Mar 28

श्री गुरूचरित्र :: अध्याय चौदावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥
जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥
ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥
ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥
गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥
तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं । भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥
विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥
तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥
माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं । सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥
प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं । याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥
जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । अभयंकर आपुले हातीं । विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥
भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें । संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥
जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं । तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥
निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं । अखिलाभीष्‍ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥
तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं । अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥
कालांतक यम जैसा । यवन दुष्‍ट परियेसा । ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥
विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥२३॥।
कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्‍ट ॥२४॥
गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥
कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥
ज्याचे ह्रुदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥
ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥
ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥
ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं । प्राणांतक व्यथेसीं । कष्‍टतसे तये वेळीं ॥३०॥
स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई । छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥
स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥
येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि । वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरीं असे वासर । श्रीगुरुचे चरणदर्शना ॥३४॥
देखोनियां श्रीगुरुसी । नमन करी तो भावेसीं । स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥
ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥
तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका । संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥
उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥
भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति । सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥
येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी विप्र भावेसीं । संतोषोनि विनयेसीं । श्रीगुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥
कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥
आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित । कलत्र पुत्र इष्‍ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥
न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्‍टें गेलीं दुःखें । म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥
ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरु निघाले तेथोनि । जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥
समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरु आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥
नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥
पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु । मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥४९॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Mar 21

श्री गुरूचरित्र :: अध्याय तेरावा (संपूर्ण)

 Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां । करसंपुट जोडूनि जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥
जय जया सिद्ध मुनी । तूं तारक या भवार्णी । सांगितलें ज्ञान प्रकाशोनि । स्थिर जाहलें मन माझें ॥२॥
गुरुचरित्रकथामृत । सेवितां तृष्णा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपानिधि ॥३॥
गुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुम्हीं विस्तारोनु । तृप्त नव्हे माझें मनु । आणखी अपेक्षा होतसे ॥४॥
क्षुधेंकरुनि पीडिलें ढोर । जैसें पावे तृणबिढार । त्यातें होय मनोहर । नवचे तेथोनि परतोनि ॥५॥
एखादा न देखे तक्र स्वप्नीं त्यासी मिळे क्षीरबरणी । नोहे मन त्याचे धणी । केवीं सोडी तो ठाव ॥६॥
तैसा आपण स्वल्पज्ञानी नेणत होतों गुरु-निर्वाणी । अविद्यामाया वेष्‍टोनि । कष्‍टत होतों स्वामिया ॥७॥
अज्ञानतिमिररजनीसी । ज्योतिस्वरुप तूंचि होसी । प्रकाश केलें गा आम्हांसी । निजस्वरुप श्रीगुरुचें ॥८॥
तुवां केले उपकारासी । उत्तीर्ण काय होऊं सरसी । कल्पवृक्ष दिल्हेयासी । प्रत्युपकार काय द्यावा ॥९॥
एखादा देतां चिंतामणी । त्यासी उपकार काय धरणीं । नाहीं दिधलें न ऐकों कानीं । कृपामूर्ति सिद्धराया ॥१०॥
ऐशा तुझिया उपकारासी । उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसीं । म्हणोनि लागतसे चरणांसी । एकोभावेंकरोनियां ॥११॥
स्वामींनीं निरोपिला धर्म-अर्थ । अधिक झाला मज स्वार्थ । उपजला मनीं परमार्थ । गुरुसी भजावें निरंतर ॥१२॥
प्रयागीं असतां गुरुमूर्ति । माधवसरस्वतीस दीक्षा देती । पुढें काय वर्तली स्थिति । आम्हांप्रती विस्तारावें ॥१३॥
ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्धमुनि संतोषोन । मस्तकीं हस्त ठेवून । आश्वासिती तया वेळीं ॥१४॥
धन्य धन्य शिष्या सगुण । तुज लाधले श्रीगुरुचरण । संसार तारक भवार्ण । तूंचि एक परियेसा ॥१५॥
तुवां ओळखिली श्रीगुरुची सोय । म्हणोनि पुससी भक्तिभावें । संतोष होतो आनंदमय । तुझ्या प्रश्नेंकरुनियां ॥१६॥
सांगेन ऐक एकचित्तें । चरित्र गुरुचें विख्यातें । उपदेश देऊनि माधवातें । होते क्वचित्काळ तेथेंचि ॥१७॥
असतां तेथें वर्तमानीं । प्रख्यात झाली महिमा सगुणी । शिष्य झाले अपार मुनि । मुख्य माधवसरस्वती ॥१८॥
तया शिष्यांचीं नामें सांगतां । विस्तार होईल बहु कथा । प्रख्यात असती नामें सात । सांगेन ऐक एकचित्तें ॥१९॥
बाळसरस्वती कृष्णसरस्वती । उपेंद्र-माधवसरस्वती । पांचवा असे आणीक यति । सदानंदसरस्वती देखा ॥२०॥
ज्ञानज्योतिसरस्वती एक । सातवा सिद्ध आपण ऐक । अपार होते शिष्य आणिक । एकाहूनि एक श्रेष्‍ठ पैं ॥२१॥
त्या शिष्यांसमवेत । श्रीगुरु निघाले दक्षिणपंथ । समस्त क्षेत्रें पावन करित । आले पुन्हा कारंजनगरासी ॥२२॥
भेटी झाली जनकजननी । येवोनि लागताति चरणीं । चतुर्वर्ग भ्राते भगिनी । समस्त भेटती स्वामिया ॥२३॥
देखानियां श्रीगुरुमूर्तीसी नगरलोक अत्यंत हर्षी । आले समस्त भेटीसी । पूजा करिती परोपरी ॥२४॥
घरोघरीं श्रीगुरुसी । पाचारिती भिक्षेसी । जाहले रुपें बहुवसी । घरोघरीं पूजा घेती ॥२५॥
समस्त लोक विस्मय करिती । अवतार हा श्रीविष्णु निश्चितीं । वेषधारी दिसतो यति । परमपुरुष होय जाणा ॥२६॥
यातें नर जे म्हणती । ते नर जाती नरकाप्रती । कार्याकारण अवतार होती । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥२७॥
जननीजनक येणें रीतीं । पूजा करिती भावभक्तीं । श्रीगुरू झाले श्रीपादयति । जातिस्मृति जननीसी ॥२८॥
देखोनि जननी तये वेळीं । माथा ठेवी चरणकमळीं । सत्यसंकल्प चंद्रमौळी । प्रदोषपूजा आली फळा ॥२९॥
पतीस सांगे तया वेळीं । पूर्वजन्माचें चरित्र सकळीं । विश्ववंद्य पुत्र प्रबळी । व्हावा म्हणोनि आराधिलें म्यां ॥३०॥
याचि श्रीपाद-ईश्वराचें । पूजन केलें मनोवाचें । प्रसिद्ध झालें जन्म आमुचें । साफल्य केलें परियेसा ॥३१॥
म्हणोनि नमिती दोघेजणीं । विनविताति कर जोडूनि । उद्धरावें या भवार्णी । जगन्नाथा यतिराया ॥३२॥
श्रीगुरू म्हणती तयांसी । एकादे काळीं परियेसीं । पुत्र होय संन्यासी । उद्धरील कुळें बेचाळीस ॥३३॥
त्यासी शाश्वत ब्रह्मलोक । अचळ पद असे देख । त्याचे कुळीं उपजतां आणिक । त्यासीही ब्रह्मपद परियेसा ॥३४॥
यमाचे दुःखें भयाभीत । नोहे त्याचे पितृसंततींत । पूर्वज जरी नरकीं असत । त्यांसी शाश्वत ब्रह्मपद ॥३५॥
याकारणें आम्हीं देखा । घेतला आश्रम विशेखा । तुम्हां नाहीं यमाची शंका । ब्रह्मपद असे सत्य ॥३६॥
ऐसें सांगोनि तयांसी । आश्वासीतसे बहुवसी । तुमचे पुत्र शतायुषी । अष्‍टैश्चर्ये नांदती ॥३७॥
त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही । पहाल सुखें तुमचे नयनीं । पावाल क्षेम काशीभुवनीं । अंतकाळीं परियेसा ॥३८॥
मुक्तिस्थान काशीपुर । प्रख्यात असे वेदशास्‍त्र । न करा मनीं चिंता मात्र । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥३९॥
त्यांची कन्या असे एक । नाम तिचें 'र‍त्‍नाई' विशेष । श्रीगुरुसी नमूनि ऐक । विनवीतसे परियेसा ॥४०॥
विनवीतसे परोपरी । स्वामी मातें तारीं तारीं । बुडोनि जात्यें भवसागरीं । संसारमाया वेष्‍टोनियां ॥४१॥
संसार-तापत्रयासी । आपण भीतसें परियेसीं । निर्लिप्‍त करीं गा आम्हांसी । आपण तपासी जाईन ॥४२॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु निरोपिताति आपण । स्त्रियांसी पतिसेवाचरण । तेंचि तप परियेसा ॥४३॥
येणें या भावार्णवासी । कडे पडती परियेसीं । जैसा भाव असे ज्यासी । तैसें होईल परियेसा ॥४४॥
उतरावया पैल पार । स्‍त्रियांसी असे तो भ्रतार । मनें करोनि निर्धार । भजा पुरुष शिवसमानी ॥४५॥
त्यासी होय उद्धार गति । वेदपुराणें वाखाणिती । अंतःकरणीं न करीं खंती । तूतें गति होईल जाण ॥४६॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे कर जोडून । श्रीगुरुमूर्ति ब्रह्मज्ञान । विनवीतसें अवधारीं ॥४७॥
तूं जाणसी भविष्यभूत । कैसें मातें उपदेशीत । माझें प्रालब्ध कवणगत । विस्तारावें मजप्रति ॥४८॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । तुझी वासना असे तपासी । संचित पाप असे तुजसी । भोगणें असे परियेसा ॥४९॥
पूर्वजन्मीं तूं परियेसीं । चरणीं लाथिलें धेनूसी । शेजारी स्‍त्रीपुरुषांसी । विरोधें लाविला कलह जाणा ॥५०॥
तया दोषास्तव देखा । तूतें बाधा असे अनेका । गायत्रीसी लाथिलें ऐका । तूं सर्वांगीं कुष्‍ठी होसील ॥५१॥
विरोध केला स्त्रीपुरुषांसीं । तुझा पुरुष होईल तापसी । तुतें त्यजील भरंवसीं । अर्जित तुझें ऐसें असे ॥५२॥
ऐकोनि दुःख करी बहुत । श्रीगुरुचरणीं असे लोळत । मज उद्धारावें गुरुनाथा त्वरित । म्हणोनि चरणीं लागली ॥५३॥
श्रीगुरू म्हणती ऐक बाळे । क्वचित्काळ असाल भले । अपरवयसा होतांचि काळें । पति तुझा यति होये ॥५४॥
तदनंतर तुझा देह । कुष्‍ठी होईल अवेव । भोगूनि स्वदेहीं वय । मग होईल तुज गति ॥५५॥
नासतां तुझा देह जाण । भेटी होईल आमुचे चरण । तुझें पाप होईल दहन । सांगेन क्षेत्र ऐक पां ॥५६॥
भीमातीर दक्षिण देशीं । असे तीर्थ पापविनाशी । तेथें जाय तूं भरंवसीं । अवस्था तुज घडलियावरी ॥५७॥
या भूमंडळीं विख्यात । तीर्थ असे अति समर्थ । गंधर्वपुर असे ख्यात । अमरजासंगम प्रसिद्ध जाण ॥५८॥
ऐसें सांगोनि तियेसी । श्रीगुरू निघाले दक्षिण देशीं । त्र्यंबक-क्षेत्रासी । आले, गौतमी-उद्धव जेथें ॥५९॥
शिष्यांसहित गुरुमूर्ति । आले नाशिकक्षेत्राप्रती । तीर्थमहिमा असे ख्याति । पुरणांतरीं परियेसा ॥६०॥
तीर्थमहिमा सांगतां । विस्तार होईल बहु कथा । संक्षेपमार्गे तुज आतां । सांगतसें परियेसीं ॥६१॥
त्या गौतमीची महिमा । सांगतां अपार असे आम्हां । बहिरार्णव-उदक उगमा । ब्रह्मांडाव्यतिरिक्त ॥६२॥
जटामुकुटीं तीर्थेश्वर । धरिली होती प्रीतिकर । मिळोनि समस्त ऋषीश्वर । उपाय केला परियेसा ॥६३॥
ब्रह्मऋषि गौतम देखा । तपस्वी असे विशेषा । व्रीहि पेरिले वृत्तीं ऐका । अनुष्‍ठानस्थानाजवळी ॥६४॥
पूर्वी मुनी सकळी । नित्य पेरुनि पिकविती साळी । ऐसे त्यांचे मंत्र बळी । महापुण्यपुरुष असती ॥६५॥
समस्त ऋषि मिळोनि । विचार करिती आपुले मनीं । ऋषिगौतम महामुनी । सर्वेश्वराचा मुख्य दास ॥६६॥
त्यासी घालितां सांकडें । गंगा आणील आपुलें चाडें । समस्तां आम्हां पुण्य घडे । गंगास्नानें भूमंडळीं ॥६७॥
श्र्लोक ॥ या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसाम्‌ । सा गतिः सर्वजंतूनां गौतमीतीरवासिनाम्‌ ॥६८॥
टीका ॥ ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी । कोटिवर्षे तपस्वियांसी । जे गति होय परियेसीं । ते स्नानमात्रें गौतमीच्या ॥६९॥
याकारणें गौतमीसी । आणावें यत्‍नें भूमंडळासी । सांकडें घालितां गौतमासी । आणितां गंगा आम्हां लाभ ॥७०॥
म्हणोनि रचिली माव एक । दुर्वेची गाय सवत्सक । करोनि पाठविली ऐक । गौतमाचे ब्रीहिभक्षणासी ॥७१॥
ऋषि होता अनुष्‍ठानीं । देखिलें धेनूसी नयनीं । निवारावया तत्क्षणीं । दर्भ पवित्र सोडिलें ॥७२॥
तेचि कुश जाहलें शस्‍त्र । धेनूसी लागलें जैसें वज्रास्त्र । पंचत्व पावली त्वरित । घडली हत्या गौतमासी ॥७३॥
मिळोनि समस्त ऋषिजन । प्रायश्चित्त देती जाण । गंगा भूमंडळीं आण । याविणें तुम्हां नाहीं शुद्धि ॥७४॥
याकारणें गौतमऋषीं । तप केलें सहस्त्र वर्षी । प्रसन्न झाला व्योमकेशी । वर माग म्हणितलें ॥७५॥
गौतम म्हणे सर्वेश्वरा । तुवां देशील मज वरा । उद्धरावया सचराचरा । द्यावी गंगा भूमंडळासी ॥७६॥
गौतमाचे विनंतीसी । निरोप दिधला गंगेसी । घेवोनि आला भूमंडळासी । पापक्षालनार्थ मनुष्यांचे ॥७७॥
ऐसी गंगाभागीरथी । कवणा वर्णावया सामर्थ्य । याचि कारणें श्रीगुरुनाथ । आले ऐक नामधारका ॥७८॥
ऐशी गौतमीतटाकयात्रा । श्रीगुरू आपण आचरीत । पुढें मागुती लोकानुग्रहार्थ । आपण हिंडे परियेसा ॥७९॥
तटाकयात्रा करितां देख । आले श्रीगुरु मंजरिका । तेथें होता मुनि एक । विख्यात 'माधवारण्य' ॥८०॥
सदा मानसपूजा त्यासी । नरसिंहमूर्ति परियेसीं । देखता झाला श्रीगुरुसी । मानसमूर्ति जैसी देखे ॥८१॥
विस्मित होऊनि मानसीं । नमिता झाला श्रीगुरुमूर्तीसी । स्तोत्र करी बहुवसी । अतिभक्तीकरुनियां ॥८२॥
श्र्लोक ॥ यद्दिव्यपादद्वयमेवसाक्षाद्‌ , अधिष्‍ठितं देवनदीसमीपे । य उत्तरे तीरनिवासिरामो, लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यम्‌ ॥८३॥
ओंव्या ॥ येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी माधवारण्य हर्षी । श्रीगुरू म्हणती संतोषीं । तया माधवारण्यासी ॥८४॥
श्र्लोक ॥ अत्यंतमार्गस्थितिमार्गरुपं, अत्यंतयोगादधिकारतत्त्वम्‌ । मार्गं च मार्गं च विचिन्वतो मे, मार्गोदयं माधव दर्शये ते ॥८५॥
ओंव्या ॥ ऐसें श्रीगुरू तयासी आश्वासोनि म्हणती हर्षी । निजस्वरुप तयासी । दाविते झाले परियेसा ॥८६॥
श्रीगुरुचें स्वरुप देखोनि । संतोषी झाला तो मुनि । विनवीतसे कर जोडूनि । नानापरी स्तुति करी ॥८७॥
जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तीचा अवतारू । लोकां दिससी नरु । परमपुरुषा जगज्ज्योति ॥८८॥
तूं तारक विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी । कृतार्थ केलें आम्हांसी । दर्शन दिधलें चरण आपुले ॥८९॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो तापसी । संतोष होऊन अति हर्षी । आश्वासिती तया वेळीं ॥९०॥
म्हणती श्रीगुरू तयासी । सिद्धि झाली तुझ्या मंत्रासी । तुज सद्गति भरंवसीं । ब्रह्मलोक प्राप्त होय ॥९१॥
नित्यपूजा तूं मानसीं । करिसी नृसिंहमूर्तीसी । प्रत्यक्ष होईल परियेसीं । न करीं संशय मनांत ॥९२॥
ऐसें सांगोनि तयासी । श्रीगुरू निघाले परियेसीं । आले वासरब्रह्मेश्वरासी । गंगातीर महाक्षेत्र ॥९३॥
तया गंगातटाकांत । श्रीगुरू समस्त शिष्यांसहित । स्नान करितां गंगेंत । आला तेथें विप्र एक ॥९४॥
कुक्षिव्यथा असे बहुत । तटाकीं असे लोळत । उदरव्यथा अत्यंत । त्यजूं पाहे प्राण देखा ॥९५॥
पोटव्यथा बहु त्यासी । नित्य करी तो उपवासासी । भोजन केलिया दुःख ऐसी । प्राणांतिक होतसे ॥९६॥
याकारणें द्विजवर । सदा करी फलाहार । अन्नासी त्यासी असे वैर । जेवितां प्राण त्यजूं पाहे ॥९७॥
पक्षमासां भोजन करी । व्यथा उठे त्याचे उदरीं । ऐसा किती दिवसवरी । कष्‍टत होता तो द्विज ॥९८॥
पूर्व दिवसीं तया ग्रामीं । आला सण महानवमी । जेविला मिष्‍टान्न मनोधर्मी । मासें एक पारणें केलें ॥९९॥
भोजन केलें अन्न बहुत । त्याणें पोट असे दुखत । गंगातीरीं असे लोळत । प्राण त्वरित त्यजूं पाहे ॥१००॥
दुःख करी द्विज अपार । म्हणे गंगेंत त्यजीन शरीर । नको आतां संसार । पापरुपें वर्तत ॥१॥
अन्न प्राण अन्न जीवन । कवण असेल अन्नावीण । अन्न वैरी झालें जाण । मरण बरवें आतां मज ॥२॥
मनीं निर्धार करोनि । गंगाप्रवेश करीन म्हणोनि । पोटीं पाषाण बांधोनि । गंगेमध्यें निघाला ॥३॥
मनीं स्मरे कर्पूरगौर । उपजलों आपण भूमिभार । केले नाहीं परोपकार । अन्नदानादिक देखा ॥४॥
न करीं पुण्य इह जन्मांत । जन्मांतरीं पूर्वी शत । पुण्यफळ असे दिसत । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥६॥
अपूर्ती पूजा ईश्वराची । केली असेल निंदा गुरुची । अवज्ञा केली मातापितयांची । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥७॥
अथवा पूर्वजन्मीं आपण । केलें असेल द्विजधिक्कारण । अतिथि आलिया न घालीं अन्न । वैश्वदेवसमयासी ॥८॥
अथवा मारिलें वोवरांसी । अग्नि घातला रानासी । वेगळें सांडूनि जनकजननींसी । स्त्रियेसहित मी होतों ॥९॥
मातापिता त्यजोनियां । असों सुखें जेवूनियां । पूर्वार्जवापासोनियां । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥११०॥
ऐसीं पापें आठवीत । विप्र जातो गंगेंत । तंव देखिलें श्रीगुरुनाथें । म्हणती बोलावा ब्राह्मणासी ॥११॥
आणा आणा त्या ब्राह्मणासी । प्राण त्यजितो कां सुखेसीं । आत्महत्या महादोषी । पुसों कवण कवणाचा ॥१२॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । गेले शिष्य धांवोनि । द्विजवरातें काढोनि । आणिलें श्रीगुरुसन्मुख ॥१३॥
अनाथासी कल्पतरु । दुःखिष्‍टासी कृपासागरू । पुसतसे श्रीगुरू । तया दुःखिष्‍ट विप्रासी ॥१४॥
श्रीगुरू म्हणती तयासी । प्राण कां गा त्यजूं पाहसी । आत्महत्या महादोषी । काय वृत्तांत सांग आम्हां ॥१५॥
विप्र म्हणे गा यतिराया । काय कराल पुसोनियां । उपजोनि जन्म वायां । भूमिभार जाहलों असें ॥१६॥
मास-पक्षां भोजन करितों । उदरव्यथेनें कष्‍टतों । साहूं न शकें प्राण देतों । काय सांगूं स्वामिया ॥१७॥
आपणासी अन्न वैरी असतां । केवीं वांचावें गुरुनाथा । शरीर सर्व अन्नगता । केवीं वांचूं जगद्गुरु ॥१८॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । तुझी व्यथा गेली परियेसीं । औषध असे आम्हांपासीं । क्षण एकें सांगों तुज ॥१९॥
संशय न धरीं आतां मनीं । भिऊं नको अंतःकरणीं । व्याधि गेली पळोनि । भोजन करी धणीवरी ॥१२०॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । स्थिर झाला अंतःकरणीं । माथा ठेवूनि श्रीगुरुचरणीं । नमन केलें तया वेळीं ॥२१॥
इतुकिया अवसरीं । तया ग्रामींचा अधिकारी । विप्र एक अवधारीं । आला गंगास्नानासी ॥२२॥
तंव देखिलें श्रीगुरुसी । येऊनि लागला चरणांसी । नमन केलें भक्तीसीं । मनोवाक्कायकर्मे ॥२३॥
आश्वासोनि तये वेळीं । पुसती श्रीगुरू स्तोममौळी । कवण नाम कवण स्थळीं । वास म्हणती तयासी ॥२४॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगतसे तो ब्राह्मण । गोत्र आपलें कौंडिण्य । आपस्तंब शाखेसीं ॥२५॥
नाम मज 'सायंदेव' असे । वास-स्थळ आपलें 'कडगंची'स । आलों असे उदरपूर्तीस । सेवा करितों यवनाची ॥२६॥
अधिकारपणें या ग्रामीं । वसों संवत्सर ऐका स्वामी । धन्य धन्य झालों आम्ही । तुमचे दर्शनमात्रेसीं ॥२७॥
तूं तारक विश्वासी । दर्शन दिधलें आम्हांसी । कृतार्थ झालों भरंवसीं । जन्मांतरींचे दोष गेले ॥२८॥
तुझा अनुग्रह होय ज्यासी । तरेल या भवार्णवासी । अप्रयत्‍नें आम्हांसी । दर्शन दिधलें स्वामिया ॥२९॥
श्र्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा । पापं तापं च दैन्यं च हरेच्छ्रीगुरुदर्शनम्‌ ॥१३०॥
टीका ॥ गंगा देखितांचि पापें जाती । चंद्रदर्शनें ताप नासती । कल्पतरुची ऐसी गति । दैन्यवेगळा करी जाण ॥३१॥
तैसे नव्हती तुमचे दर्शनगुण । पाप-ताप दैन्यहरण । देखिले आजि तुमचे चरण । चतुर्वर्गफल पावलों ॥३२॥
ऐशी स्तुति करुनि । पुनरपि लागला श्रीगुरुचरणीं । जगद्गुरु अश्वासोनि । निरोप देती तया वेळीं ॥३३॥
श्रीगुरू म्हणती तयासी । आमुचें वाक्य परियेसीं । जठरव्यथा ब्राह्मणासी । प्राणत्याग करीतसे ॥३४॥
उपशमन याचे व्याधीसी । सांगों औषध तुम्हांसी । नेवोनि आपुले मंदिरासी । भोजन करवीं मिष्‍टान्न ॥३५॥
अन्न जेवितां याची व्यथा । व्याधि न राहे सर्वथा । घेऊनि जावें आतां त्वरिता । क्षुधाक्रांत विप्र असे ॥३६॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे कर जोडून । प्राणत्याग करितां भोजन । या ब्राह्मणासी होतसे ॥३७॥
जेविला काल मासें एका । त्याणें प्राण जातो ऐका । अन्न देतां आम्हांसी देखा । ब्रह्महत्या त्वरित घडेल ॥३८॥
श्रीगुरु म्हणती सायंदेवासी । आम्ही औषधी देतों यासी । अपूपान्न-माषेसीं । क्षीरमिश्रित परमान्न ॥३९॥
अन्न जेवितां त्वरितेसीं । व्याधि जाईल परियेसीं । संशय न धरीं तूं मानसीं । त्वरित न्यावें गृहासी ॥१४०॥
अंगीकारोनि तया वेळीं । माथा ठेवी चरणकमळीं । विनवीतसे करुणाबहाळी । यावें स्वामी भिक्षेसी ॥४१॥
अंगीकारोनि श्रीगुरुनाथ । निरोप देती हो कां त्वरित । सिद्ध म्हणे ऐक मात । नामधारक शिष्योत्तमा ॥४२॥
आम्ही होतों तये वेळीं । समवेत-शिष्य सकळीं । जठरव्यथेचा विप्र जवळी ; । श्रीगुरू गेले भिक्षेसी ॥४३॥
विचित्र झालें त्याचे घरीं । पूजा केली परोपरी । पतिव्रता त्याची नारी । 'जाखाई' म्हणिजे परियेसा ॥४४॥
पूजा करिती श्रीगुरुसी । षोडशोपचारें परियेसीं । तेणेंचि रीतीं आम्हांसी । शिष्यां सकळिकां वंदिलें ॥४५॥
श्रीगुरुपूजा-विधान । विचित्र केलें अतिगहन । मंडळ केलें रक्तवर्ण । एकेकासी पृथक्‌-पृथक्‌ ॥४६॥
पद्म रचूनि अष्‍टदळी । नानापरीचे रंगमाळी । पंचवर्ण चित्रमाळी । रचिली तियें परियेसा ॥४७॥
चित्रासन श्रीगुरुसी । तेणेंचिपरी सकळिकांसी । मंडळार्चनविधीसीं । करिती पुष्पगंधाक्षता ॥४८॥
संकल्पोनि विधीसीं । नमन केलें अष्‍टांगेसीं । माथा ठेवूनि चरणीं, न्यासी । पाद सर्वही अष्‍टांगीं ॥४९॥
षोडशोपचार विधीसीं । पंचामृतादि परियेसीं । रुद्रसूक्तमंत्रेसीं । चरण स्नापिले तये वेळीं ॥१५०॥
श्रीगुरुचरणीं अतिहर्षी । पूजा करीत षोडशी । तया विप्रा ज्ञान कैसी । चरणतीर्थ धरिता झाला ॥५१॥
तया चरणतीर्थासी । पूजा करीत भक्तीसीं । गीतवाद्यें आनंदेसीं । करी आरति नीरांजन ॥५२॥
अनुक्रमें श्रीगुरुपूजा । करिता झाला विधिवोजा । पुनरपि षोडशोपचारें पूजा । करीतसे भक्तीनें ॥५३॥
अक्षय वाणें आरति । श्रीगुरुसी ओंवाळिती । मंत्रघोष अतिभक्तीं । पुष्पांजळी करिता झाला ॥५४॥
अनेकपरी गायन करी । नमन करी प्रीतिकरीं । पतिव्रता असे नारी । पूजा करिती उभयवर्ग ॥५५॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । पूजा केली परियेसीं । तेणेंचि विधीं शिष्यांसी । आम्हां समस्तांसी वंदिलें ॥५६॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । वर देती अतिप्रीतीं । तुझी संतती होईल ख्याति । गुरुभक्ति वंशोवंशीं ॥५७॥
तूं जाणसी गुरुचा वास । अभिवृद्धि होय वंशोवंश । पुत्रपौत्रीं नांदाल हर्षी । गुरुभक्ति येणेंपरी ॥५८॥
ऐसें बोलोनि द्विजासी । आशीर्वचन देती अतिहर्षी । नमन करुनि श्रीगुरुसी । ठाय घातले तये वेळीं ॥५९॥
नानापरीचें पक्क्वान्न । अपूपादि माषान्न । अष्‍टविध परमान्न । शर्करासहित निवेदिलें ॥१६०॥
शाक पाक नानापरी वाढताति सविस्तारीं । भोजन करिती प्रीतिकरीं । श्रीगुरुमूर्ति परियेसा ॥६१॥
जठरव्यथेच्या ब्राह्मणें । भोजन केलें परिपूर्ण । व्याधि गेली तत्क्षण । श्रीगुरूचे कृपादृष्‍टीनें ॥६२॥
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय परियेसीं । दर्शन होतां श्रीगुरुसी । व्याधि कैंची सांग मज ॥६३॥
उदय जाहलिया दिनकरासी । संहार होतो अंधकारासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैंचें तया घरीं ॥६४॥
ऐसेपरी श्रीगुरुनाथें । भोजन केलें शिष्यासहित । आनंद झाला तेथें बहुत । विस्मय करिती सकळै जन ॥६५॥
अभिनव करिती सकळ जन । द्विजासी वैरी होतें अन्न । औषध झालें तेंचि अन्न । व्याधि गेली म्हणताति ॥६६॥
सिद्ध म्हणे नामधारकास । श्रीगुरुकृपा होय ज्यास । जन्मांतरींचे जाती दोष । व्याधि कैंची त्याचे देहीं ॥६७॥
गंगाधराचा नंदन । सरस्वती सांगें विस्तारोन । गुरुचरित्र कामधेनु । ऐका श्रोते एकचित्तें ॥६८॥
जे ऐकती भक्तीनें । व्याधि नसती त्यांचे भुवना । अखिल सौख्य पावती जाणा । सत्यं सत्यं पुनः सत्यं ॥६९॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथानिरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥६९॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

 

Mar 14

श्री गुरूचरित्र :: अध्याय बारावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
श्रीगुरू म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥
श्लोक ॥ अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥
टीका ॥ एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी । अनित्य देह विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥३॥
देह म्हणिजे क्षणभंगुर । नाहीं राहिले कवण स्थिर । जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गे रहाटावें ॥४॥
जो असेल मृत्यूसी जिंकीत । त्याणें निश्चयावें शरीर नित्य । त्यासि तुझा उपदेश सत्य । म्हणे करीन धर्म पुढें ॥५॥
अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें । करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥६॥
अल्पोदकीं जैसा मत्स्य । तैसें मनुष्य अल्पायुष्य । जंववरी असे प्राणी सुरस । धर्म करावा परियेसा ॥७॥
जैसा सूर्याचा रथ चाले । निमिष होतां शीघ्रकाळें । बावीस सहस्त्र गांव पळे । तैसें आयुष्य क्षीण होय ॥८॥
पर्जन्य पडतां वृक्षावरी । उदक राहे पर्णाग्रीं । स्थिर नव्हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥९॥
तैसें शरीर नव्हे स्थिर । जीवित्वा मरण निर्धार । यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हें नश्य जाणा ॥१०॥
याचि कारणें देहासी । विश्वासूं नये परियेसीं । मृत्यु असे हा सहवासी । धर्म करावा तात्काळीं ॥११॥
पिकलें पान वृक्षीं जैसें । लागलें असें सूक्ष्मवेशें । तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥१२॥
एखादा नर कळंतरासी । द्रव्य देतो परियेसी । दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लक्षीतसे ॥१३॥
जैशा समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका । परतोनि न येती जन्मभूमिका । तैसें आयुष्‍य न परते ॥१४॥
अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्चयें जाणोन । पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥१५॥
जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं । तया यमासि करुणा नाहीं । करावें पुण्य तात्काळ ॥१६॥
पुत्र दारा धन गोधन । आयुष्‍य देह येणें-गुण । जे जन निश्चित म्हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥१७॥
जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं । तैसें या शरीरासी । वृद्धाप्य भक्षी अवधारा ॥१८॥
याकारणें तारुण्यपणीं । करावें पुण्य विद्वज्जनीं । आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥१९॥
जो यमाचा असेल इष्‍ट । त्याणें करावा आळस हट्ट । अमरत्वें असेल जो सुभट । त्याणें पुढें धर्म करावा ॥२०॥
संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्‍प असे मोगरी । सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥२१॥
जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अव्यक्त । तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥२२॥
ऐसें नानापरी देखा । बोधिता झाला जननीजनकां । विस्मय करिती सभालोक । बाळक केवीं तत्त्व सांगतो ॥२३॥
ऐकोनि पुत्राचें वचन । माता करीतसे नमन । देवा निरोपिलें ज्ञान । विनंति माझी परिसावी ॥२४॥
तुवां निरोपिलें आम्हांसी । पुत्र चवघे होतील ऐसी । विश्वास नव्हे गा मानसीं । कुळदेवता पुत्रराया ॥२५॥
जंववरी होय एक सुत । तंववरी रहावें समीपत । निरोप नेदीं तंववरी सत्य । म्हणोनि विनवी तयेवेळीं ॥२६॥
माझें वचन अव्हेरुनि । जरी जाशील निघोनि । प्राण देईन तत्क्षणीं । हा निश्चय अवधारीं ॥२७॥
पुत्र नव्हसी तूं आम्हांसी । आमुचें कुळदैवत होसी । सत्य करीं गा वचनासी । बोल आपुले दातारा ॥२८॥
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू बोलती हांसोन । आमचे बोल सत्य जाण । तुझें वाक्य निर्धारीन पां ॥२९॥
तुतें होतांचि पुत्र दोनी । निरोप द्यावा संतोषोनि । मग न राहें ऐक जननी । बोल आपुले सत्य करीं ॥३०॥
संवत्सर एक तुझ्या घरीं । राहूं माते निर्धारीं । वासना पुरतील तुझ्या जरी । मग निरोप दे मज ॥३१॥
ऐसी करुनियां निगुती । राहिले श्रीगुरु अतिप्रीतीं । वेदाभ्यास शिकविती । शिष्यवर्गा बहुतांसी ॥३२॥
नगरलोक विस्मय करिती । अभिनव झालें ऐसें म्हणती । बाळ पहा हो वर्षे साती । वेद चारी सांगतसे ॥३३॥
विद्वानांहूनि विद्वान विद्यार्थी । तीनी वेद पढती । षट्‌शास्‍त्री जे म्हणविती । तेही येती शिकावया ॥३४॥
येणेंपरी तया घरीं । राहिले गुरु प्रीतिकरीं । माता झाली गरोदरी । महानंद करीतसे ॥३५॥
नित्य पूजिती पुत्रासी । ठेवूनि भाव कुळदैवत ऐसी । निधान लाधे एखाद्यासी । काय सांगों संतोष त्यांचा ॥३६॥
तंव नवमास जाहली अंतर्वत्‍नी । माता झाली प्रसूती । पुत्र झाले युग्‍म ख्याती । अतिसुंदर परियेसा ॥३७॥
पुत्र झाले उल्हास थोर । मातापित्या संतोष फार । आशीर्वचन असे गुरू । असत्य केवीं होईल ॥३८॥
याकारणें गुरुवचन । सत्य मानावें विद्वज्जनें । जैसें असेल अंतःकरण । तैसें होईल परियेसा ॥३९॥
ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक । खेळवीतसे माता ऐक । आले श्रीगुरू तयांजवळी ॥४०॥
जननी ऐक माझे वचना । झाली तुझी मनकामना । दोघे पुत्रनिधाना । पूर्णायुषी आहेति जाण ॥४१॥
आणखी होतील दोघे कुमारक । त्यानंतर कन्या एक । असाल नांदत अत्यंत सुख । वासना पुरतील तुझी जाणा ॥४२॥
आतां आमुतें निरोपावें । जाऊं आम्ही स्वभावें । संतोषरुपी तुम्हीं व्हावें । म्हणोनि निरोप घेती तयेवेळीं ॥४३॥
संतोषोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । स्वामी आमुच्या कुळदेवता । अशक्‍य आम्ही बोलावया ॥४४॥
न कळे आम्हां स्वरुपज्ञान । तुझें स्वरुप नकळे कवणा । मायामोहें वेष्‍टोन कामना । नेणोंचि महिमान तुझें ॥४५॥
मायाप्रपंचें वेष्‍टोनि । तुतें जरी सुत म्हणोनि । एके समयीं निष्‍ठुर बोलों वचनीं । क्षमा करणें स्वामिया ॥४६॥
सहभोजन-शयनासनीं । तुतें गांजों भुकेजोनि । कडे न घेंचि उबगोनि । क्षमा करीं गा देवराया ॥४७॥
तारक आमुचे वंशासी । बापा तूं अवतरलासी । प्रदोषपूजा फळासी । आली मातें स्वामिया ॥४८॥
आतां आम्हां काय गति । सांगा स्वामी कृपामूर्ती । जननमरण यातनयाती । कडे करावें दातारा ॥४९॥
सगरांवरी जैसी गंगा । तैसा तुवां आलासि चांगा । पावन केलेंसि माझे अंगा । उभयकुळें बेचाळीस ॥५०॥
आम्हां ठेविसी कवणेपरी । या धुरंधर संसारीं । तुझें दर्शन नोहे तरी । केवीं वांचों प्राणात्मजा ॥५१॥
ऐकोनि मातापितयांचें वचन । बोलती श्रीगुरू आपण । जे जे समयीं तुमचें मन । स्मरण करील आम्हांसी ॥५२॥
स्मरण करितां तुम्हांजवळी । असेन जननी मी तात्काळीं । न करावी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे ॥५३॥
आणिक कन्या पुत्र तीनी । होतील ऐक तूं भवानी । दैन्य नाहीं तुमच्या भुवनीं । सदा श्रीमंत नांदाल ॥५४॥
जन्मांतरीं परमेश्वरासी । पूजा केली तुवां प्रदोषीं । याची महिमा आहे ऐसी । जन्मोजन्मीं श्रियायुक्त ॥५५॥
इह सौख्य होय ऐक । देहांतीं जाणा परम लोक । पूजा करितां पिनाक । पुनर्जन्म तुम्हां नाहीं ॥५६॥
तुवां आराधिला शंकर । आम्हां करविला अवतार । वासना पुरेल तुझा भार । आम्हां निरोप दे आतां ॥५७॥
पुनर्दर्शन तुम्हांसी । होईल ऐका वर्षे-तीसीं । जावोनि बदरीवनासी । म्हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥
निरोप घेवोनि तये वेळां । श्रीगुरू निघाले अवलीळा । नगरलोक येती सकळा । मातापिता बोळविती ॥५९॥
म्हणती समस्त नगरनारी । तपासी निघाला ब्रह्मचारी । होईल पुरुष अवतारी । मनुष्यदेही दिसतसे ॥६०॥
एक म्हणती पहा हो नवल । तपासी निघाला असे बाळ । मातापिता सुखें केवळ । निरोप देती कौतुकें ॥६१॥
कैसें यांचें अंतःकरण । जैसा हो कां पाषाण । मन करुनि निर्वाण । बोळविताति पुत्रासी ॥६२॥
एक म्हणती नव्हे बाळ । होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ । अनुमान नव्हे हा निश्चळ । वेद केवीं म्हणतसे ॥६३॥
सात वर्षांचें बाळक देखा । वेद म्हणतो अखिल शाखा । मनुष्यमात्र नव्हे ऐका । ऐसें म्हणती साधुजन ॥६४॥
ऐसें म्हणोनि साधुजन । करिताति साष्‍टांगीं नमन । नानापरी स्तोत्रवचन । करिते झाले अवधारा ॥६५॥
नमन करोनि सकळिक । आले आपुले गृहांतिक । पुढें जाती जननीजनक । पुत्रासवें बोळवीत ॥६६॥
निजस्वरुप जननियेसी । दाविता झाला परियेसीं । श्रीपादश्रीवल्लभ-द्त्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥६७॥
त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर । निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥६८॥
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । आमुचें पुण्य होतें थोरू । म्हणोनि देखिले तुमचे चरण ॥६९॥
तू तारक विश्वासी । आम्हां उद्धरिलें विशेषीं । पुनर्दर्शन आम्हांसी । द्यावें म्हणोनि विनविती ॥७०॥
ऐसें म्हणोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । अलिंगिती श्रीगुरुनाथा । स्नेहभावेंकरुनियां ॥७१॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । आश्वास केला अतिप्रीतीं । पुनर्दर्शन हो निश्चितीं । देईन म्हणती तये वेळीं ॥७२॥
ऐसें तयां संभाषोनि । निरोप घेतला तत्क्षणीं । परतोनि आली जनकजननी । येती संतोषोनि मंदिरांत ॥७३॥
वरदमूर्ति श्रीगुरुराणा । निघाला जावया बदरीवना । पातला आनंदकानना । वाराणसी क्षेत्रासी ॥७४॥
अविमुक्त वाराणसी पुरी । क्षेत्र थोर सचराचरीं । विश्वेश्वर अवधारीं । अनुपम्य असे त्रिभुवनीं ॥७५॥
राहूनियां तया स्थानीं । अनुष्‍ठिती गुरुशिरोमणी । विश्वेश्वराचे दर्शनीं । पूजा करिती आत्मारामासी ॥७६॥
येणेंपरी तया स्थानीं । क्वचित्काळ श्रीगुरुमुनि । अष्‍टांगयोगेंकरुनि । तप करिती परियेसा ॥७७॥
तया काशीनगरांत । तापसी असती आणिक बहुत । संन्यासी यती अवधूत । तप करिती दारुण ॥७८॥
तयांत श्रीगुरू ब्रह्मचारी । योगाभ्यासधुरंधरीं । करिताति ; तपस्वी येरी । अभिनव करिती मनांत ॥७९॥
म्हणती पहा हो ब्रह्मचारी । तप करितो नानापरी; कैसें वैराग्य याचे उदरीं । निर्लिप्‍त असे परियेसा ॥८०॥
शरीरस्वार्थ नाहीं यासी । योग्य होय हा संन्यासीं । स्नान करितो त्रिकाळेसीं । मणिकर्णिका तीर्थांत ॥८१॥
ऐसें स्तोत्र नित्य करिती । समस्त संन्यासी येती । वृध्द होता एक यति । 'कृष्णसरस्वती' नामें ॥८२॥
तो केवळ ब्रह्मज्ञानी । तपस्वी असे महामुनि । सदा देखोनियां नयनीं । स्नेहभावें भावीतसे ॥८३॥
म्हणे समस्त यतीश्वरांसी । न म्हणा नर ब्रह्मचारीसी । अवतारपुरुष अतितापसी । विश्ववंद्य दिसतसे ॥८४॥
वयसा धाकुटा म्हणोनि । नमन न कराल तुम्ही मुनी । प्रख्यात मूर्ति हा त्रिभुवनीं । आम्हां वंद्य असे देखा ॥८५॥
वार्धक्यपणें आम्ही यासी । वंदितां दुःख सकळांसी । विशेष आम्ही संन्यासी । मूर्ख लोक निंदिती ॥८६॥
याकारणें आम्ही यासी । विनवूं, परोपकारासी । संन्यास देता, समस्तांसी । भक्ति होईल स्थिर मनीं ॥८७॥
लोकानुग्रहानिमित्त । हा होय गुरु समर्थ । याचे दर्शनमात्रें पुनीत । आम्ही परियेसा ॥८८॥
याकारणें बाळकासी । विनवूं आम्ही विनयेसीं । आश्रम घ्यावा संन्यासी । पूजा करुं एकभावें ॥८९॥
म्हणोनि आले तया जवळीं । विनविताति मुनी सकळी । ऐक तापसी स्तोममौळी । विनंति असे परियेसा ॥९०॥
लोकानुग्रहाकारणें । तुम्हीं आतां संन्यास घेणें । आम्हां समस्तां उद्धरणें । पूजा घेणें आम्हां करवीं ॥९१॥
या कलियुगीं संन्यास म्हणोन । निंदा करिती सकळै जन । स्थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥९२॥
श्लोक ॥ यज्ञदानं गवालंभं संन्यासं पलपैतृकम्‌ । देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत्‌ ॥९३॥
टीका ॥ यज्ञ दान गवालंभन । संन्यास घेतां अतिदूषण । पलपैतृक भ्रातांगना । करुं नये म्हणताति ॥९४॥
करितां कलियुगांत । निषिद्ध बोलती जन समस्त । संन्यासमार्ग सिद्धांत । वेदसंमत विख्यात ॥९५॥
पूर्वी ऐसें वर्तमानीं । निषेध केला सकळही जनीं । श्रीशंकराचार्य अवतारोनि । स्थापना केली परियेसा ॥९६॥
तयावरी इतुके दिवस । चालत आला मार्ग संन्यास । कलि प्रबळ होतां नाश । पुनरपि निंदा करिताती ॥९७॥
आश्रमाचा उद्धार । सकळ जनां उपकार । करावा कृपासागर । म्हणती सकळ मुनिजन ॥९८॥
ऐकोनि त्यांची विनंति । श्रीगुरुमुनि आश्रय घेती । वृद्ध कृष्णसरस्वती । तयापासूनि परियेसा ॥९९॥
ऐसें म्हणतां सिद्धमुनि । विनवीतसे नामकरणी । संदेह होतो माझे मनीं । कृपानिधि मुनिराया ॥१००॥
म्हणती श्रीगुरू तोचि जगद्गुरू । त्यातें झाला आणिक गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । कवणेपरी दिसतसे ॥१०१॥
सिद्ध म्हणे शिष्यासी । सांगेन याची स्थिति कैसी । पूर्वी श्रीरघुनाथासी । झाला वसिष्‍ठ केवीं गुरु ॥१०२॥
आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी । सांदीपनी जाहला गुरु कैसी । अवतार होतांचि मानुषीं तयापरी रहाटावें ॥१०३॥
याकारणें श्रीगुरुमूर्ती । गुरु केला तो कृष्णसरस्वती । बहुकाळींचा होता यति । म्हणोनि त्यातें मानिलें ॥१०४॥
शिष्य म्हणे सिद्धासी । स्वामी कथा निरोपिलीसी । वृद्ध कृष्णसरस्वतीसी । गुरु केलें म्हणोनियां ॥१०५॥
समस्त यतीश्वरांहून । तयासि दिधला बहुमान । कृष्णसरस्वती तो पूर्वी कोण । कोण गुरुचें मूळपीठ ॥१०६॥
विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें कृपेसीं । त्याणें माझे मानसीं । संतोष होईल स्वामिया ॥१०७॥
ऐसें शिष्य विनवितां । तंव सांगे विस्तारता । मूळपीठ आद्यंता । गुरुसंतति परियेसा ॥१०८॥
आदिपीठ 'शंकर' गुरु । तदनंतर 'विष्णु' गुरु । त्यानंतर 'चतुर्वक्‍त्र' गुरु । हें मूळपीठ अवधारीं ॥१०९॥
तदनंतर 'वसिष्‍ठ' गुरु । तेथोनि 'शक्ति', 'पराशरु' । त्याचा शिष्य 'व्यास' थोरु । जो कां अवतार विष्णूचा ॥११०॥
तयापासूनि 'शुक' गुरु जाण । 'गौडपादाचार्य' सगुण । आचार्य 'गोविंद' तयाहून । पुढें आचार्य तो 'शंकर' जाहला ॥१११॥
तदनंतर 'विश्वरुपाचार्य' । पुढें 'ज्ञानबोधीगिरिय' । त्याचा शिष्य 'सिंहगिरिय' । 'ईश्वरतीर्थ' पुढें झाले ॥११२॥
तदनंतर 'नृसिंहतीर्थ' । पुढें शिष्य 'विद्यातीर्थ' । 'शिवतीर्थ', 'भारतीतीर्थ' । गुरुसंतति अवधारीं ॥११३॥
मग तयापासोनि । 'विद्यारण्य' श्रीपादमुनि । 'विद्यातीर्थ' म्हणोनि । पुढें झाला परियेसा ॥११४॥
त्याचा शिष्य 'मळियानंद' । 'देवतीर्थसरस्वती' वृंद । तेथोनि 'सरस्वतीयादवेंद्र' । गुरुपीठ येणेंपरी ॥११५॥
यादवेंद्र मुनीचा शिष्य । तोचि 'कृष्णसरस्वती' विशेष । बहुकाळींचा संन्यासी । म्हणोनि विशेष मानिती ॥११६॥
येणेंपरी श्रीगुरुनाथ । आश्रम घेती चतुर्थ । संन्यासमार्गस्थापनार्थ । श्रीनृसिंहसरस्वती ॥११७॥
समस्त वेदांचा अर्थ । सांगता झाला श्रीगुरुनाथ । म्हणोनि वंदिती समस्त । तया काशी नगरांत ॥११८॥
ख्याति केली अतिगहनी । तया वाराणसीभुवनीं । यति समस्त येऊनि । सेवा करिती श्रीगुरुची ॥११९॥
मग निघाले तेथोनि । बहुत शिष्य-समवेत मुनि । उत्तरतीर्थ बदरीवनीं । अनंत तीर्थे पहावया ॥१२०॥
सव्य घालूनि मेरुसी । तीर्थे नवखंड क्षितीसी । सांगतां विस्तार बहुवसी । ऐक शिष्या नामकरणी ॥१२१॥
समस्त तीर्थे अवलोकीत । सवें शिष्य-यतींसहित । भूमिप्रदक्षिणा करीत । आले गंगासागरासी ॥१२२॥
सिद्ध म्हणे नामांकिता । समस्त चरित्र सांगतां । विस्तार होईल बहु कथा । म्हणोनि तावन्मात्र सांगतों परियेसीं ॥१२३॥
समस्त महिमा सांगावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । अनंत महिमा त्रैमूर्तीसी । गुरुचरित्र परियेसीं ॥१२४॥
गंगासागरापासाव । तटाकयात्रा करीत देव । प्रयागस्थानीं गुरुराव । येते झाले परियेसा ॥१२५॥
तया स्थानीं असतां गुरू । आला एक द्विजवरु । 'माधव' नामें असे विप्रु । श्रीगुरुसी भेटला ॥१२६॥
ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं । चतुर्थाश्रम तयासी । देते झाले परियेसा ॥१२७॥
नाम 'माधवसरस्वती' । तया शिष्यातें ठेविती । तयावरी अतिप्रीती । शिष्यांमध्यें परियेसा ॥१२८॥
सिद्ध म्हणे नामकरणी । शिष्य झाले येणेगुणीं । अखिल यतीनामकरणी । सांगेन ऐका एकचित्तें ॥१२९॥
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय महाज्ञानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३०॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं-गुरुपरंपरा-कथनं नाम द्वादशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१३०॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

Mar 10

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ओम  नमः शिवाय...!!!

 


श्री गुरुदेव दत्त...!!!

Mar 07

श्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)

Shri Dattaguru,Shri Gurucharitra:saraswati gangadhar swamiश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥१॥
सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्‍त्रियेची ॥२॥
शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं । देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळीं ॥३॥
झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं । वाजसनीय शाखेसी । विप्रकुळीं जन्मली ॥४॥
जातक वर्तलें तियेसी । नाम 'अंबा-भवानी' ऐसी । आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरीं परियेसा ॥५॥
वर्धतां मातापित्यागृहीं । वाढली कन्या अतिस्नेही । विवाह करिती महोत्साहीं । देती विप्रासी तेचि ग्रामीं ॥६॥
शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया 'माधव' जाण । त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतींकरुनि ॥७॥
तया माधवविप्राघरीं । शुभाचारें होती नारी । वासना तिची पूर्वापरीं । ईश्वरपूजा करीतसे ॥८॥
पूजा करी ईश्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसीं । प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्कर ॥९॥
मंदवारीं त्रयोदशीसी । पूजा करिती अतिंविशेषीं । तंव वत्सरें झालीं षोडशीं । अंतर्वत्‍नी झाली ऐका ॥१०॥
मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी । उत्तम डोहाळे होती तियेसी । बह्मज्ञान बोलतसे ॥११॥
करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती । अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥१२॥
ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं । पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होतीं मातापिता ॥१३॥
जन्म होतांचि तो बाळक । 'ॐ' कार शब्द म्हणतसे अलोलिक । पाहूनि झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥१४॥
जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षिणा दान । ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥१५॥
सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषीं । कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥१६॥
याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्वासी । याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥१७॥
अष्‍टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं । नव निधि याच्या घरीं । राहती ऐक द्विजोत्तमा ॥१८॥
न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत । याचे दर्शनमात्रें पतित । पुनीत होतील परियेसीं ॥१९॥
होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरवंसीं । संदेह न धरावा मानसीं । म्हणोनि करिती नमस्कार ॥२०॥
म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर । याचेनि महादैन्य हरे । भेणें नलगे कळिकाळा ॥२१॥
तुमचे मनीं जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा । यातें करावें हो जतना । निधान आलें तुमचे घरा ॥२२॥
ऐसें जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन । जनक जननी संतोषोन । देती दान वस्त्राभरणें ॥२३॥
सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम । दृष्‍टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोंवाळिती ॥२४॥
व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिलें म्हणत । उपजतां बाळ 'ॐ' कार जपत । आश्चर्य म्हणती सकळ जन ॥२५॥
नगलोक इष्‍ट मित्र । पहावया येती विचित्र । दृष्‍टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥२६॥
मायामोहें जनकजननी । बाळासी दृष्‍टि लागेल म्हणोनि । आंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्‍णसुतें ॥२७॥
परमात्मयाचा अवतार । दृष्‍टि त्यासी केवीं संचार । लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥२८॥
वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी । नामकरण पुरःसरीं । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥२९॥
'शालग्रामदेव' म्हणत । जन्मनाम झालें ख्यात । नाम 'नरहरी' ऐसें म्हणत । उच्चार केला धर्मकर्मे ॥३०॥
ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं । माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥३१॥
पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडें बाळा । एखादी मिळवा कां अबळा । स्तनपान देववूं ॥३२॥
अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक । ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥३३॥
स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर । वस्त्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥३४॥
विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणीं । नमन करिती बाळकाचरणीं । माता होय खेळविती ॥३५॥
पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यंदें गाय अति हर्षी । न राहे बाळक पाळणेसीं । सदा खेळे महीवरी ॥३६॥
वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारीं । वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥३७॥
माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं । चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥३८॥
पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी । उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळीं ॥३९॥
सांगती जाण ज्योतिषी । आराधावें कुलदेवतेसी । अर्कवारीं अश्वत्थपर्णेसीं । अन्न घालावें तीनी वेळां ॥४०॥
एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावें बरव्या विवेकें । बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥४१॥
हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ । विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥४२॥
एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें । श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥४३॥
कांहीं केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता । पुत्रासी जाहलीं वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥४४॥
सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी । पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केंवी करावें म्हणोनियां ॥४५॥
विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा । उपनयनावें केवळा । अष्‍ट वरुषें होऊं नये ॥४६॥
मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं । मुका असे हा निश्चितीं । कैसें दैव झालें आम्हां ॥४७॥
कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्वरगौरी आराधिले । त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥४८॥
ईश्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु । न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंता शिवासी ॥४९॥
एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखों स्वप्नेसीं । वेष्‍टिलों होतों आम्ही आशीं । आमुतें रक्षील म्हणोनि ॥५०॥
नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष । काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥५१॥
ऐसें नानापरी देखा । जननी करी महादुःखा । जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥५२॥
घरांत जाऊनि तये वेळां । घेऊनि आला लोखंड सबळा । हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥५३॥
आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं । बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥५४॥
गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा । पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥५५॥
अमृतदृष्‍टीं पाहतां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमीं । विश्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥५६॥
मग पुत्रातें आलिंगोनि । विनविताति जनकजननी । तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥५७॥
तुझेनिं सर्वस्व लाधलें । बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें । अज्ञान-मायेनें विष्‍टिलें । भुकें ऐसें म्हणों तुज ॥५८॥
आमुचे मनींची वासना । तुंवा पुरवावी नंदना । तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥५९॥
हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां । कटीं दांवी मौंजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥६०॥
संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं । मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥६१॥
मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती । व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥६२॥
केली आयती बहुतांपरी । रत्‍नखचित अळंकारीं । मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥६३॥
चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती । इष्‍ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥६४॥
नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार । आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥६५॥
नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती । द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥६६॥
इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं । गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेवरी ॥६७॥
एक म्हणती हो कां भलतें । मिष्‍टान्न आम्हांसि मिळतें । देकार देतील हिरण्य वस्त्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥६८॥
ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक । मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥६९॥
चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी । पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥७०॥
मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त । सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥७१॥
भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकोभावें । मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥७२॥
गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केलें त्या बाळका । सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥७३॥
गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं । बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥७४॥
गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊन आली माता । वस्त्रभूषणें रत्‍नखचिता । देती झाली तया वेळीं ॥७५॥
पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी । बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी आचारधर्मे वर्ततसे ॥७६॥
पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं । 'अग्निमीळे पुरोहितं' उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥७७॥
दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद 'इषेत्वा०। लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥७८॥
तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां । 'अग्नआयाहि०' गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥७९॥
सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं । मुकें बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥८०॥
यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार । म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥८१॥
इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक । तुंवा उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥८२॥
नव्हती बोल तुझे मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥८३॥
आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं । वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥८४॥
ऐकोनि पुत्राचें वचन । दुःखें दाटली अतिगहन । बाष्‍प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥८५॥
निर्जीव होऊनि क्षणेक । करिती झाली महाशोक । पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥८६॥
आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं । न बोलसी आम्हांसवें याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥८७॥
न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल । ईश्वरपूजा आलें फळ । म्हणोनि विश्वास केला आम्हीं ॥८८॥
ऐसें नानापरी देखा । पुत्रासि म्हणे ते बाळिका । आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥८९॥
ऐकोनि मातेचें वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान । नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणें तेंचि असे ॥९०॥
तुतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारीं । तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसीं ॥९१॥
तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार । म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जहालें जातिस्मरण ॥९२॥
पूर्वजन्मींचा वृत्तांत । स्मरतां जाहली विस्मित । श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपता । दिसतसे तो बाळक ॥९३॥
देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां । श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥९४॥
ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करीं वो गुप्‍ती । आम्ही संन्यासी असों यति । अलिप्‍त असों संसारीं ॥९५॥
याचिकारणें आम्ही आतां । हिंडूं समस्त तीर्थां । कारण असे पुढें बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥९६॥
येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं । पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥९७॥
पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्ही जरी जाल । आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥९८॥
धाकुटपणीं तुम्हां तापस- । धर्मी कवण आहे हर्ष । धर्मशास्त्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥९९॥
ब्रह्मचर्य वर्षे बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा । मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥१००॥
मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ । मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्त्र येणेंपरी ॥१०१॥
ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां । विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥१०२॥
यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया । येणेंविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥१०३॥
समस्त इंद्रियें संतुष्‍टवावीं । मनींची वासना पुरवावी । तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥१०४॥
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू सांगती तत्त्वज्ञान । ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥१०५॥
गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून । तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्रविस्तार ॥१०६॥
पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका । महाराष्‍ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥१०७॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१०७॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online