्ट आपुलें ॥४८॥
आम्हीं तया यतीश्वरासी । काय उपद्रव केला त्यासी । आमुचा ग्रास छेदुनी कैसी । टाकोनि दिल्हा भूमीवरी ॥४९॥
ऐसेपरी ते नारी । दु:ख करी नानापरी । पुरुष तिचा कोप करी । म्हणे प्रारब्ध प्रमाण ॥५०॥
म्हणे स्त्रियेसी तये वेळी । जें जें होणार जया काळी । निर्माण करी चंद्रमोळी । तया आधीन । विश्व जाण ॥५१॥
विश्वव्यापक नारायण । उत्पत्तिस्थितिलया कारण । पिपीलिकादि स्थूळ-जीवन । समस्तां आहार पुरवीतसे ॥५२॥
'आयुरन्नं प्रयच्छति' । ऐसें बोले वेदश्रुति । पंचानन आहार हस्ती । केवी करी प्रत्यही ॥५३॥
चौर्‍यायशी लक्ष जीवराशी । स्थूल सूक्ष्म समस्तांसी । निर्माण केलें आहारासी । मग उत्पत्ति तदनंतरें ॥५४॥
रंकरायासी एक दृष्टी । करुनि निक्षेपण । सकृत अथवा दुष्कृत्य जाण । आपुलें आपणचि भोगणें । पुढील्यावरी काय बोल ॥५६॥
आपुलें दैव असतां उणें । पुढिल्या बोलती मूर्खपणे ।जे पेरिलें तोंचि भक्षणें । कवणावरी बोल सांगे ॥५७॥
बोल ठेविसी यतीश्वरासी । आपलें आर्जव न विचारिसी । ग्रास हरितला म्हणसी । अविद्यासागरी बुडोनि ॥५८॥
तो तारक आम्हांसी ।म्हणोनि आला भिक्षेसी । नेलें आमुचे दरिद्रदोषी । तोचि तारील आमुतें ॥५९॥
येणेंपरी स्त्रियेसी । संभाषी विप्र परियेसी । काढोनि वेलशाखेसी । टाकीता झाला गंगेत ॥६०॥
तया वेलाचें मूळ थोरी । जे कां होतें आपुले द्वारी । काढूं म्हणुनि द्विजवरी । खणिता झाला तया वेळीं ॥६१॥
काढितां वेलमूळासी । लाधला कुंभे निधानेसी । आनंद जाहला बहुवसी । घेऊनि गेला घरांत ॥६२॥
म्हणती नवल काय वर्तले । यतीश्वर आम्हां प्रसन्न्न झाले । म्हणोनि ह्या वेला छेदिलें । निधान लाधलें आम्हांसी ॥६३॥
नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरीअवतार । आम्हां भेटला दैन्यहर । म्हणती चला दर्शनासी ॥६४॥
जाऊनि संगमा श्रीगुरुसी । पूजा करिती बहुवसी । वृत्तांत सांगती तयासी । तये वेळी परियेसा ॥६५॥
श्रीगुरु म्हणती तयासी । तुम्ही न सांगणें कवणासी । प्रकट करितां आम्हांसी । नसेल लक्ष्मी तुमचे घरी ॥६६॥
ऐसेपरी तया द्विजासी । सांगे श्रीगुरु परियेसी । अखंड लक्ष्मी तुमचे वंशी । पुत्रपौत्री नांदाल ॥६७॥
ऐसा वर लधोन । गेली वनिता तो ब्राह्मण । श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रे दैन्य हरे ॥६८॥
ज्यासी होय श्रीगुरुकृपा । त्यासी कैचें दैन्य पाप । कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा । दैन्य कैंचे तया घरी ॥६९॥
दैव उणा असेल जो नरु । त्याणें आश्रयावा श्रीगुरु । तोचि उतरेल पैलपारु । पूज्य होय सकळिकांई ॥७०॥
जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी लाधेल इह-परु । अखंड लक्ष्मी त्याचे घरी । अष्टैश्वर्ये नांदती ॥७१॥
सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा असे ऐसी । भजावे तुम्हीं मनोमानसीं । कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥
गंगाधराचा कुमर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार । पुढील कथामृतसार । ऐका श्रोते एकचित्तें ॥७३॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय:

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥७३॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Apr 18

श्री गुरूचरित्र :: अध्याय सतरावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
सिद्ध म्हणे नामकरणी । गुरुभक्तशिखामणि । तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली निर्धारीं ॥१॥
पर्जन्य येतां पुढारां । जैसा येतो सूचना वारा । तैसें तुझें दैन्य-हरा । ऐकसी गुरुचरित्र कथनभेद ॥२॥
ऐसें चरित्र कामधेनु । सांगेन तुज विस्तारोन । एकचित्त करुनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥३॥
कृष्णावेणीतटाकेसी । भुवनेश्वरी-पश्चिमेसीं । औदुंबर वृक्षेसीं । राहिले श्रीगुरु परियेसा ॥४॥
गौप्यरुप असती गुरु । ठाव असे अगोचरु । अनुष्‍ठान धुरंधरु । चातुर्मास येणेंपरी ॥५॥
सिद्धस्थान असे गहन । भुवनेश्वरीसंनिधान । विशेष श्रीगुरु राहिले म्हणोन । उत्कृष्‍ट जाहलें महिमान ॥६॥
ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन । परमात्मा श्रीगुरुराणा । कां रहावें गौप्यरुपें ॥७॥
त्यासी काय असे तपस । भिक्षा मागणें काय हर्ष । संदेह माझ्या मानसास । निवारावा दातारा ॥८॥
ऐक वत्सा नामधारका । भिक्षा मागतो पिनाका । आणिक सांगेन ऐका । दत्तात्रेय तैसाचि ॥९॥
दत्तात्रेय त्रयमूर्ति । भिक्षुकरुपी असे दिसती । भक्तजनानुग्रहार्थी । तीर्थयात्रे हिंडतसे ॥१०॥
अनुपम तीर्थे भूमीवरी । असती गौप्य अपरांपरीं । श्रीगुरुमूर्ति प्रीतिकरीं । प्रगटले भक्तांलागीं ॥११॥
भक्तजनोपकारार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ । गौप्य व्हावया कारणार्थ । समस्त येऊनि मागती वर ॥१२॥
लपवितां दिनकरासी । केवीं लपे तेजोराशी । कस्तूरी ठेवितां जतनेसी । वास केवीं गौप्य होय ॥१३॥
आणिक सांगेन तुज साक्षी । गुण कैसा कल्पवृक्षीं । जेथें राहे तया क्षितीकांक्षी । कल्पिलें फळ तेथें होय ॥१४॥
याकारणें तया स्थानीं । प्रगटले गुरुमुनि । सांगेन तुज विस्तारुनि । एकचित्तें परियेसा ॥१५॥
करवीरक्षेत्र नगरांत । ब्राह्मण एक वेदरत । शास्त्रपुराण विख्यात । सांगे सकळ विद्वज्जनां ॥१६॥
अग्रवेदी असे आपण । जाणे तर्क व्याकरण । आन्हिकप्रमाण आचरण । कर्ममार्गी रत होता ॥१७॥
त्यासी जाहला एक सुत । मूर्ख असे उपजत । दैववशें मातापिता मृत । असमाधान होऊनियां ॥१८॥
वर्धतां मातापित्याघरीं बाळ । वर्षे सात जाहलीं केवळ । व्रतबंध करिती निश्चळ । तया द्विजकुमरकासी ॥१९॥
न ये स्नानसंध्या त्यासी । गायत्रीमंत्र परियेसीं । वेद कैंचा मूर्खासी । पशूसमान जहाला असे ॥२०॥
जेथें सांगती अध्ययन । जाऊनि आपण शिकूं म्हणे । तावन्मात्र शिकतांचि क्षण । सवेंचि विस्मृति होय त्यासी ॥२१॥
त्या ग्रामींचे विद्वज्जन । निंदा करिती सकळै जन । विप्रकुळीं जन्मून । ऐसा मूर्ख उपजलासी ॥२२॥
तुझा पिता ज्ञानवंत । वेदशास्त्रादि अभिज्ञात । त्याचे पोटीं कैसा केत । उपजलासी दगडापरी ॥२३॥
जळो जळो तुझें जिणें । पित्याच्या नामा आणिलें उणें । पोटीं बांधूनि पाषाण । तळें विहीरी कां न करिसी ॥२४॥
जन्मोनियां संसारीं । वृथा जाहलासी सूकरापरी । तुज गति यमपुरीं । अनाचारें वर्तसी ॥२५॥
ज्यासी विद्या असे ऐका । तोचि मनुष्यांमध्यें अधिका । जेवीं द्रव्य असे निक्षेपिका । तैसी विद्या परियेसा ॥२६॥
ज्याचे ह्रदयीं असे विद्या । त्यासी अखिल भोग सदा । यशस्वी होय सुखसंपदा । समस्तांमध्यें पूज्य तोचि ॥२७॥
श्रेष्‍ठ असे वयें थोर । विद्याहीन अपूज्य नर । अश्रेष्‍ठ असे एखादा नर । विद्या असतां पूज्यमान ॥२८॥
ज्यासी नाहीं सहोदर । त्यासी विद्या बंधु-भ्रातर । सकळिकां वंद्य होय नर । विद्या असे ऐशागुणें ॥२९॥
एखादे समयीं विदेशासी । जाय नर विद्याभ्यासी । समस्त पूजा करिती त्यासी । विदेश होय स्वदेश ॥३०॥
ज्यासी विद्या असे बहुत । तोचि होय ज्ञानवंत । त्याचे देहीं देवत्व । पूजा घेई सकळांपाशीं ॥३१॥
एखाद्या राज्याधिपतीसी । समस्त वंदिती परियेसीं । ऐसा राजा आपण हर्षी । विद्यावंतासी पूजा करी ॥३२॥
ज्याचे पदरीं नाहीं धन । त्याचें विद्याच धन जाण । विद्या शिकावी याचिकारण । नेणता होय पशूसमान ॥३३॥
ऐकोनि ब्राह्मणांचें वचन । ब्रह्मचारी करी नमन । स्वामींनीं निरोपिलें ज्ञान । विद्याभ्यास करावया ॥३४॥
जन्मांतरीं पूर्वी आपण । केलें नाहीं विद्यादान । न ये विद्या याचि कारण । त्यासी काय करणें म्हणतसे ॥३५॥
ऐसा आपण दोषी । उद्धरावें कृपेसीं । जरी असेल उपाय यासी । निरोपावें दातारा ॥३६॥
परिहासकें ते ब्राह्मण । सांगताति हांसोन । होईल पुढें तुज जनन । तधीं येईल तुज विद्या ॥३७॥
तुज कैंचा विद्याभ्यासु । नर नव्हेसि तूं साच पशु । भिक्षा मागूनि उदर पोस । अरे मूर्खा कुळनाशका ॥३८॥
ऐसें नानापरी नीचोत्तरेसीं । बोलती द्विज लोक त्यासी । वैराग्य धरुनि मानसीं । निघाला बाळ अरण्यासी ॥३९॥
मनीं झाला खेदें खिन्न । म्हणे त्यजीन आपुला प्राण । समस्त करिती दूषण । काय उपयोग जीवूनियां ॥४०॥
जळो जळो आपुलें जिणें । पशु झालों विद्याहीन । आतां वांचोनि काय कारण । म्हणोनि निघाला वैराग्यें ॥४१॥
भिल्लवडीग्रामासी । आला ब्रह्मचारी परियेसीं । अन्नोदक नेघे उपवासी । पातला निशीं दैववशें ॥४२॥
जेथें असे जगन्माता । भुवनेश्वरी विख्याता । तेथें पातला त्वरिता । करी दर्शन तये वेळीं ॥४३॥
न करी स्नान संध्या देखा । अपार करीतसे दुःखा । देवद्वारासन्मुखा । धरणें घेतलें तया वेळीं ॥४४॥
येणेंपरी दिवस तीनी । निर्वाण मन करुनि । अन्नोदक त्यजूनि । बैसला तो द्विजकुमर ॥४५॥
नव्हे कांहीं स्वप्न त्यालागोनि । म्हणोनि कोपे बहु मनीं । म्हणे अंबा भवानी । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥४६॥
आक्रोशोनि तये वेळीं । शस्त्रें घेऊनियां प्रबळी । आपुली जिव्हा तात्काळी । छेदूनि वाहे देवीचरणीं ॥४७॥
जिव्हा वाहोनि अंबेसी । मागुती म्हणे परियेसीं । जरी तूं मज उपेक्षिसी । वाहीन शिर तुझे चरणीं ॥४८॥
ऐसें निर्वाण मानसीं । क्रमिता झाला तो निशी । स्वप्न जाहलें तयासी । ऐका समस्त श्रोते जन ॥४९॥
"ऐक बाळा ब्रह्मचारी । नको आक्रोशं आम्हांवरी । असे कृष्णापश्चिमतीरीं । त्वरित जाय तयाजवळी ॥५०॥
औदुंबरवृक्षातळीं । असे तापसी महाबळी । अवतारपुरुष चंद्रमौळी । तुझी वांछा पुरवील" ॥५१॥
ऐसें स्वप्न तयासी । जाहलें अभिनव परियेसीं । जागृत होतांचि हर्षी । निघाला त्वरित तेथोनि ॥५२॥
निघाला विप्र त्वरित । पोहत गेला प्रवाहांत । पैलतटा जाऊनि त्वरित । देखता जाहला श्रीगुरुसी ॥५३॥
चरणांवरी ठेवूनि माथा । करी स्तोत्र अत्यंता । श्रीगुरुमूर्ति संतोषतां । आश्वासिती तया वेळीं ॥५४॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । माथां हस्त ठेविती । ज्ञान जाहलें त्वरिती । जिव्हा आली तात्काळ ॥५५॥
वेद-शास्त्र-पुराण । तर्क भाषा व्याकरण । समस्त त्याचें अंतःकरण । पूर्ण जाहलें तात्काळीं ॥५६॥
जैसा मानससरोवरास । वायस जातां परियेस । जैसा होय राजहंस । तैसें झालें विप्रकुमरा ॥५७॥
चिंतामणि-संपर्केसीं । सुवर्ण होय लोह कैसी । मृत्तिका पडतां जांबूनदीसी । सुवर्ण होय जेवीं देखा ॥५८॥
तैसें तया ब्राह्मणासी । गुरुचरण होतां स्पर्शी । आली अखिल विद्या त्यासी । वेदशास्त्रादि तर्क भाषा ॥५९॥
सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसी ऐका । जे जे स्थानीं वास देखा । स्थानमहिमा ऐसी असे ॥६०॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍ट साधती ॥६१॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भिल्लवडीस्थानमहिमावर्णनं-मंदमतिब्राह्मणवरप्रदानं नाम सप्तदशोऽध्यायः

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥६१॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Apr 11

श्री गुरूचरित्र :: अध्याय सोळावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे पुसत । सांगा स्वामी वृत्तांत । गुरुचरित्र विस्तारुनि ॥१॥
शिष्य समस्त गेले यात्रेसी । राहिले कोण गुरुपाशीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें दातारा ॥२॥
ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषी झाले सिद्ध मुनि । धन्य धन्य शिष्या शिरोमणि । गुरुभक्ता नामधारका ॥३॥
अविद्यामायासुषुप्तींत । निजलें होतें माझें चित्त । तुजकरितां जाहलें चेत । ज्ञानज्योति-उदय मज ॥४॥
तूंचि माझा प्राणसखा । ऐक शिष्या नामधारका । तुजकरितां जोडलों सुखा । गुरुचरित्र आठवलें ॥५॥
अज्ञानतिमिरउष्णांत । पीडोनि आलों कष्‍टत । सुधामृतसागरांत । तुवां मातें लोटिलें ॥६॥
तुवां केले उपकारासी । संतुष्‍ट झालों मानसीं । पुत्रपौत्रीं तूं नांदसी । दैन्य नाहीं तुझे घरीं ॥७॥
गुरुकृपेचा तूं बाळक । तुज मानिती सकळ लोक । संदेह न करीं घे भाक । अष्‍टैश्चर्ये नांदसी ॥८॥
गुरुचरित्रकामधेनु । सांगेन तुज विस्तारुनु । श्रीगुरू राहिले गौप्य होऊन । वैजनाथसंनिधेसीं ॥९॥
समस्त शिष्य तीर्थेसी । स्वामीनिरोपें गेले परियेसीं । होतों आपण गुरुपाशीं । सेवा करीत अनुक्रमें ॥१०॥
संवत्सर एक तया स्थानीं । होते गौप्य श्रीगुरु मुनि । अंबा आरोग्यभवानी । स्नान बरवें मनोहर ॥११॥
असतां तेथें वर्तमानीं । आला ब्राह्मण एक मुनि । श्रीगुरुतें देखोनि । नमन करी भक्तिभावें ॥१२॥
माथा ठेवूनि चरणांवरी । स्तोत्र करी परोपरी । स्वामी मातें तारीं तारीं । अज्ञानसागरीं बुडालों ॥१३॥
तप करतों बहु दिवस । स्थिर नव्हे गा मानस । याचि कारणें ज्ञानास । न दिसे मार्ग आपणातें ॥१४॥
ज्ञानाविणें तापसा । वृथा होती सायास । तुम्हां देखतां मानसा । हर्ष जाहला आजि मज ॥१५॥
गुरुची सेवा बहुत दिवस । केली नाहीं सायासें । याचिकारणें मानस । स्थिर नव्हे स्वामिया ॥१६॥
तूं तारक विश्वासी । जगद्गुरू तूंचि होसी । उपदेश करावा आम्हांसी । ज्ञान होय त्वरितेसीं ॥१७॥
ऐकोनि मुनीचें वचन । श्रीगुरू पुसती हांसोन । जाहलासी तूं केवीं मुनि । गुरुविणें सांग मज ॥१८॥
ऐसें म्हणतां श्रीगुरुमूर्ति । मुनीच्या डोळां अश्रुपाती । दुःख दाटलें अपरमिति । ऐक स्वामी गुरुराया ॥१९॥
गुरु होता आपणासी एक । अतिनिष्‍ठुर त्याचें वाक्य । मातें गांजिलें अनेक । अकृत्य सेवा सांगे मज ॥२०॥
न सांगे वेदशास्त्र आपण । तर्कभाष्यादि व्याकरण । म्हणे तुझें अंतःकरण । स्थिर नव्हे अद्यापि ॥२१॥
म्हणोनि सांगे आणिक कांहीं । आपुलें मन स्थिर नाहीं । करी त्याचे बोल वायी । आणिक कोप करी मज ॥२२॥
येणेंपरी बहुत दिवशीं । होतों तया गुरुपाशीं । बोले मातें निष्‍ठुरेसीं । कोपोनि आलों तयावरी ॥२३॥
ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । म्हणती ऐकें ब्राह्मणा । आत्मघातकी तूंचि होसी ॥२४॥
एखादा मूर्ख आपुले घरीं । मळ विसर्जी देव्हारीं । आपुलें अदृष्‍ट ऐसेपरी । म्हणोनि सांगे सकळिकां ॥२५॥
तैसें तुझें अंतःकरण । आपुलें नासिक छेदून । पुढिल्यातें अपशकुन । करुनि रहासी तूंचि एक ॥२६॥
न विचारिसी आपुले गुण । तूतें कैंचें होय ज्ञान । गुरुद्रोही तूंचि जाण । अल्पबुद्धि परियेसा ॥२७॥
आपुले गुरूचे गुणदोष । सदा उच्चार करिसी हर्षे । ज्ञान कैंचें होय मानस । स्थिर होय केवीं आतां ॥२८॥
जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु । गुरु असतां कामधेनू । वंचूनि आलासी आम्हांजवळी ॥२९॥
गुरुद्रोही कवण नर । त्यासी नाहीं इह पर । ज्ञान कैंचें होय पुरें । तया दिवांधकासी ॥३०॥
जो जाणे गुरुची सोय । त्यासी सर्व ज्ञान होय । वेदशास्‍त्र सर्व होये । गुरु संतुष्‍ट होतांचि ॥३१॥
संतुष्‍टवितां श्रीगुरुसी । अष्‍टसिद्धि आपुले वशी । क्षण न लागतां परियेसीं । वेदशास्‍त्र त्यासी साध्य ॥३२॥
ऐकोनि श्रीगुरूचें वचन । माथा श्रीगुरुचरणीं ठेवून । विनवीतसे कर जोडून । करुणावचनेंकरुनियां ॥३३॥
जय जया जगद्गुरु । निर्गुण तूं निर्विकारु । ज्ञानसागर अपरांपरु । उद्धरावें आपणातें ॥३४॥
अज्ञानमाया वेष्‍टोन । नेणे गुरु कैसा कवण । सांगा स्वामी प्रकाशोन । ज्ञान होय आपणासी ॥३५॥
कैसा गुरु ओळखावा । कोणेपरी आहे सेवा । प्रकाश करोनि सांगावा । विश्ववंद्य गुरुमूर्ति ॥३६॥
जेणें माझें मन स्थिरु । होऊनि ओळखे सोयगुरु । तैसा करणें उपकारु । म्हणोनि चरणीं लागला ॥३७॥
करुणावचन ऐकोनि । श्रीगुरुनाथ संतोषोनि । सांगताति विस्तारोनि । गुरुसेवाविधान ॥३८॥
श्रीगुरु म्हणती ऐक मुनि । गुरु म्हणजे जनकजननी । उपदेशकर्ता आहे कोणी । तोचि जाण परम गुरु ॥३९॥
गुरु विरिंचि हर जाण । स्वरुप तोचि नारायण । मन करुनि निर्वाण । सेवा करावी भक्तीनें ॥४०॥
यदर्थी कथा एक । सांगों आम्ही तत्पर ऐक । आदिपर्वी असे निक । गुरुसेवा भक्तिभावें ॥४१॥
द्वापारांतीं परियेसीं । विप्र एक धौम्यऋषी । तिघे शिष्य होते त्यासी । वेदाभ्यास करावया ॥४२॥ एक 'आरुणी' पांचाळ । दुसरा 'बैद' केवळ । तिसरा 'उपमन्यु' बाळ । सेवा करिती विद्येलागीं ॥४३॥
पूर्वी गुरुची ऐसी रीति । शिष्याकरवीं सेवा घेती । अंतःकरण त्याचें पहाती । निर्वाणवरी शिष्याचें ॥४४॥
पाहोनियां अंतःकरण । असे भक्ति निर्वाण । कृपा करिती तत्क्षण । मनकामना पुरविती ॥४५॥
ऐसा धौम्यमुनि भला । तया आरूणी-पांचाळा । एके दिवशीं निरोप दिल्हा । ऐक द्विजा एकचित्तें ॥४६॥
शिष्यासी म्हणे धौम्यमुनि । आजि तुवां जावोनि रानीं । वृत्तीसी न्यावें तटाकपाणी । जंववरी होय तृप्त भूमि ॥४७॥
असे वृत्ति तळें खालीं । तेथें पेरिली असे साळी । तेथें नेवोनि उदक घालीं । शीघ्र म्हणे शिष्यासी ॥४८॥
ऐसा गुरुचा निरोप होतां । गेला शिष्य धांवत । तटाक असे पाहतां । कालवा थोर वहातसे ॥४९॥
जेथें उदक असे वहात । अतिदरारा गर्जत । वृत्तिभूमि उन्नत । उदक केवीं चढों पाहे ॥५०॥
म्हणे आतां काय करुं । कोपतील मातें श्रीगुरु । उदक जातसे दरारू । केवीं बांधूं म्हणतसे ॥५१॥
आणूनियां शिळा दगड । बांधिता जाहला उदका आड । पाणी जातसे धडाड । जाती पाषाण वाहोनियां ॥५२॥
प्रयत्‍न करी नानापरी । कांहीं केलिया न चढे वारी । म्हणे देवा श्रीहरि । काय करुं म्हणतसे ॥५३॥
मग मनीं विचार करी । गुरूचे शेतीं न चढे वारी । प्राण त्यजीन निर्धारीं । गुरुचे वृत्तीनिमित्त ॥५४॥
निश्चय करुनि मानसीं । मनीं ध्याई श्रीगुरुसी । म्हणे आतां उपाय यासी । योजूनि यत्‍न करावा ॥५५॥
घालितां उदकप्रवाहांत । जाती पाषाण वहात । आपण आड पडों म्हणत । निर्धारिलें तया वेळीं ॥५६॥
दोन्ही हातीं धरीं दरडी । पाय टेकी दुसरेकडी । झाला आपण उदकाआड । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥५७॥
ऐसा शिष्यशिरोमणि । निर्वाण मन करितांक्षणीं । वृत्तीकडे गेलें पाणी । प्रवाहाचें अर्ध देखा ॥५८॥
अर्ध पाणी जैसें तैसें । वाहतसे नित्यसरिसें । तयामध्यें शिष्य संतोषें । बुडाला असे अवधारा ॥५९॥
ऐसा शिष्य तया स्थानीं । बुडाला असे प्रवाहपाणीं । गुरुची वृत्ति जाहली धणी । उदकपूर्ण परियेसा ॥६०॥
त्याचा गुरु धौम्यमुनि । विचार करी आपुले मनीं । दिवस गेला अस्तमानीं । अद्यापि शिष्य न ये म्हणे ॥६१॥
ऐसें आपण विचारीत । गेला आपुले वृत्तींत । जाहलें असे उदक बहुत । न देखे शिष्य तया स्थानीं ॥६२॥
म्हणे शिष्या काय जाहलें । किंवा भक्षिलें व्याघ्रव्याळें । उदकानिमित्त कष्‍ट केले । कोठें असे म्हणतसे ॥६३॥
ऐसें मनीं विचारीत । उंच स्वरें पाचारीत । अरे शिष्या सखया म्हणत । प्रेमभावें बोलावी ॥६४॥
येणेंपरी करुणावचनीं । पाचारीतसे धौम्यमुनि । शब्द पडे शिष्यकानीं । तेथूनि मग निघाला ॥६५॥
येवोनियां श्रीगुरुसी । नमन केलें भावेसीं । धौम्यमुनीं महाहर्षी । आलिंगोनि आश्वासिलें ॥६६॥
वर दिधला तया वेळीं । ऐक शिष्या स्तोममौळी । तूतें विद्या आली सकळी । वेदशास्त्रादि व्याकरण ॥६७॥
ऐसें म्हणतां तत्क्षणीं । झाला विद्यावंत ज्ञानी । लागतसे गुरुचरणीं । भक्तिभावेंकरुनियां ॥६८॥
कृपानिधि धौम्यमुनि । आपुले आश्रमा नेऊनि । निरोप दिल्हा संतोषोनि । विवाहादि आतां करीं म्हणे ॥६९॥
निरोप घेऊनि शिष्यराणा । गेला आपुले स्थाना । आणिक दोघे शिष्य जाणा । होते तया गुरुजवळी ॥७०॥
दुसरा शिष्‍य 'बैद' जाणा । गुरुची करी शुश्रूषणा । त्याचे पहावया अंतःकरणा । धौम्य गुरु म्हणतसे ॥७१॥
धौम्य म्हणे शिष्यासी । सांगेन एक तुजसी । तुवां जाऊनि अहर्निशीं । वृत्ति आमुची रक्षिजे ॥७२॥
रक्षूनियां वृत्तीसी । आणावें धान्य घरासी । ऐसें म्हणतां महाहर्षी । गेला तया वृत्तीकडे ॥७३॥
वृत्ति पिके जंववरी । अहोरात्रीं कष्‍ट करी । राशी होतां अवसरीं । आला आपुले गुरुपाशीं ॥७४॥
सांगता जाहला श्रीगुरुसी । म्हणे व्रीही भरले राशीं । आतां आणावें घरासी । काय निरोप म्हणतसे ॥७५॥
मग म्हणे धौम्यमुनि । बा रे शिष्या शिरोमणि । कष्‍ट केले बहुत रानीं । आतां धान्य आणावें ॥७६॥
म्हणोनि देती एक गाडा । तया जुंपोनि एक रेडा । गुरु म्हणे जावें पुढा । शीघ्र यावें म्हणतसे ॥७७॥
एकीकडे जुंपी रेडा । आपण ओढी दुसरीकडा । येणेंपरी घेवोनि गाडा । आला तया वृत्तीजवळी ॥७८॥
दोनी खंडी साळीसी । भरी शिष्य गाडियासी । एकीकडे रेडियासी । जुंपोनि ओढी आपण देखा ॥७९॥
रेडा चाले शीघ्रेंसीं । आपण न ये तयासरसी । मग आपुले कंठासी । बांधिता झाला जूं देखा ॥८०॥
सत्राणें तयासरसी । चालत आला मार्गासी । रुतला रेडा चिखलेंसीं । आपुले गळां ओढीतसे ॥८१॥
चिखलीं रुतला रेडा म्हणोनि । चिंता करी बहु मनीं । आपण ओढी सत्राणीं । गळां फांस पडे जैसा ॥८२॥
सोडूनियां रेडियासी । काढिलें शिष्यें गाडियासी । ओढितां आपुले गळां फांसी । पडूनि प्राण त्यजूं पाहे ॥८३॥
इतुकें होतां निर्वाणीं । सन्मुख पातला धौम्यमुनि । त्या शिष्यातें पाहोनि नयनीं । कृपा अधिक उपजली ॥८४॥
सोडूनियां शिष्यातें । आलिंगोनि करूणाभरितें । वर दिधला अभिमतें । संपन्न होसी वेदशास्त्रीं ॥८५॥
वर देतां तत्क्षणेसीं । सर्व विद्या आली त्यासी । निरोप घेऊनियां घरासी । गेला शिष्य परियेसा ॥८६॥
तिसरा शिष्य उपमन्यु । सेवेविषयीं महानिपुण । गुरुची सेवा-शुश्रूषण । बहु करी परियेसा ॥८७॥
त्यासी व्हावा बहुत आहार । म्हणोनि विद्या नोहे स्थिर । त्यासी विचार करीत तो गुरु । यातें करावा उपाय एक ॥८८॥
त्यासी म्हणे धौम्यमुनि । तुज सांगतों म्हणोनि । नित्य गुरें नेऊनि रानीं । रक्षण करीं तृणचारें ॥८९॥
ऐसें म्हणतां गुरुमुनि । नमन करी त्याचे चरणीं । गुरें नेऊनियां रानीं । चारवीत बहुवस ॥९०॥
क्षुधा लागतां आपणासी । शीघ्र आणिलीं घरासी । कोपें गुरु तयासी । म्हणे शीघ्र येतोसि कां रे ॥९१॥
सूर्य जाय अस्तमानीं । तंववरी राखीं गुरें रानीं । येणेंपरी प्रतिदिनीं । वर्तावें तुवां म्हणतसे ॥९२॥
अंगीकारोनि शिष्यराणा । गुरें घेवोनि गेला राना । क्षुधाक्रांत होऊनि जाणा । चिंतीतसे श्रीगुरुसी ॥९३॥
चरती गुरें नदीतीरीं । आपण तेथें स्नान करी । तयाजवळी घरें चारी । असती विप्रआश्रम तेथें ॥९४॥
जाऊनियां तया स्थाना । भिक्षा मागे परिपूर्ण । भोजन करी सावधान । गोधन रक्षी येणेंपरी ॥९५॥
येणेंपरी प्रतिदिवशीं । रक्षूनि आणी गुरें निशीं । वर्ततां ऐसें येरे दिवशीं । पुसता झाला धौम्यमुनि ॥९६॥
गुरु म्हणे शिष्यासी । तूं नित्य उपवासी । तुझा देह पुष्‍टीसी । कवणेपरी होतसे ॥९७॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे शिष्य उपमन्य । भिक्षा करितों प्रतिदिन । विप्रांघरीं तेथें देखा ॥९८॥
भोजन करुनि प्रतिदिवसीं । गुरें घेवोनि येतों निशीं । श्रीगुरु म्हणती तयासी । आम्हां सांडूनि केवीं भुक्ती ॥९९॥
भिक्षा मागोनि घरासी । आणोनि द्यावी प्रतिदिवसीं । मागुती जावें गुरांपाशीं । घेऊन यावें निशिकाळीं ॥१००॥
गुरुनिरोपें येरे दिवशीं । गुरें नेऊनि रानासी । मागे भिक्षा नित्य जैसी । नेऊनि दिधली घरांत ॥१०१॥
घरीं त्यासी भोजन । कधीं नव्हे परिपूर्ण । पुनरपि जाई तया स्थाना । भिक्षा करुनि जेवीतसे ॥१०२॥
नित्य भिक्षा वेळां दोनी । पहिली भिक्षा देवोनि सदनीं । दुसरी आपण भक्षूनि । काळ ऐसा कंठीतसे ॥१०३॥
येणेंपरी किंचित्काळ । वर्ततां जाहला महास्थूळ । एके दिवशीं गुरु कृपाळ । पुसतसे शिष्यातें ॥१०४॥
शिष्य सांगे वृत्तांत । जेणें आपुली क्षुधा शमत । नित्य भिक्षा मागत । वेळ दोनी म्हणतसे ॥१०५॥
एक वेळ घरासी । आणोनि देतों प्रतिदिवसीं । भिक्षा दुसरे खेपेसी । करितों भोजन आपण ॥१०६॥
ऐसें म्हणतां धौम्यमुनि । तया शिष्यावरी कोपोनि । म्हणे भिक्षा वेळ दोनी । आणूनि घरीं देईं पां ॥१०७॥
गुरुनिरोप जेणेंपरी । दोनी भिक्षा आणूनि घरीं । देता जाहला प्रीतिकरीं । मनीं क्लेश न करीच ॥१०८॥
गुरेंसहित रानांत । असे शिष्य क्षुधाक्रांत । गोवत्स होतें स्तन पीत । देखता जाहला तयासी ॥१०९॥
स्तन पीतां वांसुरासी । उच्छिष्‍ट गळे संधींसी । वायां जातें भूमीसी । म्हणोनि आपण जवळी गेला ॥११०॥
आपण असे क्षुधाक्रांत । म्हणोनि गेला धांवत । पसरुनिया दोनी हात । धरी उच्छिष्‍ट क्षीर देखा ॥१११॥
ऐसें क्षीरपान करीं । घेऊनि आपुलें उदर भरी । दोनी वेळ भिक्षा घरीं । देतसे भावभक्तीनें ॥११२॥
अधिक पुष्‍ट जाहला त्याणें । म्हणे गुरु अवलोकून । पहा हो याचें शरीरलक्षण । कैसा स्थूळ होतसे ॥११३॥
मागुती पुसे तयासी । कवणेपरी पुष्‍ट होसी । सांगे आपुले वृत्तांतासी । उच्छिष्‍ट क्षीर पान करितों ॥११४॥
ऐकोनि म्हणे शिष्यासी । मतिहीन होय उच्छिष्‍टेसीं । दोष असे बहुवसी । भक्षूं नको आजिचेनी ॥११५॥
भक्षूं नको म्हणे गुरू । नित्य नाहीं तया आहारु । दुसरे दिवशीं म्हणे येरु । काय करुं म्हणतसे ॥११६॥
येणेंपरी गुरेंसहित । जात होता रानांत । गळत होतें क्षीर बहुत । एका रुईचे झाडासी ॥११७॥
म्हणे बरवें असे क्षीर । उच्छिष्‍ट नव्हे निर्धार । पान करूं धणीवर । म्हणोनि तेथें बैसला ॥११८॥
पानें तोडूनि कुसरीं । तयामध्यें क्षीर भरी । घेत होता धणीवरी । तंव भरिलें अक्षियांत ॥११९॥
तेणें गेले नेत्र दोनी । हिंडतसे रानोवनीं । गुरें न दिसती नयनीं । म्हणोनि चिंता करीतसे ॥१२०॥
काष्‍ट नाहीं अक्षिहीन । करीतसे चिंता गोधना । गुरें पाहों जातां राना । पडिला एका आडांत ॥१२१॥
पडोनियां आडांत । चिंता करी तो अत्यंत । आतां गुरें गेलीं सत्य । बोल गुरुचा आला मज ॥१२२॥
पडिला शिष्य तया स्थानीं । दिवस गेला अस्तमानीं । चिंता करी धौम्यमुनि। अजूनि शिष्य न येचि कां ॥१२३॥
म्हणोनि गेला रानासी । देखे तेथें गोधनासी । शिष्य नाहीं म्हणोनि क्लेशीं । दीर्घस्वरें पाचारी ॥१२४॥
पाचारितां धौम्यमुनि। ध्वनि पडला शिष्यकानीं । प्रत्योत्तर देतांक्षणीं । जवळी गेला कृपाळू ॥१२५॥
ऐकोनियां वृत्तांत । उपजे कृपा अत्यंत । अश्विनी देवा स्तवीं म्हणत । निरोप दिधला तये वेळीं ॥१२६॥
निरोप देतां तये क्षणीं । अश्विनी देवता ध्याय मनीं । दृष्‍टि आली दोनी नयनीं । आला श्रीगुरुसन्मुखेसीं ॥१२७॥
येवोनि श्रीगुरुसी । नमन केलें भक्तीसीं । स्तुति केली बहुवसी । शिष्योत्तमें तये वेळीं ॥१२८॥
संतोषोनि धौम्यमुनी । तया शिष्या आलिंगोनि । म्हणे शिष्या शिरोमणी । तुष्‍टलों तुझ्या भक्तीसी ॥१२९॥
प्रसन्न होऊनि शिष्यासी । हस्त स्पर्शी मस्तकेसी । वेदशास्त्रादि तत्क्षणेसीं । आलीं तया शिष्यातें ॥१३०॥
गुरु म्हणे शिष्यासी । जावें आपुले घरासी । विवाहादि करुनि सुखेसीं । नांदत ऐस म्हणतसे ॥१३१॥
होईल तुझी बहु कीर्ति । शिष्य होतील तुज अत्यंती । 'उत्तंक' नाम विख्याति । शिष्य तुझा परियेसीं ॥१३२॥
तोचि तुझ्या दक्षिणेसी । आणील कुंडलें परियेसीं । जिंकोनियां शेषासी । कीर्तिवंत होईल ॥१३३॥
जन्मेजय रायासी । तोच करील उपदेशी । मारवील समस्त सर्पांसी । याग करुनि परियेसा ॥१३४॥
तोचि उत्तंक जाऊन । पुढें केला सर्पयज्ञ । जन्मेजयातें प्रेरुन । समस्त सर्प मारविले ॥१३५॥
ख्याति जाहली त्रिभुवनांत । तक्षक आणिला इंद्रासहित । गुरुकृपेचें सामर्थ्य । ऐसें असे परियेसा ॥१३६॥
जो नर असेल गुरुदूषक । त्यासी कैंचा परलोक । अंतीं होय कुंभीपाक । गुरुद्रोह-पातक्यासी ॥१३७॥
संतुष्‍ट करितां गुरुसी । काय न साधे तयासी । वेदशास्त्र तयासी । लाघे क्षण न लागतां ॥१३८॥
ऐसें तूं जाणोनि मानसीं । वृथा हिंडसी अविद्येसीं । जावें आपुले गुरुपाशीं । तोचि तुज तारील सत्य ॥१३९॥
त्याचें मन संतुष्‍टवितां । तुज मंत्र साध्य तत्त्वता । मन करुनि सुनिश्चिता । त्वरित जाईं म्हणितलें ॥१४०॥
ऐसा श्रीगुरू निरोप देतां । विप्र जाहला अतिज्ञाता । चरणांवरी ठेवूनि माथा । विनवीतसे तया वेळीं ॥१४१॥
जय जया गुरुमूर्ति । तूंचि साधन परमार्थी । मातें निरोपिलें प्रीतीं । तत्त्वबोध कृपेनें ॥१४२॥
गुरुद्रोही आपण सत्य । अपराध घडले मज बहुत । गुरुचें दुखविलें चित्त । आतां केवीं संतुष्‍टवावें ॥१४३॥
सुवर्णादि लोह सकळ । भिन्न होतां सांधवेल । भिन्न होतां मुक्ताफळ । केवीं पुन्हा ऐक्य होय ॥१४४॥
अंतःकरण भिन्न होतां । प्रयास असे ऐक्य करितां । ऐसें माझें मन पतित । काय उपयोग जीवूनि ॥१४५॥
ऐसें शरीर माझें द्रोही । काय उपयोग वांचून पाहीं । जीवित्वाची वासना नाहीं । प्राण त्यजीन गुरुप्रति ॥१४६॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । विनवितो ब्राह्मण हर्षी । नमूनि निघे वैराग्येसीं । निश्चय केला प्राण त्यजूं ॥१४७॥
अनुतप्त जाहला तो ब्राह्मण । निर्मळ जाहलें अंतःकरण । अग्नि लागतां जैसें तृण । भस्म होय तत्क्षणीं ॥१४८॥
जैसा कापूरराशीसी । वन्हि लागतां परियेसीं । जळोनि जाय त्वरितेसीं । तैसें तयासी जहालें ॥१४९॥
याकारणें पापासी । अनुतप्त होतां मानसीं । क्षालण होय त्वरितेसीं । शतजन्मींचें पाप जाय ॥१५०॥
निर्वाणरुपें द्विजवर । निघाला त्यजूं कलेवर । ओळखोनियां जगद्गुरु । पाचारिती तयावेळीं ॥१५१॥
बोलावोनि ब्राह्मणासी । निरोप देती कृपेसीं । न करीं चिंता तूं मानसीं । गेले तुझे दुरितदोष ॥१५२॥
वैराग्य उपजलें तुझ्या मनीं । दुष्कृतें गेलीं जळोनि । एकचित्त करुनि मनीं । स्मरें आपुले गुरुचरण ॥१५३॥
तये वेळीं श्रीगुरुसी । नमन केलें चरणासी । जगद्गुरु तूंचि होसी । त्रिमूर्तीचा अवतार ॥१५४॥
तुझी कृपा होय जरी । पापें कैंचीं या शरीरीं । उदय होतां भास्करीं । अंधकार राहे केवीं ॥१५५॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो भक्तीसीं । रोमांचळ उठती हर्षी । सददित कंठा जाहला ॥१५६॥
निर्मळ मानसीं तयावेळीं । माथा ठेवी चरणकमळीं । विनवीतसे करुणाबहाळीं । म्हणे तारीं तारीं श्रीगुरुमूर्ति ॥१५७॥
निर्वाण देखोनि अंतःकरण । प्रसन्न जाहला श्रीगुरु आपण । मस्तकीं ठेविती कर दक्षिण । तया ब्राह्मणासी परियेसा ॥१५८॥
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय बावनकसी । तैसें तया द्विजवरासी । ज्ञान जहालें परियेसा ॥१५९॥
वेदशास्त्रादि तात्काळी । मंत्रशास्त्रें आलीं सकळीं । प्रसन्न जहाला चंद्रमौळी । काय सांगूं दैव त्या द्विजाचें ॥१६०॥
आनंद जाहला ब्राह्मणासी । श्रीगुरु निरोपिती तयासी । आमुचें वाक्य तूं परियेसीं । जाय त्वरित आपुले गुरुपाशीं ॥१६१॥
जावोनियां गुरुपाशीं । नमन करीं भावेसीं । संतोषी होईल भरंवसीं । तोचि आपण सत्य मानीं ॥१६२॥
ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया ब्राह्मणा संभाषिती । निरोप घेऊनियां त्वरिती । गेला आपल्या गुरुपाशीं ॥१६३॥
निरोप देऊनि ब्राह्मणासी । श्रीगुरु निघाले परियेसीं । 'भिल्लवडी' ग्रामासी । आले भुवनेश्वरी-संनिध ॥१६४॥
कृष्णापश्चिमतटाकेसी । औदुंबर वृक्ष परियेसीं । श्रीगुरु राहिले गुप्तेसीं । एकचित्तें परियेसा ॥१६५॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी । महिमा जाहली बहुवसी । प्रख्यात तुज सांगेन ॥१६६॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥१६७॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे गुरुशुश्रूषणमाहात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्यायः

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१६७॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Apr 04

श्री गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swami श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
ऐक शिष्या नामकरणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली परियेसा ॥१॥
तूं मातें पुसतोसी । होत मन संतोषी । गौप्य व्हावया कारण कैसी । सांगेन ऐक एकचित्तें ॥२॥
महिमा प्रगट जाहली बहुत । तेणें भजती लोक अमित । काम्यार्थ व्हावे म्हणूनि समस्त । येती श्रीगुरुच्या दर्शना ॥३॥
साधु असाधु धूर्त सकळी । समस्त येती श्रीगुरुजवळी । वर्तमानीं खोटा कळी । सकळही शिष्य होऊं म्हणती ॥४॥
पाहें पां पूर्वी भार्गवराम अवतरोनि । निःक्षत्र केली मेदिनी । राज्य विप्रांसी देउनी । गेला आपण पश्चिमसमुद्रासी ॥५॥
पुनरपि जाती तयापासीं । तोही ठाव मागावयासी । याकारणें विप्रांसी । कांक्षा न सुटे परियेसा ॥६॥
उबगोनि भार्गवराम देखा । गेला सागरा मध्योदका । गौप्यरूपें असे ऐका । आणिक मागतील म्हणोनि ॥७॥
तैसे श्रीगुरुमूर्ति ऐक । राहिले गुप्त कारणिक । वर मागतील सकळिक । नाना याती येवोनियां ॥८॥
विश्वव्यापक जगदीश्वर । तो काय देऊं न शके वर । पाहूनि भक्ति पात्रानुसार । प्रसन्न होय परियेसा ॥९॥
याकारणें तया स्थानीं । श्रीगुरु होते गौप्यगुणीं । शिष्यां सकळांसि बोलावुनी । निरोप देती तीर्थयात्रे ॥१०॥
सकळ शिष्यां बोलावोनि । निरोप देती नृसिंहमुनि । समस्त तीर्थे आचरोनि । यावें भेटी श्रीशैल्या ॥११॥
ऐकोनि श्रीगुरुचे वचना । समस्त शिष्य धरिती चरणा । कृपामूर्ति श्रीगुरुराणा । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥१२॥
तुमचे दर्शनमात्रेंसी । समस्त तीर्थे आम्हांसी । आम्हीं जावें कवण ठायासी । सोडोनि चरण श्रीगुरुचे ॥१३॥
समस्त तीर्थे श्रीगुरुचरणीं । ऐसें बोलती वेदवाणी । शास्त्रींही तेंचि विवरण । असे स्वामी प्रख्यात ॥१४॥
जवळी असतां निधान । केवीं हिंडावें रानोरान । कल्पवृक्ष सांडून । केवीं जावें देवराया ॥१५॥
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । तुम्ही आश्रमी संन्यासी । राहूं नये पांच दिवशीं । एके ठायीं वास करीत ॥१६॥
चतुर्थाश्रम घेऊनि । आचरावीं तीर्थे भुवनीं । तेणें मनीं स्थिर होऊनि । मग रहावें एकस्थानीं ॥१७॥
विशेष वाक्य आमुचें एक । अंगीकारणें धर्म अधिक । तीर्थे हिंडूनि सकळिक । मग यावें आम्हांपाशीं ॥१८॥
'बहुधान्य' नाम संवत्सरासी । येऊं आम्ही श्रीशैल्यासी । तेथें आमुचे भेटीसी । यावें तुम्हीं सकळिक हो ॥१९॥
ऐसेंपरी शिष्यांसी । श्रीगुरु सांगती उपदेश । समस्त लागती चरणांस । ऐक शिष्या नामधारका ॥२०॥
शिष्य म्हणती श्रीगुरुस तुमचें वाक्य आम्हां परीस । जाऊं आम्ही भरंवसें । करुं तीर्थे भूमीवरी ॥२१॥
गुरुचें वाक्य जो न करी । तोचि पडे रौरव-घोरीं । त्याचें घर यमपुरीं । अखंड नरक भोगी जाणा ॥२२॥
जावें आम्हीं कवण तीर्था । निरोप द्यावा गुरुनाथा । तुझें वाक्य दृढ चित्ता । धरुनि जाऊं स्वामिया ॥२३॥
जे जे स्थानीं निरोप देसी । जाऊं तेथें भरंवसीं । तुझे वाक्येंचि आम्हांसी । सिद्धि होय स्वामिया ॥२४॥
ऐकोनि शिष्यांचें वचन । श्रीगुरुमूर्ति प्रसन्नवदन । निरोप देती साधारण । तीर्थयात्रे शिष्यांसी ॥२५॥
या ब्रह्मांडगोलकांत । तीर्थराज काशी विख्यात । तेथें तुम्हीं जावें त्वरित । सेवा गंगाभागीरथी ॥२६॥
भागीरथीतटाकयात्रा । साठी योजनें पवित्रा । साठी कृच्छ्र-फळ तत्र । प्रयाग गंगाद्वारीं द्विगुण ॥२७॥
यमुनानदीतटाकेसी । यात्रा वीस गांव परियेसीं । कृच्छ्र तितुकेचि जाणा ऐसी । एकोमनें अवधारा ॥२८॥
सरस्वती म्हणजे गंगा । भूमीवरी असे चांगा । चतुर्विशति गांवें अंगा । स्नान करावें तटाकीं ॥२९॥
तितुकेंचि कृच्छ्रफल त्यासी । यज्ञाचें फल परियेसीं । ब्रह्मलोकीं शाश्वतेसीं । राहे नर पितृसहित ॥३०॥
वरुणानदी कुशावर्ती । शतद्रू विपाशका ख्याती । वितस्ता नदी शरावती । नदी असती मनोहर ॥३१॥
मरुद्‌वृधा नदी थोर । असिक्री मधुमती येर । पयस्वी घृतवतीतीर । तटाकयात्रा तुम्ही करा ॥३२॥
देवनदी म्हणिजे एक । असे ख्याति भूमंडळीक । पंधरा गांवें तटाक । यात्रा तुम्हीं करावी ॥३३॥
जितुके गांव तितके कृच्छ्र । स्नानमात्रें पवित्र । ब्रह्महत्यादि पातकें नाश तत्र । मनोभावें आचरावें ॥३४॥
चंद्रभागा रेवतीसी । शरयू नदी गोमतीसी । वेदिका नदी कौशिकेसी । नित्यजला मंदाकिनी ॥३५॥
सहस्त्रवक्त्रा नदी थोर । पूर्णा पुण्यनदी येर । बाहुदा नदी अरुणा थोर । षोडश गांवें तटाकयात्रा ॥३६॥
जेथें नदीसंगम असती । तेथें स्नानपुण्य अमिती । त्रिवेणीस्नानफळें असतीं । नदीचे संगमीं स्नान करा ॥३७॥
पुष्करतीर्थ वैरोचनि । सन्निहिता नदी म्हणूनि । नदीतीर्थ असे सगुणी । गयातीर्थी स्नान करा ॥३८॥
सेतुबंध रामेश्वरीं । श्रीरंग पद्मनाभ-सरीं । पुरुषोत्तम मनोहरी । नैमिषारण्य तीर्थ असे ॥३९॥
बदरीतीर्थ नारायण । नदी असती अति पुण्य । कुरुक्षेत्रीं करा स्नान । अनंत श्रीशैल्ययात्रेसी ॥४०॥
महालयतीर्थ देखा । पितृप्रीति तर्पणें ऐका । द्विचत्वारि कुळें निका । स्वर्गासी जाती भरंवसीं ॥४१॥
केदारतीर्थ पुष्करतीर्थ । कोटिरुद्र नर्मदातीर्थ । मातृकेश्वर कुब्जतीर्थ । कोकामुखी विशेष असे ॥४२॥
प्रसादतीर्थ विजयतीर्थ । पुरी चंद्रनदीतीर्थ । गोकर्ण शंखकर्ण ख्यात । स्नान बरवें मनोहर ॥४३॥
अयोध्या मथुरा कांचीसी । द्वारावती गयेसी । शालग्रामतीर्थासी । शबलग्राम मुक्तिक्षेत्र ॥४४॥
गोदावरीतटाकेसी । योजनें सहा परियेसीं । तेथील महिमा आहे ऐसी । वांजपेय तितुकें पुण्य ॥४५॥
सव्यअपसव्य वेळ तीनी । तटाकयात्रा मनोनेमीं । स्नान करितां होय ज्ञानी । महापातकी शुद्ध होय ॥४६॥
आणिक दोनी तीर्थे असतीं । प्रयागसमान असे ख्याति । भीमेश्वर तीर्थ म्हणती । वंजरासंगम प्रख्यात ॥४७॥
कुशतर्पण तीर्थ बरवें । तटाकयात्रा द्वादश गांवें । गोदावरी-समुद्रसंगमें । षट्‌त्रिंशत कृच्छ्रफळ ॥४८॥
पूर्णा नदीतटाकेंसी । चारी गांवें आचरा हर्षी । कृष्णावेणीतीरासी । पंधरा गांवें तटाकयात्रा ॥४९॥
तुंगभद्रातीर बरवें । तटाकयात्रा वीस गांवें । पंपासरोवर स्वभावें । अनंतमहिमा परियेसा ॥५०॥
हरिहरक्षेत्र असे ख्याति । समस्त दोष परिहरती । तैसीच असे भीमरथी । दहा गांवें तटाकयात्रा ॥५१॥
पांडुरंग मातुलिंग । क्षेत्र बरवें पुरी गाणग । तीर्थे असती तेथें चांग । अष्टतीर्थे मनोहर ॥५२॥
अमरजासंगमांत । कोटि तीर्थे असतीं ख्यात । वृक्ष असे अश्वत्थ । कल्पवृक्ष तोचि जाणा ॥५३॥
तया अश्वत्थसन्मुखेंसी । नृसिंहतीर्थ परियेसीं । तया उत्तरभागेसी । वाराणसी तीर्थ असे ॥५४॥
तया पूर्वभागेसी । तीर्थ पापविनाशी । तदनंतर कोटितीर्थ विशेष । पुढें रुद्रपादतीर्थ असे ॥५५॥
चक्रतीर्थ असे एक । केशव देवनायक । ते प्रत्यक्ष द्वारावती देख । मन्मथतीर्थ पुढें असे ॥५६॥
कल्लेश्वर देवस्थान । असे तेथें गंधर्वभुवन । ठाव असे अनुपम्य । सिद्धभूमि गाणगापुर ॥५७॥
तेथें जे अनुष्‍ठान करिती । तया इष्‍टार्थ होय त्वरितीं । कल्पवृक्ष आश्रयती । कान नोहे मनकामना ॥५८॥
काकिणीसंगम बरवा । भीमातीर क्षेत्र नांवा । अनंत पुण्य स्वभावा । प्रयागासमान असे देखा ॥५९॥
तुंगभद्रा वरदा नदी । संगमस्थानीं तपोनिधी । मलापहारीसंगमीं आधीं । पापें जातीं शतजन्मांचीं ॥६०॥
निवृत्तिसंगम असे ख्याति । ब्रह्महत्या नाश होती । जावें तुम्हीं त्वरिती । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥६१॥
सिंहराशीं बृह्स्पति । येतां तीर्थे संतोषती । समस्त तीर्थी भागीरथी । येऊनियां ऐक्य होय ॥६२॥
कन्यागतीं कृष्णेप्रती । त्वरित येते भागीरथी । तुंगभद्रा तुळागतीं । सुरनदीप्रवेश परियेसा ॥६३॥
कर्काटकासी सूर्य येतां । मलप्रहरा कृष्णासंयुता । सर्व जन स्नान करितां । ब्रह्महत्या पापें जातीं ॥६४॥
भीमाकृष्णासंगमेसीं । स्नान करितां परियेसीं । साठ जन्म विप्रवंशीं । उपजे नर परियेसा ॥६५॥
तुंगभद्रासंगमीं देखा । त्याहूनि त्रिगुण अधिका । निवृत्तिसंगमीं ऐका । चतुर्गुण त्याहूनि ॥६६॥
पाताळगंगेचिये स्नानीं । मल्लिकार्जुनदर्शनीं । षड्‌गुण फल तयाहूनि । पुनरावृत्ति त्यासी नाहीं ॥६७॥
लिंगालयीं पुण्य द्विगुण । समुद्रकृष्णासंगमीं अगण्य । कावेरीसंगमीं पंधरा गुण । स्नान करा मनोभावें ॥६८॥
ताम्रपर्णी याचिपरी । पुण्य असंख्य स्नानमात्रीं । कृतमालानदीतीरीं । सर्व पाप परिहरे ॥६९॥
पयस्विनी नदी आणिक । भवनाशिनी अतिविशेष । सर्व पापें हरती ऐक । समुद्रस्कंधदर्शनें ॥७०॥
शेषाद्रिक्षेत्र श्रीरंगनाथ । पद्मनाभ श्रीमदनंत । पूजा करोनि जावें त्वरित । त्रिनामल्लक्षेत्रासी ॥७१॥
समस्त तीर्थांसमान । असे आणिक कुंभकोण । कन्याकुमारी-दर्शन । मत्स्यतीर्थीं स्नान करा ॥७२॥
पक्षितीर्थ असे बरवें । रामेश्वर धनुष्कोटी नावें । कावेरी तीर्थ बरवें । रंगनाथा संनिध ॥७३॥
पुरुषोत्तम चंद्रकुंडेसीं । महालक्ष्मी कोल्हापुरासी । कोटितीर्थ परियेसीं । दक्षिण काशी करवीरस्थान ॥७४॥
महाबळेश्वर तीर्थ बरवें । कृष्णाउगम तेथें पहावें । जेथें असे नगर 'बहें' । पुण्यक्षेत्र रामेश्वर ॥७५॥
तयासंनिध असे ठाव । कोल्हग्रामीं नृसिंहदेव । परमात्मा सदाशिव । तोचि असे प्रत्यक्ष ॥७६॥
भिल्लवडी कृष्णातीरीं । शक्ति असे भुवनेश्वरी । तेथें तप करिती जरी । तेचि ईश्वरीं ऐक्यता ॥७७॥
वरुणासंगमीं बरवें । तेथें तुम्ही मनोभावें । स्नान करा मार्कंडेय-नांवें । संगमेश्वरू पूजावा ॥७८॥
ऋषींचे आश्रम । कृष्णातीरीं असती उत्तम । स्नान करितां होय ज्ञान । तयासंनिध कृष्णेपुढें ॥७९॥
पुढें कृष्णाप्रवाहांत । अमरापुर असे ख्यात । पंचगंगासंगमांत । प्रयागाहूनि पुण्य अधिक ॥८०॥
अखिल तीर्थे तया स्थानीं । तप करिती सकळ मुनि । सिद्ध होय त्वरित ज्ञानी । अनुपम क्षेत्र परियेसा ॥८१॥
ऐसें प्रख्यात तया स्थानीं । अनुष्‍ठितां दिवस तीनी । अखिलाभीष्‍ट पावोनि । पावती त्वरित परमार्थी ॥८२॥
जुगालय तीर्थ बरवें । दृष्‍टीं पडतां मुक्त व्हावें । शूर्पालय तीर्थ बरवें । असे पुढें परियेसा ॥८३॥
विश्वामित्रऋषि ख्याति । तप 'छाया' भगवती । तेथें समस्त दोष जाती । मलप्रहरासंगमीं ॥८४॥
कपिलऋषि विष्णुमूर्ति । प्रसन्न त्यासि गायत्री । श्वेतशृंगीं प्रख्याति । उत्तरवाहिनी कृष्णा असे ॥८५॥
तया स्थानीं स्नान करितां । काशीहूनि शतगुणिता । एक मंत्र तेथें जपतां । कोटीगुणें फळ असे ॥८६॥
आणिक असे तीर्थ बरवें । केदारेश्वरातें पहावें । पीठापुरीं दत्तात्रेयदेव - । वास असे सनातन ॥८७॥
आणिक असे तीर्थ थोरी । प्रख्यात नामें मणिगिरि । सप्तऋषीं प्रीतिकरीं । तप केलें बहु दिवस ॥८८॥
वृषभाद्रि कल्याण नगरी । तीर्थे असतीं अपरंपारी । नव्हे संसारयेरझारी । तया क्षेत्रा आचरावें ॥८९॥
अहोबळाचें दर्शन । साठी यज्ञ पुण्य जाण । श्रीगिरीचें दर्शन । नव्हे जन्म मागुती ॥९०॥
समस्त तीर्थे भूमीवरी । आचरावीं परिकरी । रजस्वला होतां सरी । स्नान करितां दोष होय ॥९१॥
संक्रांति कर्काटक धरुनि । त्यजावे तुम्हीं मास दोनी । नदीतीरीं वास करिती कोणी । त्यांसी कांहीं दोष नाहीं ॥९२॥
तयांमध्यें विशेष । त्यजावें तुम्हीं तीन दिवस । रजस्वला नदी सुरस । महानदी येणेंपरी ॥९३॥
भागीरथी गौतमीसी । चंद्रभागा सिंधूनदीसी । नर्मदा शरयू परियेसीं । त्यजावें तुम्हीं दिवस तीनी ॥९४॥
ग्रीष्मकाळीं सर्व नदींस । रजस्वला दहा दिवस । वापी-कूट-तटाकांस । एक रात्र वर्जावें ॥९५॥
नवें उदक जया दिवसीं । येतां ओळखा रजस्वलेसी । स्नान करितां महादोषी । येणेंपरी वर्जावें ॥९६॥
साधारण पक्ष तुम्हांसी । सांगितलीं तीर्थे परियेसीं । जें जें पहाल दृष्‍टीसीं । विधिपूर्वक आचरावें ॥९७॥
ऐकोनि श्रीगुरुंचें वचन । शिष्य सकळ करिती नमन । गुरुनिरोप कारण । म्हणोनि निघती सकळिक ॥९८॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । निरोप घेऊनि श्रीगुरुसी । शिष्य गेले यात्रेसी । राहिले श्रीगुरू गौप्यरुपें ॥९९॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । पुढील कथेचा विस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥१००॥
गुरुचरित्र कामधेनु । श्रोते होवोनि सावधानु । जे ऐकती भक्तजनु । लाधती चारी पुरुषार्थ ॥१०१॥
ब्रह्मरसाची गोडी । सेवितों आम्हीं घडोघडी । ज्यांसी होय आवडी । साधे त्वरित परमार्थ ॥१०२॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे तीर्थयात्रा निरुपणं नाम पंचदशोऽध्यायः
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१०२॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online